Bluepad | Bluepad
Bluepad
कथा
v.deva:Official641
v.deva:Official641
5th Aug, 2022

Share

म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस.टीत घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत... सकाळी पाच वाजता उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाचा उघडण्याची वाट बघत...कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही बघतो. मग एके काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं... दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घश्यात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरुन सोसायटीच्या गार्डन मध्ये थकलेल्या शरीलाला नेवून बसवतो. पलीकडून कानात हेडफोन घातलेली हॉफ पॅन्ट वाली एक बाई तिच्या इंग्लिश कुत्र्याला "रिकामं" करायला घेवून जाताना त्याला कोपऱ्यात दिसते. मग वस्तीवरच्या बंद घराबाहेर मागं एकटच उरलेल्या 'राजा कुत्र्याच्या' काळजीने म्हातारा कासावीस होतो. 'वस्तीवरचे शेजारी त्याला भाकरी घालत असतील का?' या एकाच विचाराने तो बराच वेळ शून्यात हरवून जातो. पार आतून घुसळून निघतो. ऐकुलता एक नातू पार्किंग मधे आलेल्या स्कुल बसने जाताना "बाबाss बाय बायss" अशी आरोळी देतो तेव्हा मात्र जाड भिंगाचा चश्मा सावरत त्याचा थरथरता हात अलगद वर जातो आणि ऊर भरून येतो...दुपारी झोपुन उठल्यावर सुन त्याला शिल्लक राहिलेली मैगी डिश मधून पुढे ठेवते. मग खाता खाता त्याला वस्तीवरच्या लिबांच्या झाडाखाली उन्हाळ्यात म्हातारीने वाऱ्यावर शेवाळ्याचा साज मांडल्याचे आठवते. तसा तो म्हातारी गेल्यापासून प्रत्येक गोष्टीत तिला शोधू पाहतोय...रात्री उशिरा पर्यंत हॉलच्या सीलिंगला अंधारात चमकणाऱ्या निर्जीव चंद्र आणि चांदण्यात तो म्हातारीला शोधत राहतो...क्षणभर गावाकडं लेकीच्या घरी जावून राहता येईल का? असा विचार मनात येवून जातो. पण जावायाच्या दारात राहिलो तर गाव शेण घालील की तोंडात या विचाराने तो परत अस्वस्थ होतो...आणि म्हातारीच्या जीवघेण्या आठवणीने त्याचा उरलेला सांगाडा या कुशीवरून त्या कुशीवर नुसता रात्रभर तळमळत राहतो..!
कथा

190 

Share


v.deva:Official641
Written by
v.deva:Official641

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad