Bluepad | Bluepad
Bluepad
त्या तिघी
Rajashri Bhavarthi
Rajashri Bhavarthi
5th Aug, 2022

Share

*#त्या_तिघी....*
( सावरकर घराण्यातील वीर स्त्रिया )
*#भाग_४८*
विश्वासला माईंचं सगळं यथासांग करायचं होतं पण तात्यांना कोण समजविणार ?... ते कोणाचं ऐकतील ? दुसऱ्या दिवशी ताई नेहमीप्रमाणे सदनावर गेल्या तर सदनापुढे लोकांची खूप गर्दी होती. कारण काय तर ल.ग. थत्ते ( हिंदूमहासभेचे कार्यकर्ते ) सदनासमोर सत्याग्रहाला बसले होते का तर तात्यांनी माईंचे धर्मविधी करावेत म्हणून ! पण तात्यांनी आपला निश्चय सोडला नाही...! ताईंनी विश्वासला सांगितलं की , तुला तुझ्या आईचं उत्तरकार्य व्यवस्थित व्हावं असं वाटतंय ना ? तर तू तात्यांना जाऊन विचार ना ! पण तात्यांना विचारायला कोणी धजेना...! शेवटी ताईंनी हिंमत करून विचारले , "भावोजी , माईंचे दिवस इथे मुंबईत करायचे की नाशिकला गंगेवर जायचे ?"
वहिनी तुझी ही ह्या असल्या विधीवर श्रद्धा आहे ? पिंडदान...बारावा, तेरावा...ह्या रूढी पाळाव्या असं वाटतं तुला ? ...भावोजी , गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून हे विधी करावेत असं धर्मशास्त्रात सांगितलंय ना ! म्हणजे , वहिनी...तुला ह्या आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं कर्मकांड , रूढी मान्य आहेत तर...तू अशी का राहिलीस ? ताई बावरल्या.. अशी म्हणजे काय भावोजी..? म्हणजे सकेशा . केशवपनाची रूढी पाळली नाही ना तू !
ताई जरा ओरडूनच बोलल्या , तात्या 'ती' रूढी आणि 'ही' रूढी ह्यात फरक आहे. आत्म्याचं पिंडदान करणं वेगळं. आणि तात्या मी 'तशी' ( सोवळी ) झाली असते तर तुम्हाला बरं वाटलं असतं का ? ...
तात्या निरुत्तर झाले पण म्हणाले , " वहिनी , मी हे सगळं करणार नाही इतकंच ! "
ताईंनी विचारलं म्हणजे विश्वासनं केलं तर तुमची हरकत नाही ना ?.....
त्याच्या इच्छा अन् व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड मी येणार नाही आणि हे विधी करताना उपस्थित ही राहणार नाही - इति तात्या...!
ताईंनी विश्वासला बरोबर घेऊन गुरुजींना बोलावून सर्व व्यवस्था केली. दहाव्या दिवशी माईंची बहीण , भाऊ व हे सर्वजण एकत्र जमले. विश्वासच्या हातून पिंडदान करवलं पण पिंडाला कावळा काही शिवेना ! शेवटी ताईंनी विश्वासला जवळ बोलावून सांगितलं , की असे म्हण , " तात्यांचं काही कमी करणार नाही. त्यांचं सर्व व्यवस्थित करू आम्ही. " विश्वासनं असं सांगितल्यावर लगेचच पिंडाला कावळा शिवला. यथावकाश १२ , १३ , १४ व्या चे विधी ही पार पडले.
ताई , आता रोज सदनात एक चक्कर मारायच्या. शेकडो लोक रोज तात्यांना भेटायला येणार तेंव्हा घरचं बाई माणूस हवंच ना ! तात्यांना हे सारे उपचार बिलकुल आवडत नव्हते. रोज ताई जात होत्या...! तात्यांनी विचारलं , " का ग वहिनी , आज लवकर आली !" ताईंनी जरा धिटाईनंच उत्तर दिलं. आवश्यक आहे येणं म्हणून आले....त्यावर तात्या म्हणाले , रोज येणार ?...होय , सध्या १० - १५ दिवस तरी , मग पुढे बघू...का हो तात्या , तुमची इच्छा नाही का ? मी यावं म्हणून..? तसं नाही ग ! रोज येत जा. तुझा हक्कच आहे तो ! नंतर एक दिवस तात्या म्हणाले , " वहिनी , तू खरोखरचं खूप हिंमतवान आहेस . जे मनाशी ठरवते , ते करतेच !" ताईंना काही संदर्भ लागेना ! त्यावर माईंच्या अंत्यविधीच्या संदर्भात..! असं तात्या बोलले. तात्या तुम्हाला दुखावलं का ? चुकीचं केलं का मी..? तसं नाही ग , वहिनी पण मी कधीच लहानपणापासून पूजा , पाठ , विधी , व्रत- वैकल्ये यावर विश्वास ठेवला नाही. माझा विश्वास आहे फक्त आंतरिक शक्तीवर !
हा तुमचा दृष्टिकोन झाला भावोजी पण माई किती देवभोळ्या होत्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल असं आपल्याला करायलाचं हवं ना !..तुझं कौतुक वाटतंय वहिनी...!माझ्या मताविरुद्ध जाऊन माईंचा विचार करून सगळं काही पार पाडण्याची हिंमत दाखवलीस. तुझ्यावरील जबाबदारी आता खूप वाढली वहिनी....अशीच खंबीर राहा अन् माझाही विचार कर...! ताई विचारात पडल्या , तेंव्हा तात्या बोलले..."माझा ही अंत्यविधी विद्युतदाहिनीतच व्हावा. १० , १२ वा असे कोणतेही दिवस पाळले जाऊ जाऊ नयेत....! लवकरच मी मृत्युपत्र करणार आहे , त्यानुसार सगळं व्हावं." ...ठीक आहे भावोजी तुमच्या इच्छेचा मान , आदर राखला जाईल !
तात्यांनी मृत्युपत्र शब्द उच्चारला अन् ताईंच्या मनःचक्षुसमोर तो प्रसंग उभारला. तात्यांनी रचलेली 'माझे मृत्युपत्र ' कविता आठवली...त्यात त्यांनी सारं काही मातृभूमीला अर्पण केलं होतं. मातृभूमीसाठी झटताना असा कोणताही भाव तात्यांनी मनात ठेवला असेल...! त्यानंतर ७ ते ८ महिन्यानंतर तात्यांनी ताईंना एक कागद वाचायला दिला तेच ते मृत्यूपत्र..!
स्थावर मालमत्ता जी होती ती प्रभात अन् विश्वासच्या नावे केली होती. ग्रंथ प्रकाशनाचे सर्व अधिकार बाळराव सावरकरांना दिले होते. बाळरावांनी त्याची भक्तिभावाने सेवा केली होती. १५ - १६ वर्षे कार्यवाह पद सांभाळले होते. विश्वासच्या मुलीसाठी काही रक्कम , शुद्धीकार्यासाठी 'शुद्धी - निधी ' पाच हजार रुपये ठेवले. तर विक्रमच्या नावाने दोन सहस्त्र रुपये ठेवले. त्याच पैशाने विक्रमने फटफटी घेतली. जी तो स्वतःच्या जिवापेक्षाही जास्त त्या फटफटीला जपतो. तात्यांची आठवण म्हणून त्याने ती जपून ठेवली आहे. उरलेली रक्कम प्रभातचा मुलगा प्रफुल्लसाठी व शेवटी स्वतःच्या अंत्यसंस्काराविषयीच्या सूचना लिहून ठेवल्या होत्या....!!
क्रमशः
( संदर्भ -
त्या तिघी : डॉ. सौ. शुभा साठे लिखित कादंबरीमधून साभार )
✒️ सौ राजश्री भावार्थी
पुणे
त्या तिघी

169 

Share


Rajashri Bhavarthi
Written by
Rajashri Bhavarthi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad