Bluepad | Bluepad
Bluepad
धोका
हर्षदा सचिन गावंड
हर्षदा सचिन गावंड
5th Aug, 2022

Share

      नदीकाठी बराच वेळ त्याची वाट पाहत होते. सकाळची कोवळी उन्ह सरून सूर्य तळपायला लागला. कातळावर वाळत घातलेले कपडे सुद्धा निम्मे वाळले तरी त्याचा पत्ता नव्हता. सुरवातीच्या रागाच रूपांतर आता काळजीत होऊ लागल. मनात चित्रविचित्र शंकाच काहूर उठलं. आपल्या दादाला तर आपल्या दोघांबद्दल कळलं नसेल ना! की त्याला येताना काही अपघात वै. झाला..काहीच कळेनासं झालं होत. उशीर तर चांगलाच झाला होता. आता फार वेळ थांबण्यात अर्थ नव्हता, उशीर का झाला याची काय कारण द्यायची आईला या विचाराने मन भांबावून गेलं. आईला सांगावं कि या गावातल्या बायका कसल्या कपडे धुवायला जागाच देईनात त्यांचं उरकेपर्यंत थांबावं लागलं. नकोच ,आई म्हणेल परसातली विहीर सोडून तुला नदीवर कपडे धुवायला जाईची गरजच काय होती? त्यापेक्षा रखमा भेटली होती असं सांगावं , नाही तरी मेली भेटली कि तास-दीड तास खातेच . आईचाही विश्वास बसेल.
       लगबगीने अर्धवट वाळलेले कपडे गोळा करून सोबतच्या बादलीत भरले. बांधावरून खाली उतरताना मन सारखं मागे वळून पहात होत. आपण निघू आणि तो यायचा. छे ! आपण उगीच घाई केली निघायची. आजच तर नदीजवळच्या उंबराजवळ भेटायचं ठरवलं होत. त्याने वेळेत यायचं ना ! दादा परत तालुक्याला गेल्यापासून आई एकटीच सार सांभाळते,तीला जमेल तशी मदत करते पण तीचा सारखा घोषा चालू असतो,'तुझं शिकण्याचं वय आणि तू स्वतःला कामाला जुंपून घेतलंस. दादाच ऐक आणि तालुक्याला जाऊन तुझं शिक्षण पूर्ण कर.' आता तिला कस सांगावं माझं मन कुठे गुंतलं होत ते.
       घरी पोहोचल्यावर कपडे वाळत लावले आणि आईला सांगायची सबब मनात घोळवत माजघरात गेले. 'बरं झालं आलीस , अचानक १०० पोळ्यांची ऑर्डर आलीय वाड्यावरून. जरा पूरण वाटून दे मला पटकन मी बाकीचं उरकते. दुपारी घेऊन जायच्यात ' वाड्यावरून ऑर्डर म्हटल्यावर माझं काळीज हाललं. त्याच्या आठवणीने मन भरून आलं. समाधान एव्हढच कि वाड्यावर सार ठीक आहे, दुपारी वाड्यावर जाईन तेव्हा कमीतकमी त्याला पाहता येईल. 
       या पोळ्या नेहमीच मदतीला धावून येतात. एव्हढच कश्याला आपली पहिली भेटसुद्धा या पोळ्यांनीच घडवून दिली. खोतबाई सदा आजारी त्यामुळे सणावाराला आईला गोडाधोडाची ऑर्डर असे. आईला चांगले पैसे तर मिळायचेच आणि खोतबाई सणावाराला साडीचोळी पण द्यायच्या. आई तोंड भरून कौतुक करायची पण खोतबाईचं ते भीक घातल्यागत हक्काचे पैसे हातावर ठेवणं कुठे तरी खटकायच. सदा अंथरुणात आणि कसल्या ना कसल्या आजारात लोळणारी खोत बाईच्या नजरेत मला आईसाठी आणि माझ्यासाठी असूया दिसायची. पण आम्हाला सगळ्यात मोठी ऑर्डर वाड्यावरूनच मिळायची.
गौरींच्या दिवसाची पोळ्यांची ऑर्डर आईला आली. आम्ही दोघींनी खपून पोळ्या बनवल्या. डब्ब्यात नीट रचल्या आणि आईच्या सांगण्यावरून मी तो डब्बा पोहचवायला वाड्यावर गेले. माज घराच्या मागल्या दाराने रखमेला शोधत आत गेले तर रखमेचा पत्ता नाही आता डब्बा ओट्यावर ठेवून परत फिरावं की खोतबाईच्या ताब्यात द्यावा हा विचार करत मी माघारी फिरले आणि कोणावर तरी धडकले. मान वर करून पाहिलं तर चक्क धाकले मालक. खोतांचे एकुलते एक चिरंजीव या वाड्याचे धाकले मालक मुंबईला शिकायला होते आता शिक्षण संपवून गावी आलेले. तस या आधी मी त्यांना एकदोनदा पाहिलं होत पण एवढ्या जवळून पाहण्याची पहिलीच वेळ होती. ते गोड हसले,' वा! पोळ्या आल्या का. आता त्या देणार पण आहेस की परत घेवून चाललीस?' माझ्याकडे मिश्किल पाहत ते म्हणाले आणि लाजेने माझं पाणी पाणी झाल. त्यांच्या देखण्या रुपावर, त्यांच्या ऐटदार बोलण्यावर मी भाळले होते. त्यांच्या हातात डब्बा देत मी लाजेने तिथून अक्षरशः पळून आले. संध्याकाळी दारात रांगोळी घालताना कोणी तरी खाकराल म्हणून वर पाहिलं तर धाकले मालक समोर उभे.' तुझ्या हातात जादू आहे पोळ्या इतकीच झकास रांगोळी काढलीस की. ' खर तर रांगोळी यथा तथाच होती पण त्यांच्या शब्दांनी मी मोहरुन गेले. त्यांनी पोळ्यांचा रिकामा डब्बा पुढे केला. ' तुम्ही का कष्ट घेतलेत रखमेने आणून दिला असता डब्बा.' मी आवाज शक्य तेवढा सामान्य ठेवत बोलले. ' का? मी आलेलं आवडलं नाही का?' त्यांनी सहज प्रश्न केला आणि उत्तरा दाखल माझ्या गालांवर लाजेची लालिमा पसरली.
त्यानंतर आम्ही वारंवार भेटत राहिलो. त्यांच्या सोबत मी अगदी हुरळून जायचे. त्यांच्या कौतुकाचे शब्द खूप खोलवर उमटायचे परत परत ऐकावेसे वाटायचे. उघड उघड भेटणं शक्य नव्हतं मग चोरून भेटी व्हायला लागल्या. नदीकाठी पारामागे सगळ्यांच्या नजरा चुकवून आम्ही भेटू लागलो. मागल्या खेपेच्या भेटीत त्यांनी माझा हात हातात धरला आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून मला म्हणाले,' काहीही झालं तरी मी तुला मुळीच अंतर देणार नाही. मी लवकरच घरी सांगेन आणि वाजतगाजत तुला वाड्यावर नेईन.' त्या क्षणी मला आभाळ ठेंगणं झालं होत.
' अग किती रगडशील?पार पीठ झालं त्याच उरक लवकर उशीर होतोय.' आईच्या आवाजाने मी स्वप्न रंजनातून बाहेर आले. झटझट सार उरकून पोळ्या घेवून वाड्यावर गेले. वाड्यावर आज निराळाच रंग होता. सारा वाडा आज एकदम उजळून निघाला होता. खोत बाई सुध्धा चक्क अंगात चैतन्य आल्यागत इकडे तिकडे करत होत्या. वाड्यावर आज बरीच पाहुणे मंडळी दिसत होती. मी नेहमीप्रमाणे मागल्या दाराने माजघरात गेले पण माझी नजर सारखी धाकल्या मालकांना शोधत होती. मला बघताच रखमा लगबगीनं पुढं आली,' किती ग येळ लावलास, आता पंगतीला घेतील अन ताटात गोडाचच न्हाय तर सोयाऱ्यांसमोर इज्जत राहील का मालकांची?'
सोयरे कोण सोयरे? कोणाचे सोयरे? मला काहीच कळेना. माझा गोंधळलेला चेहरा पाहून रखमाने माझा हात पकडुन मला माजघराच्या दाराशी नेल.
' अशी काय करतीस गाढवावानी. आपल्या धाकल्या मालकांच लगिन व्हनार. ती तिकडं मालकीण बाईसोबत गोरीपान पोरगी बसली या नव्हं ती या घरची नवी मालकीण बाय व्हनार हाय. दोगबी एकच कालेजात शिकत व्हते. प्रेमाची भानगड हाय पण पोरगी कशी लाखात येक.तीगस्ता च लगीन ठरलं व्हतं पण धाकले मालक शिकत व्हते नव्हं का. आता यंदा बार उडवणार बघ. तुझ्या आईला पण लई काम मिळलं बघ आता. लई पैशेवाली, शरातली मालदार पार्टी हाय. नुसती बोलणी करायला आली तर समद्यासनी नवं कापड केलं. धाकल्या मालकास्नी सोन्याचा गोफ बी क्येला. ' आणखीन ती बरच काय काय बोलत होती पण माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. काहीच दिवसांपूर्वी तर त्यांनी माझा हात हातात घेवून मला कधीच अंतर न देण्याचं वचन दिलं होत.
डोळ्यातले अश्रू आवरत मी मागल दार गाठलं. मागल्या परसातून मी घराकडे धावत सुटले. पण कुंपणाजवळ ते उभे होते. मला पाहताच ते इकडे तिकडे नजर टाकत पुढे आले आणि माझा हात पकडुन मला आडोश्याला नेल.
माझा हात हातात  घट्ट पकडत ते म्हणाले,' हे बघ, तू अजिबात काळजी नको करूस मी माझ्या लग्नानंतरही तुला अंतर देणार नाही.'
त्यांच्या त्या वाक्याने मला प्रचंड शिसारी आली. काय वाटले मी यांना. एखादीच्या संसाराची राख रांगोळी करून त्याच्या वर माझा महाल बांधण्या इतकी मी खालच्या पातळीची वाटले यांना. मी फणकाऱ्यात माझा हात काढून घेतला. त्यांच्यापेक्षा ही मला माझ्या मूर्खपणाची चीड येत होती. त्यांचं त्या मुलीवर प्रेम होत. त्यांचं तिच्यासोबत लग्नही ठरलं होत आणि तरीही ते माझ्या भावनांशी खेळले. त्यांच ते लागट बोलणं, मला चोरून स्पर्श करणं. माझ्यावर प्रेम असल्याचा दावा सार काही सपशेल खोटं होत. मला दिलेल्या आणाभाका सार काही केवळ मला खेळविण्याचा भाग होता. त्यांनी माझा हात परत हातात घेत माझी समजूत काढायचा प्रयत्न केला. माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. मी हात खसकन ओढून घेतला आणि त्यांच्या श्रीमुखात एक ठेवून दिली. ते चमकले मला रागाने दूर ढकलून निघून गेले. संतापाने माझं अंग तापलं होत. अश्रू माझ्या गालावरून ओघळत होते. मी सुन्न होवून ते गेले त्या दिशेला पाहत राहिले. पण काही क्षणच. आज एका घातक वळणावरून मी सुखरूप परत आले होते.आत काहीतरी प्रचंड तुटलं होत. विश्वासचं असावा तो.
घरी कधी आणि कशी आले मलाच कळलं नाही. आई देवासमोर दिवा लावत होती. मी तशीच वेगाने तिच्या कुशीत शिरले.
' आई, दादाला कळव मी पुढे शिकणार आहे. आपण सगळे तालुक्याला जावून राहू.'
आईने क्षणभर आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली.
' गुणाची ग बाय माझी. आता दादा आला की त्याला सांगेन त्याला फार बरं वाटेल बघ. खूप शिक. खूप मोठी हो.'
मी हुंकार देत मान हलवली आणि माझ्या डोळ्यातले अश्रू डोळ्यातच गोठून गेले.
 

177 

Share


हर्षदा सचिन गावंड
Written by
हर्षदा सचिन गावंड

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad