आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारताचा राष्ट्र ध्वज हा तिरंगा आहे. पण भारतीय स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय ध्वज म्हणून अनेक ध्वजांचा वापर केला गेला. ह्याच ध्वजांची माहिती आपण पाहणार आहोत.
१) भगवा:
भारतामध्ये पुर्वापर चालत आलेली परंपरा, संस्कृती, वारसा, सामाजिक सांस्कृतिक वैभवाचे शौर्य गाथांचे प्रतिक असणारा "भगवा" हा अनादी काळापासून राष्ट्र ध्वज किंवा धर्म ध्वज म्हणून ही ओळखला जातो. ह्या ध्वजाचा उल्लेख रामायण आणि महाभारत ग्रंथात आढळतो. "कपि ध्वज" असा उल्लेख महाभारतात आढळतो.
मुघल साम्राज्याच्या पाशात अडकलेल्या हिंदू स्थानाला मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. ह्याच स्वराज्याचा ध्वज हा "भगवा" होता. ह्या अर्थी हा भारताचा प्रथम ध्वज म्हणन्यास हरकत नाही.
२) १९०४ : वज्रध्वज
१८५७ नंतर ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या. स्वामि विवेकानंद यांच्या शिष्या आयरिश ज्यांना सिस्टर निवेदिता म्हटलं जातं. त्यांनी ध्वज निर्माण केला. लाल रंगाच्या कापडावरती पिवळ्या रंगाचे वज्र मध्ये पांढरे कमळ आणि बंगाली भाषेत "वंदे मातरम्" असे लिहीलेला हा ध्वज होता. ह्यास प्रसिद्धी मिळाली नाही.
३) १९०६ : कलकत्ता ध्वज
बंगाल फाळणी मुळे देशात ह्या विरोधात आंदोलने होत होती. भारताचे अखंडत्व दाखविण्यासाठी आणि फाळणीला विरोध करण्यासाठी आंदोलनात प्रथमच एक ध्वज निर्माण केला गेला. ह्या ध्वजात तीन रंग होते. निळा,पिवळा,लाल. निळ्या पट्टीत आठ प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे आठ तारे होते, मध्ये देवनागरी लिपीत"वंदे मातरम्" व लाल पट्टीत अर्ध चंद्र व सुर्य ह्यात बदल करुन निळ्या च्या जागी केशरी व लाल च्या जागी हिरवा रंग समाविष्ट केला. हा ध्वज चळवळीतील प्रथम ध्वज होता. ह्याचे डिझाईन "सचिंद्र प्रसाद बोस" व "सुकुमार मित्र" ह्यांनी तयार केले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी ह्यांनी ७ ऑगस्ट १९०६ रोजी पारसी बागान येथे हा ध्वज फडकाविला.
४) १९०७ : बर्लिन कमिटी ध्वज
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,श्यामजी कृष्ण शर्मा, आणि मॅडम कामा ह्यांच्या संकल्पनेतुन हा ध्वज निर्माण झाला. ह्यात तीन रंग शिर्षस्थानी हिरवा,मध्ये सोनेरी, खाली केशरी. हिरव्या पट्टीत आठ अर्ध उमलली कमळ पुष्प, पिवळ्या पट्टीत"वंदे मातरम्" केशरी पट्टीत अर्ध चंद्र व सूर्य समाविष्ट होते. २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीत झालेल्या संमेलनात हा ध्वज मॅडम कामा ह्यांनी फडकाविला. परदेशी भुमीवर फडकणारा हा पहिलाच भारतीय ध्वज आहे. हा ध्वज चळवळीत बऱ्याच ठिकाणी वापरला गेला.
५) १९१७ : टिळक ध्वज
होमरुल चळवळी दरम्यान आपल्या देशाचा ध्वज असायला हवा म्हणून लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून ध्वज साकारला गेला. शिर्षस्थानि युनियन जॅक पाच लाला रंगाच्या पट्ट्या व चार निळ्या रंगाच्या पट्ट्या सप्तर्षी चे प्रतिनिधित्व करणारे सात तारे फ्लाय एंड ला अर्धचंद्र व चादणी. अशी रचना होती. ह्याध्वजास पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.
६) १९२१ : गांधींच्या संकल्पनेतील ध्वज
१९१६ रोजी विजयवाड्यातील काही तरुणांनी एक ध्वज ज्यात दोन रंग हिरवा आणि लाल व चरखा असणारा ध्वज म. गांधींना भेट दिला. ह्यात हिरवा मुस्लिम व लाल रंग हिंदूंसाठी होता;पण अन्य उर्वरित संप्रदायांचा त्यात विचार केला नाही म्हणून १९२१ रोजी गांधींच्या इच्छेनुसार "पिंगली वेंकय्या" ह्यांनी ध्वजाला आकार देत पांढरा रंग समाविष्ट केला. आता त्यात तीन रंग पांढरा, हिरवा व लाल आणि चरखा आला. हा ध्वज कॉंग्रेस पक्षाचा झेंडा बनला ज्याच्या खाली अनेक स्वातंत्र्य चळवळी घडुन आल्या. ह्याच ध्वजापासुन आजच्या राष्ट्र ध्वजाचे अंतिम चित्र तयार होण्यास सुरुवात झाली.
७) १९३१
१९२१ रोजी तयार करण्यात आलेल्या ध्वजासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत गेले. अनेकांच्या मते ध्वजात सांप्रदायिकता दर्शविणारे प्रतिक नकोत असे मत येत गेले. ह्याच अनुषंगाने १९३१ रोजी ध्वजात बदल करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली ज्यात सरदार वल्लभभाई पटेल,पं. जवाहरलाल नेहरू इ. चा समावेश होतो. ह्यात भारताच्या राष्ट्र ध्वजाचा विचार करुन भारताच्या प्राचीन संस्कृती व सभ्यतेचा विचार करून "भगवा" रंगाचा ध्वज निर्माण करण्याचे ठरविले ज्यात एका बाजूला चरखा असेल. हा ध्वज इतरांपेक्षा वेगळा असेल. ह्यावर एकमत होऊन समितीने मंजूर केला. पण कॉग्रेस कमिटी ला आणि गांधीना ध्वज पसंत नव्हता त्यामुळे हा ध्वज मान्य झाला नाही. पिंगली वेंकय्या ह्यांनी पुन्हा एक ध्वज बनविला ज्यात तीन रंग केशरी पांढरा हिरवा व मध्ये चरखा असणारा ध्वज निर्माण केला. हा कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत ध्वज झाला. पुढिल सर्व स्वातंत्र्य चळवळीत हाच ध्वज वापरला गेला.
८) आझाद हिंद ध्वज १९४४
भारताची १९५७ नंतर ची पहिली संघटीत सेना "आझाद हिंद सेना" आणि आझाद हिंद चे पंतप्रधान,सरसेनापती, नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी इंग्रजांविरुद्ध लढ्यात वापरला. केशरी पांढरा हिरवा असे तीन रंग पांढऱ्या पट्टीत वाघ आणि आझाद हिंद असे लिहिलेला हा आझाद हिंद सेनेचा ध्वज इंग्रजांविरुद्ध च्या लढ्यात वापरला. जापान येथे आझाद हिंद सेनेच्या परेड दरम्यान प्रथम हा ध्वज फडकाविला. मणिपूर येथे विजय मिळविल्यावर कर्नल शौकत अली मलिक ह्यांनी ध्वज फडकविला.
९) १९४७ : तिरंगा
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या. संविधान, राष्ट्र गीत साठी समिती झाली तशीच स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्र ध्वज निर्मिती साठी समिती डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली. "पिंगली वेंकय्या" ह्यांनी ध्वजाला अंतीम रुप दिले. शिर्षस्थानी केशरी मध्ये पांढरा व खाली हिरवा रंग असणारा ध्वज निर्माण झाला. जो कॉंग्रेस चाच ध्वज होता पण ह्यात चरख्या ऐवजी अशोक स्तंभावरील "अशोक चक्र" गडद निळ्या रंगात समाविष्ट केले गेले आणि तयार झाला स्वतंत्र भारताचा राष्ट्र ध्वज "तिरंगा". २२ जुलै १९४७ रोजी अधिकृत राष्ट्र ध्वज म्हणून स्वीकारले गेले.
प्रमुख नऊ ध्वजांतुन साकारलेला, अनेक बलिदानाच्या कथा सांगणारा राष्ट्राचा ध्वज आणि हे स्वतंत्र राष्ट्र ७५ वर्षाच्या तरुणावस्थेत पोहोचले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सर्वांना ही ज्ञान भेट...