Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ ....
विश्वास बीडकर
6th Aug, 2022

Share

शुभ शनिवार .
एखाद्या शहरात ,
' शहर दर्शन टूर ' असते . एका दिवसात संपुर्ण शहराची ओळख होते .
सहज मनात आलं , आपण आपल्या ठाणे शहराची
' खाद्य दर्शन ' ( अर्थात सध्यातरी शाब्दिक ) टूर आयोजीत केली तर .....
असं ही ठाणं सध्या भारतभर गाजतं आहेचं .
" क्यूं न मौके का फायदा उठाया जाय ..."
हिंदी डायलॉग म्हणजे परत भारतभर प्रसिध्दी .
सकाळच्या नाश्त्याला सुरूवात .
भरपूर व्हरायटी आहे आमच्या ठाण्यात . तुम्ही फक्त मनात काय आहे ते सांगा .
साऊथ इंडियन हवं असेल तर , पाचपाखाडी चं उत्सव . वाफे वरची इडली आणि ऑर्डर दिल्यावर तयार होणारा मेदू वडा तसचं दोशांचे सगळे प्रकार एका हाकेत समोर हजर होतील . या उत्सवचं वैशिष्ट्य म्हणजे इकडची चटणी . अस्सल ओलं खोबरं ( फक्त आणि फक्त ) घालून केलेली मस्त चटणी . त्यावर उडदाच्या डाळीची फोडणी . सोबत तेवढाच उत्तम सांबार . दोसा - इडली - वडा आणि चटणी सकाळची पुण्याई पदरात पडणारचं .
मिसळ चं हवी असं ठरवलं असेल तर तुम्ही मिसळीच्या राजधानीत आहात . मामलेदार , सुरूची , गोखले उपहारगृह असे नावाजलेले मिसळ चे जॉईंट ठाण्यात अर्ध्या मैलांवर आहेत .
डोळ्यातलं पाणी पुसत पुसत दाटीवाटीत बसून फक्त मिसळ खायची आहे , हॉटेल ची सजावट वगैरे दुय्यम मानत असाल तर , स्टेशन रोडवर मामलेदार कचेरीच्या जवळ जा . मिसळ चा तिखट सुगंध तुम्हाला मार्ग दाखवेल .
हॉटेल ची सजावट महत्वाची आणि थोडं आरामशीर बसायची व्यवस्था हवी असेल तर हिच मिसळ , ' आमंत्रण ' मध्ये बसून खा .
सुंदर आणि हसतमुख चेहरे पाहात थोडी कमी तिखट मिसळ खायची असेल तर , गोखले उपहारगृह गाठा . कदाचित टेबल मिळायला वेळ लागेल . पाण्याचे ग्लास आपण आपले घ्यावे लागतील . मालक न हसता तुमचे पैसे घेतील - देतील पण मिसळ आणि रस्सा अप्रतिम . बरोबर जर कुणी उपवास करणारे असतील तर ती मंडळी तर भलतीच खुश होतील . चॉईस मिळतो उपवासाच्या पदार्थांमध्ये .
मिसळ पेक्षा बटाटे वडा पसंत असेल तर तुम्ही परत राजधानीत चं आहात .
कुलकर्णी , राजमाता , गजानन ही नावं लक्षात ठेवा . गरम गरम कढईतल्या बटाटा वड्यांची शपथ घेऊन सांगतो , एकदा भेट दिल्या नंतर आपोआपच लक्षात राहतील .
चला आता चहा घेऊया .
चहाचा घोट घेतल्यावर , जीभ आणि तुम्हाला एकाच वेळेस तृप्त व्हायचं असेल तर तळ्यावरचं
' साईकृपा ' . एक कप चहा शेवटी गेलो होतो तेंव्हा बत्तीस रूपये होता . तुम्ही चहा घेतल्यावर किंमतीपेक्षा चहा लक्षात ठेवाल ही पुन्हा गॅरंटी .
आता थोडी विश्रांती ची गरज आहे असं वाटतंय .
थोडा वेळ आराम करूयात
दुपारचं जेवणं , संध्याकाळची प्रशांत ची भटकंती आणि लेट नाईट चं डिनर साठी नंतर भेटुयात ....
थांबाल नं !
विश्वास बीडकर .
६ ऑगस्ट २०२२ .

177 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad