Bluepad | Bluepad
Bluepad
केटरिंगवाला
Milind Joshi
Milind Joshi
5th Aug, 2022

Share

आमच्या घरात फक्त मीच एकटा चांगल्या गोष्टींची वाट लावणारा नाहीये. या बाबतीत मकरंदही बिलकुल कमी नाही. फरक फक्त इतकाच की मी कधी गाण्याची, कधी कवितेची, कधी चित्रपटाची वाट लावतो. मकरंद मात्र प्रसंगाची वाट लावतो, त्यावर विशेष टिपण्णी करून.
संध्याकाळी मी, काका आणि मकरंद गप्पा मारत होतो. एकीकडे रेडीओ मिर्चीवरील ‘पुरानी जीन्स’ कार्यक्रम चालू होता. त्यावरील गाणे कायम तेच ते असतात, पण ऐकायला भारी वाटतात. आणि हो... आर जे सायमाची गाण्याशी संबंधित टिपण्णी मला विशेष आवडते. अर्थात हे इतरांना सांगण्यासाठी आहे. खरे तर मला सायमाचा आवाज भुरळ घालतो. मी फक्त तिच्यासाठी रेडीओ मिर्ची ऐकतो. हे आरजे लोक ज्या पद्धतीने बोलतात ते एक नंबर असते. एक ना एक दिवस मी एखाद्या आरजेला पकडून विचारणार आहे, ‘यार... तुम्ही लोक घरीही अशाच पद्धतीने बोलतात का?’ असो... विषय भरकटतोय. तर... आम्ही तिघे एकीकडे गाणे ऐकत गप्पा मारत होतो.
तेवढ्यात मुकद्दर का सिकंदर चित्रपटातील गाणे लागले. ‘ओ साथी रे...’ मी नेहमीप्रमाणे सूर लावला, ‘ओ हाथी रे...’
“मिलिंद... किशोरलाच म्हणू दे ना... तुझं नंतर ऐकेन मी.” काका म्हणाले. मग काय? मी बसलो गप्पं. आपण नेहमी मोठ्यांचं ऐकत असतो.
गाणे चालू असतानाच काकांनी माझ्या तोंडून ‘हाथी’ शब्द ऐकला आणि विचारले.
“हाथी मेरे साथी मधील गाणे का रे?”
“नाही हो, मुकद्दर का सिकंदर मधले गाणे आहे.” मी सांगितले.
“म्हणजे अमिताभ बच्चन का?”
“होय...” मी म्हटले.
“म्हणजे तोच चित्रपट ना ज्यात सायरा बानू आहे. विनोद खन्ना आणि अमिताभ मित्र असतात, नंतर शत्रू बनतात.” काकांनी विचारले.
“नाही हो... तो चित्रपट हेराफेरी आहे. हा चित्रपट वेगळा.” मी म्हटले.
“अहो... काका, हा चित्रपट म्हणजे ज्यात विनोद खन्ना आणि राखीचे लग्न होत असते. कार्यालय ही ठरलेले असते. अक्षदाही पडतात आणि जशी लोकांच्या जेवणाची वेळ येते. अमिताभ बच्चन मरून जातो. लोकांच्या जेवणाचा कबाडा. आता ज्या ठिकाणी तरण्याबांड पोराला मृत्यू आला, तिथे असलेले गोडाचे जेवण लोकांच्या घशाखाली तरी उतरेल का?” मकरंदने म्हटले आणि मला आणि काकांना हसू आले.
“मकू... आता यापुढचा प्रसंग तूच सांग.” मी हसत म्हटले.
“ऐक तर मग...” म्हणत मकरंदने तो प्रसंग सांगण्यास सुरुवात केली.
सिकंदर ( अमिताभ हो ) मेल्यामुळे सगळे लोक न जेवताच, डोळे टिपत घरी जातात. १०/१५ मिनिटात कार्यालय खाली होते. उरतात फक्त तिथे सेवा देणारे लोक. जसे की केटरिंग वाला, कार्यालय वाला इत्यादी. कार्यालय वाल्याने आधीच पैसे घेतल्यामुळे त्याला टेन्शन नसते. टेन्शन येते ते केटरिंगवाल्याला. तो काहीसा घाबरतच कामनाकडे (राखी हो ) जातो.
“म्याडम... तुमचे दुःख मी समजू शकतो पण माझे पैसे मिळाले असते तर...” केटरिंगवाला काहीसा बिचकतच म्हणतो.
“मेल्या, माझं एक प्रेम इथं मरून पडलंय आणि तुला तुझ्या पैशाची पडलीये? काही लाज शरम?” कामनाचा सामना करणे बिचाऱ्याला अवघड वाटते म्हणून तो सुमडीत बाजूला होतो. पण बाकी कामगारांना देण्यासाठी पैसे पाहिजेत ना? म्हणून तो विशालकडे ( विनोद खन्ना हो ) जातो.
“साहेब...!!!” विशालने आधीच चोरून कामना आणि केटरिंगवाला यांच्यातील संवाद ऐकलेला असल्याने तो काय म्हणणार याची त्याला पूर्ण कल्पना असते.
“हे बघ, आता पैशाचे नाव काढले ना तर एका फायटीत तुझे दात पाडीन !!! एक तर ऐन टायमाला मरून सिकंदरने माझ्या लग्नात अपशकून केलाय. आता तर माझ्या नातलगांकडून जन्मभर माझ्या बायकोला पांढऱ्या पायाची म्हटले जाईल. मला त्याचं टेन्शन आलंय. आता ती आहे गोरी, त्यामुळे दिसतात तिचे पाय पांढरे. पण त्यात तिचा बिचारीचा काय दोष? चल फुट इथून.” विशालचे रौद्ररूप बघून बिचारा काढता पाय घेतो. तेवढ्यात त्याला विशालचा एक नातलग दिसतो.
“साहेब..!” केटरिंगवाला त्याला पकडतो.
“बोला...” नातलग विचारतो.
“माझे पैसे मिळाले असते तर...” केटरिंगवाला वाक्य अर्धवट सोडतो.
“कसले पैसे?”
“जेवणाचे...”
“लोक जेवले?”
“नाही ना, न जेवताच निघून गेले.”
“जर लोक जेवलेच नाहीत तर पैसे कसले?”
“अरे? मी तर माझे काम केले ना?”
“पण लोक जेवलेच नाहीत तर पैसे कसे द्यायचे?”
“कसेही द्या, रोख द्या किंवा चेकने द्या... पण द्या...” केटरिंगवाला ही वैतागतो.
“अरे जर लोक जेवले असते तर दिलेच असते ना...” अगदी शांत स्वरात नातलग म्हणतो आणि बिचारा केटरिंगवाला कपाळावर हात मारून घेतो.
-- गप्पिष्ट नाशिककर, मिलिंद जोशी...
केटरिंगवाला

175 

Share


Milind Joshi
Written by
Milind Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad