Bluepad | Bluepad
Bluepad
मैत्री: अविभाज्य घटक
नयन धारणकर
6th Aug, 2022

Share

काय आहे मैत्री? काय आहे मित्रता? याच मैत्रीची संज्ञा जाणून घ्यायची असेल आणि मैत्रीचे महत्त्व जाणून घ्यायची इच्छा असेल ना तर श्रीकृष्ण बलरामाचा आदर्श घ्या. मैत्रीची संकल्पना समजावून घ्यायची असेल ना तर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्याकडून शिकून घ्या. होय मैत्री. अखंड ज्ञानाचा वाहणारा सागर आहे मैत्री. संथ उथळ पाण्याचा खळखळणारा झरा आहे मैत्री. कर्म धर्म मर्म या त्रिसंगमांनी परिपूर्ण असलेली गंगोत्री आहे मैत्री. विश्वास, त्याग, प्रेम, समर्पण या साऱ्याचा अविभाज्य घटक आहे मैत्री. म्हणूनच मैत्रीला विसरून कसे चालेल? या भुलोकात, आई वडील, शिक्षक, गुरू जितके महत्त्वाचे आहेत तितकीच मित्रता ही महत्त्वाची आहे. कारण रोजच्या दैनंदिन जीवनात किंवा आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की आपण ना आई वडिलांना, ना भाऊ बहिणीला, ना गुरूला, ना शिक्षकांना सांगू शकत त्या फक्तं आणि फक्तं मित्र किंवा मैत्रिणीं समोर मांडू शकतो. परंतु मैत्री देखील कोणाशी सांगून होत नसते. जर आपल्याला कोणाशी मैत्री करायची असेल किंवा जर कोणी आपल्याला मित्र किंवा मैत्रीण म्हणून आयुष्यात हवं असेल तर आधी त्याचा किंवा तिचा विश्वास संपादन करणे गरजेचे असते. एकमेकांची मने, विचार जुळणे महत्त्वाचे आहे. आणि मनात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता, कुठल्याही गोष्टीची हमी न बाळगता निस्वार्थ, भावबंदकी नात्याने नाते जपले जाते त्याला मैत्री म्हणतात.
दैनंदिन जीवनात काही लोक मित्र मित्र म्हणून त्यांच्या सोयीने वागण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मीच चांगला मित्र असण्याचा आव आणतात शिवाय स्वार्थ भावनेने हेतुपुरस्सर निव्वळ सल्ला देण्याचे काम करत असतात तर याला मैत्री म्हणावे का? नाही. खरे म्हणजे संकटात आधार देणारी, दुःखातून आपल्या मित्राला सावरून घेणारी, समोरच्या व्यक्तीला क्षणात आपलंसं करून घेणारी मैत्री श्रेष्ठ असते. चुकल्या व्यक्तीला योग्य वाट दाखवणारी आणि भरकटलेल्या माणसाला वाट मोकळी करून देणारी मैत्री श्रेष्ठ असते. परंतु पुढे चालणाऱ्या व्यक्तीचे पाय खेचणाऱ्या, आपल्या बरोबरीच्या व्यक्तीबरोबर सतत स्पर्धा करू पाहणाऱ्या तसेच पाण्यात पाहणाऱ्या मैत्रीला काहीच अर्थ नाही. मैत्री आयुष्याचे तत्वज्ञान मांडते, शिकवते, मैत्री चुकल्या आयुष्याची दिशा शोधून देणारे अनुसंधान आहे. कोणाशी मैत्री करत असताना ती आपल्या योग्यतेची आहे का? ती कायम आपल्याला साथ देऊ शकेल का? या सगळ्याची पारख करणे अनिवार्य असते. एकदा बोलून, एकदा भेटून, गोड बोलून कधीही मैत्री साध्य होत नाही. कारण बऱ्याच वेळा आपण ज्यांच्याशी मित्रता करून घेत असतो. ते लोक तोंडावर गोड बोलतात पण मागून आपल्याच पाठीत खंजीर खुपसत असतात याची प्रचिती येईल तोपर्यंत ती वेळ आणि ती व्यक्ती ही निघून गेलेली असते. आणि नशिबी येते ते केवळ नैराश्य. तेव्हा मैत्री करण्याआधीच सावध राहाणे फार महत्त्वाचे असते.
काही लोक असेही बघायला मिळतात की ते एकटेच त्यांचे आयुष्य जगत असतात. त्यांना आधार द्यायला कोणी नसते अशा वेळेस खचून जाऊन आत्महत्यासारख्या वाईट कृत्यांना बळी पडतात. तेव्हा अशा लोकांनां माझे असे सांगणे आहे की आयुष्यात एक तरी मित्र किंवा मैत्रीण जवळ असू द्या. त्यांच्याशी बोला, व्यक्त व्हा, अंतःकरणाने आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडायला शिका हेच तुमच्या हिताचे आहे. कारण आत्महत्या करून कोणी मोठा होत नसतो तर केवळ माणूसच जिवानिशी जातो. परंतु त्याचा त्रास, दुःख, कुटुंबीयांना सहन करावे लागते. तेव्हा मित्रांनो, मित्र मैत्रिणी कमवा, मित्रांमध्ये राहत चला पण हा समोरचा व्यक्ती आपला कधी घात करणार नाही याची दक्षता घ्या.
दुसरे म्हणजे कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण एखाद्याचे मित्रत्व स्वीकारतो तर ती मैत्री टिकवून ठेवणे आपल्या हाती असते. आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. असे वागून आपल्या कोणत्याही मैत्रीच्या नात्याला कलंक लागता कामा नये याची काळजी आपण घ्यायची. एकदा मैत्री केली की मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्या मैत्रीचे स्वारस्य टिकले पाहिजे. किंबहुना टिकवून ठेवण्याचा उद्देश कायम असू द्यावा.
मैत्री म्हणजे ती काय वस्तू नव्हे आज वाटलं म्हणून केली आणि उद्या वाटलं म्हणून सोडून दिली. मैत्री सुद्धा एक भावना आहे. जीवाला जीव देणाऱ्या जाणिवा आहेत. त्याचेही तारतम्य बाळगावे. जेणेकरून मैत्रीमध्ये कोणाचा विश्वासघात होणार नाही. मला वाटते मैत्री ही प्रत्येक व्यक्तीसाठी देवाने दिलेली प्रेमाची, हक्काची देणगी आहे. ती किती आत्मीयतेने जपायची ते आपण ठरवायचे. आणि जीवनात येणाऱ्या इतर व्यक्तीही दोन मित्रांमध्ये इतस्ततः अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात थारा न दिलेलाच बरा. माझ्या वैयक्तिक आयुष्यात म्हणाल तर आजपर्यंत बरेच मित्र मैत्रिणी मी कमावले आणि योग्य रीतीने ती मित्रता मी स्वतः निभावतो ही आहे. शिवाय ज्या ज्या व्यक्ती मित्र म्हणून माझ्या आयुष्यात आले त्या सर्व व्यक्ती आजही माझ्या बरोबर आहेत. मान्य आहे की संपर्कात असलेले सर्वच मित्र मैत्रिणी साथ देत नाहीत, परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बरेच मित्र माझ्या एका आवाजावर मदतीसाठी धावून येतात हे माझे अहोभाग्य समजतो. मी सुद्धा मित्रता टिकवून ठेवण्यामध्ये कमी पडत असेल असे मला वाटत नाही. मी माझ्या परिने मैत्री निभवण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करतच असतो. तसेच त्यांनी आजवर दिलेली साथ कायम लक्षात ठेवून त्यांनी या पुढेही कायम माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असा आशावाद व्यक्त करतो, त्यांच्याविषयी अंतःकरणातून कृतज्ञता व्यक्त करतो. आजतागायत कधीही माझ्या मित्र मैत्रिणींनी आज पर्यंत माझी साथ सोडली नाही कायम बरोबर राहत आले. आणि इथून पुढेही राहाल याची खात्री आहे. त्या बद्दल समस्त मित्र वर्गाचा मी शतशः ऋणी आहे.
हीच ती मित्रता इतरांना दाखवण्यासाठी कोणत्या मैत्री दिनाची आवश्यकता आहे किंबहुना कोणास आपली एखाद्याशी असलेली मित्रता ही दाखवण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. पण तरी देखील मैत्रीतील निपुणता टिकून राहावी यासाठी मैत्रीचा रेशमी धागा मैत्री दिनाच्या दिवशी मोठ्या कुतूहलाने बांधला जातो. परंतु मला वाटते, जेव्हा जेव्हा मित्र परिवार एकत्र येऊन भेटतो तेव्हा तेव्हा मैत्रीचा दिवस असतो. त्यासाठी खास दिवस असणे आवश्यक नाही. जीवनात चालता बोलता अनेक दुरापास्त लोकांच्या गाठीभेटी होतच असतात, परंतु त्यात मित्रासारखे, जीवाला जीव देणारे, मैत्रीच्या प्रेमापोटी काळजी करणारे परममित्र फार क्वचितच मिळतात. त्यातही ते बोटावर मोजण्याइतकेच असतात. सुप्रसिद्ध कवी, लेखक अनंत राऊत यांनी त्यांच्या कवितेत लिहिल्याप्रमाणे,
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
होय. मित्र हे दुःख अडवणारेच आपल्या आयुष्यातील बहुमोल रत्न असतात. उद्या कधी काळी अचानक येणाऱ्या संकटातून मार्ग मोकळा करण्यासाठी आई वडील, नातेवाईक नाही, याउलट आपले जवळचे, कट्ट्यावरचे मित्र असतील तिथून धावत पळत येत असतात. का तर, आपला मित्र संकटात आहे म्हणून. त्यामुळेच मित्र हेच यशाच्या वाटेवर उभे असणारे, सावधानतेचा इशारा देणारे प्रमुख फलके असतात. तिथे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण मित्रच जीवनाचे साथीदार, आयुष्याच्या वाटेवर चालताना येणाऱ्या अडथळ्यांना दूर सारण्यास उभे असलेले गिरिरोधक असतात. मित्रता हीच यशाचा मार्ग दाखवणारी, हाकेला हाक देणारी, दूरदृष्टीकोनातून समृद्ध भाषा व मैत्री प्रेमाचे तत्वज्ञान सांगणारी, मार्गदर्शक तसेच दिशादर्शक सूचक यंत्रणा आहे. मित्रता हीच सदैव आपल्या आयुष्यात सावली बनून ममता, आत्मभाव, स्वभाव, तत्परता, यांची रुंजी घालत असते. तेव्हा तुमचे मित्र जपा, तुमच्या मित्रांना जपा, मित्रांमध्ये राहा, वैचारिक मंथन स्थिर ठेवत चला आयुष्य नक्कीच सुकर होईल.
लेखक : नयन धारणकर, नाशिक

163 

Share


Written by
नयन धारणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad