आयुष्यात न पुसलेली आठवण.
नवीन लग्न झालेल्या अनुने सासूबाईंकडून खूप लाड पुरवून घेतले. अनु होतीच लाघवी. पेठ्यांची लेक गोडबोल्यांची सुन झाली होती. संस्कारी असल्याने बोलाचालीत नम्रता शिवाय नोकरीं करणारी सगळेच वाखाणण्याजोगे. प्रणव एकुलता एक लेक. अनु सारखी बायको मिळाल्याने प्रमिला ताईंना आकाश ठेंगणे झालं होतं. यथावकाश अनुने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सान्वीच्या रूपाने प्रमिला ताईंना घरात लक्ष्मी आल्यागत वाटायला लागले.
अनुची नोकरीं सुरु होती. सान्वी ला पाळणाघरात ठेऊन ती जात होती. पाळणाघरातल्या काकूंचा सान्वीला चांगलाच लळा लागला होता. प्रमिला ताई हल्ली त्यांच्या भिशी, छोट्या ट्रिप, मैत्रिणीबरोबर बाहेर जेवायला यात मश्गुल होत्या. सुरवातीला अनु ला सारख्या म्हणायच्या की यांचं आजारपण करून थकले मी. किती वर्ष अंथरुणाला खिळून होते. कुठं म्हणून बाहेत जाता आलं नाही. अनुनेच त्यांना सांगितले आता मी घरातलं बाहेरचं पहाते. सान्वीला पाळणाघर लावू या. जणू काही प्रमिला ताईंच्या मनातलंच अनु बोलली. त्यामुळे सान्वी मध्ये अडकून पडायचा प्रश्न सुटला होता. अनुने जबाबदारी घेतल्याने सगळे प्रश्न मिटले होते. पण प्रमिलाताईंचे घरात होणारे दुर्लक्ष अनुच्या लक्षात यायला लागले होते.
खरं तर प्रसंग किरकोळच होता. दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यामुळे अनुने नाटकाची दोन तिकिटं बुक केली. सासूबाईंना सांगितले प्रणव आणि ती नाटकाला जाणार म्हणून. प्रमिलाताई म्हणाल्या सान्वी ला घेऊन जाणार ना. आता हा विचार अनुने केला नव्हता. तिला वाटले आजच्या दिवस सान्वी सासूबाईंसोबत झोपेल. आता अनु ला वाटले नाटकाचा बेत कॅन्सल होतोय का काय पण तिला कोणत्याही परिस्थितीत नाटक कॅन्सल करायचे नव्हते. प्रणव पण तिला म्हणाला आईची तयारी नाही तर आपण नाटक कॅन्सल करू. एवढं काय पण अनु तिच्या स्वभावाच्या विरुद्ध वागली. एरवी ती सगळ्या गोष्टी खूप शांततेने घेत होती. खरच आज तिचा बांध फुटला. तिने पाळणाघरच्या काकूंना फोन करून सांगितले आम्ही नाटकाला जात आहोत आज रात्रीला सान्वी ला तुमच्या घरी ठेवले तर चालेल का काकूंनी होकार दर्शविल्या वर सान्वीच खाणं-पिणं दुधाची बाटली कपडे सगळ्या गोष्टींची बॅग भरून तिला पाळणाघरात ठेवून काकूंना थँक्यू म्हणून नाटक बघायला गेली. सकाळी साडेआठ वाजता सान्वीला घरी आणले.
सान्वी आता मोठी होऊन तिचं लग्नही होऊन तिला मुलगा झालायं . तरीही अनुच्या मनात एक खंत राहिली ती राहिलीच . सान्वीला रात्री पाळणाघरात ठेवून नाटक बघायला जाणं कितपत योग्य होतं. आपण तिच्यावर अन्याय केला. हा प्रसंग ती कधीच विसरू शकत नाही. सासूबाई काय म्हणाल्या यापेक्षा सान्वीला पाळणाघरात ठेवून नाटक बघितले आणि आपली हौस कसली एकप्रकारची वासनाच भागवली की . आजही सान्वीच्या मुलाला सांभाळताना ही गोष्ट तिच्या मनाला अपराधीपणाची जाणीव करून देते.