Bluepad | Bluepad
Bluepad
देह झाला देहू
धनश्री अजित जोशी
5th Aug, 2022

Share

ओलसर हवा..आकाशात ढग ..खालून वाहणाऱ्या नदीने सामावून घेतलेले त्यांना..त्यामुळेही काहीशी संथ वाहणारी ..
देह झाला देहू
तुकाराम पादुकांजवळ आले.नेहमीप्रमाणे त्या विठूरखमाई पुढे नतमस्तक झाले..तुकाराम महाराजांचे अंतःकरणापासून स्मरण केले..सहजच त्या देहूच्या राजाला हात जोडले .
मनात वाजू लागला सोपानराव चौधरींचा अभंग..
शब्दांचे विलक्षण गारूड मनावर राज्य करू लागले..कळतनकळत त्या शब्दांचा हात धरून पुढे चालू लागले.
मागुती स्वर आणि ताल हातात हात घालून आले.
विलक्षण अनुभूती आली.अजूनही मन त्यातून माघारी फिरायला मानत नाहीए..
आली कुठूनशी कानी ,
टाळ मृदुंगाची धून ,
नाद विठ्ठल विठ्ठल ,
नाद विठ्ठल विठ्ठल ऊठे .रोमरोमातून !
नभी तेलात नहाली ,
चंद्रप्रभा चंद्रायणी,
बोले शब्देविण काही ,
चंद्रासवे इंद्रायणी.
इंद्रायणीच्या पाण्यात ,
शहारले अंग अंग ,
मन झाले ओले चिंब ,
जैसे भिजले अभंग..
तोंडात खडीसाखर विरघळावी ..आणि तिची गोडी पसरत जावी तसे झाले.
काय विलक्षण शब्द आहेत..सुंदर चित्र आपण बघतोय असे वाटते..
रात्रीची वेळ आहे.गावच्या मंदिरात भजन चालले आहे.त्याचे स्वर कानावर येत आहेत.
आकाशात चंद्रकोर विलक्षण तेजाने तृप्त आहे..तिचे प्रतिबिंब इंद्रायणीत पडले आहे.जणू काही त्यांच्यात शब्दावीण संवाद चालू आहे..
इंद्रायणीच्या पाण्यात मन भिजून गेले आहे..ओले चिंब झाले आहे..कसे तर ज्याप्रमाणे तुकारामांचे अभंग झाले होते ना तसे
..काय विलक्षण शब्दाचा खेळ आहे..प्रत्येक वेळी ही ओळ म्हणताना वेगळाच अर्थ उलगडत जातो..
मनात शब्द एकापाठोपाठ येत होते..त्यांचा हात धरून मी चालत होते.
वृक्ष दिसला समोरी ,
काय सांगू त्याची शोभा,
जसे कटिवरी हात ,
युगे अठ्ठावीस उभा ,
भूक नयनांची सरे ,
मूक वाचा ये रंगात.
माझा देह झाला 'देहू ',
तुकयाच्या अभंगात.
..
समोर दिसणारा वृक्ष हा कटीवर हात ठेऊन उभ्याअसलेल्या त्या पांडुरंगासारखा दिसतोय..त्याचे ते विलक्षण रूप पाहून नयनांची भूक क्षमली आहे..आणि एक मुक भाषा रंगात येऊ लागली आहे..मी निःशब्द झालो आहे..
जणू काही माझा देह "देहू " झालाय..
अहाहा काय सुंदर कल्पना आहे..देह देहू होणे.
शब्द ताल सुरात रंगून गेले..त्यांचा हात धरून वावरत..राहिले..देह देहू होण्या इतकी आपली तपश्चर्या नाही..पण त्याची क्षणिक अनुभूती ही विलक्षण मोहून , भारावून टाकणारी.
असा अनुभव मी देहूला घेतलाय ..देहूच्या मंदिरात लिहिलेले तुकारामांचे अभंग..एकापाठोपाठ भारावल्या सारखे वाचले..नंतर पाठच्या दरवाज्याने बाहेर आले..इंद्रायणी संथ वाहत होती..उन्हातसुध्दा कुठूनतरी वार्‍याची छान झुळूक आली
.काय होतंय कळलेच नाही..तुकारामांचे अभंग मनात रेंगाळत होते.. कुठेतरी शब्दाविना संवाद घडत होता..
कधी डोळे झरू लागले कळलेच नाही..
ते आनंदाश्रू होते..ऐवढं मात्र नक्की.
देह झाला देहू

167 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad