कर्म - गीतारहस्य -२
कितीही कर्मे करावयाची असली तरी मनाची शांती न गमावता केल्याने सिद्ध पुरुषास सुख- दुःख वाटत नाही. कोणत्याही मनुष्यांस कर्म करावेच लागते.प्रकृतीचे गुण कर्म करावयास लावतातचं. मनुष्य कर्मशुन्य होऊ शकत नाही. कर्म सोडणे हा सिद्धि मिळवण्याचा उपाय नाही. ज्ञानाने आसक्तीचा क्षय करून कर्म करीत राहणे यालाच कर्मयोग म्हणतात.
कर्म हे वाईट कधीच असू नये. निष्काम कर्म म्हणजेच कर्मयोग. कर्म केले नाही तर शरीरनिर्वाह पण चालणार नाही. फलाशा सोडून कर्म केल्यास मोक्षप्राप्ती होते.
कर्म करावेच लागते पण ते निस्वार्थ व निष्काम बुद्धीने करावे.
जनकादि राजांना पण कर्मानेच सिद्धि मिळाली. कर्म हे सर्व जगाला सन्मार्गावर आणून, सर्वांचे पालनपोषण करणे व संरक्षण करण्यासाठी करावयाचे आहे. लोकांना शहाणे व सदाचारी करण्यासाठी ज्ञानी पुरुषाने कर्म करावे.
श्रीकृष्ण सांगतात, माझ्या ठायी अध्यात्मबुद्धिने व सर्व कर्माचा संन्यास म्हणजे मला अर्पण करून आणि फलाशा सोडून तू युद्ध कर.
आपण जो कोणता व्यवसाय स्विकारला आहे तो सोडू नये. सर्व व्यवसायात काहीनाकाही दोष असतात पण दोष न शोधता आपले कर्म करावे. कर्मयोग हा साम्यबुद्धिने कर्म करण्याचा आयुष्यक्रमणाचा एक मार्ग आहे.