Bluepad | Bluepad
Bluepad
अत्त दीप भव
undefined undefined
undefined undefined
15th Jun, 2020

Share


अत्त दीप भव


कोरोना काळापूर्वी काही दिवस आधीच "छीछोरे" पाहिला होता. त्याला कारण त्यातील 'कंट्रोल' हे गाणं.  गाण्यावरून सिनेमा काहीतरी वेगळा वाटत होता म्हणून पहिला. चित्रपट विनोदी असल्यामुळे थोडा विरंगुळा झालाच पण निराशेच्या गर्तेत असलेल्या मनाला थोडी उभारी मिळाली. कारण होतं सुशांत सिंग राजपूत.

नैराश्याग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या मुलाला 'आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये कसे छिछोरेगिरी करणारे लूजर होतो पण जेव्हा जिंकण्याचा निर्धार केला तेंव्हा कशी बाजी मारली" हे आपल्या मुलाला सांगणारा सुशांतच नाही तर त्याची सर्व गँग खूप दिलासा देऊन गेली होती. पण आज त्यालाच अशा प्रकारे आयुष्यातील आव्हानांसमोर हार पत्करताना पाहिलं तेंव्हा वाटलं, आपल्याला चार निवांत आणि आनंदी घटका देणारे सर्वच कलाकार असेच असतात नाही का? आपण सिनेमा आणि आयुष्य यात फरक करत नाही. सिनेमा जे दाखवतो ते Larger Than Life असतं असं आपण मानतो. पण सिनेमा म्हणजे आयुष्य नाही ह्या वास्तवाचं भान त्या भूमिका प्रत्यक्ष जगणाऱ्यांना असतंच. सुशांतची स्क्रीन स्टोरी तर आपल्याला माहित आहे.पण त्याच्या आयुष्याच्या पटकथेत काही तरी घोळ झाला असावा आणि त्या घोळात खितपत पडण्यापेक्ष मृत्यूला कवटाळणं ह्या राजपुताला जास्त योग्य वाटलं असावं. त्या कुठल्याश्या बोचऱ्या दु:खाची, लसलसत्या खेदाची, भविष्यातील परिणामांच्या विवंचनेची मुळं किती खोलवर रुतली असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एक सुंदर करिअर हात जोडून समोर उभं असताना इतका पराजयी विचार त्याने केला आणि त्याच्या विवंचनांमधून त्याने आपली सुटका करून घेतली.

पण मृत्यू सगळ्यावरचा उपाय नसतो तर ती पळवाट असते. सुशांतने ही पळवाट का निवडली हा प्रश्न केवळ सुशांतच्या गूढमृत्यू भोवती एक वलय निर्माण करण्यासाठी नाही तर आजच्या संपर्क माध्यमांच्या विस्फोटाच्या काळात नेमकं आपण कुठे कमी पडत आहोत यावर गांभीर्याने चर्चा करण्यासाठी विचारला जात आहे. सुशांतने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी चंदेरी दुनियेत कोणीही गॉडफादर नसताना प्रचंड यश मिळवलं. छोट्या पडद्यावर गाजलेल्या पवित्र रिश्ता ह्या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या सुशांतने लवकरच काय पो छे’, शुद्ध देसी रोमॅन्स, डिटेक्टीव ब्योमकेश बक्षी, एम एस धोनी, केदारनाथ, छिछोरे असे सुपरहीट सिनेमे दिले आणि यात त्याच्या कामांची खूप प्रशंसा देखील झाली. यातील काही भूमिकांसाठी त्याला परितोषिक तर काहींसाठी नामांकन मिळालं. दरम्यान त्याने डान्स रीयालिटि शो पण केले. म्हणजेच सुशांतने प्रेक्षकांच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टीत प्रवेश केला आणि तिथे यशस्वी सुद्धा झाला. त्याची काही प्रेम प्रकरणं देखील गाजली. थोडक्यात छोट्या पडद्यावरचा हा कलाकार पुर्णपणे लाईमलाइटमध्ये आला होता. काही महिन्यात त्याचा ‘चंदामामा दूर के’ हा नवाजुद्दीन सिद्दीकी सोबतचा सायन्स फिक्शन सिनेमा सुद्धा झळकणार होता. एवढं सगळं चांगलं असताना त्याने आयुष्य संपवलं. यावरून एक कळतं की त्याला जो काही त्रास, वेदना होत होत्या त्या तो सहन करू शकला नाही किंवा त्याच्या उफळणार्‍या भावनांवर ताबा मिळवू शकला नाही. ही वेळ अन्य कोणावर येऊ नये म्हणून मला काही सांगायचं आहे. थोडं कडवट वाटेल पण उपयोगी पडेल.

आज प्रत्येक जण मेसेज करून आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकून सर्वांना सांगत आहेत की तुम्ही बोला, व्यक्त व्हा, दु:ख वेदना आतल्या आत दाबू नका, शेअर करा. असं सांगणार्‍या प्रत्येकाचे खूप खूप आभार. पण खरं सांगा एखाद्याला आपल्या मनातलं सर्व बोलून टाकण्याची ज्यावेळी गरज असते, कोणी तरी ऐकणारं असावं, कोणाची तरी सोबत असावी असं वाटतं तेंव्हा खरंच आपण तिथे असतो का? ९०% वेळा नाही. कारण असतं आपले व्याप. पण तुम्ही दु:खी असाल तर कोणालाही न सांगता सुद्धा तुम्ही यातून बाहेर पडू शकता. कोणी सोबत नसलं तरी काही गोष्टी सदैव तुमच्या सोबत असतात. त्या आहेत-

१. तुम्ही स्वतः - तुम्ही जर एखाद्या समस्येला कुरवाळत बसलात तर ती समस्या तुम्हाला सोडून कशी जाईल? आधी ती स्वत: पासून दूर करा. तरच तुम्ही तिच्याकडे तटस्थपणे पाहू शकाल आणि तुम्हाला समजेल की ती समस्या तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही. आता तिला तुम्ही स्वतः पासून दूर कसे कराल? सोप्पंय.
२. Distraction - मन दुसरीकडे वळवणे - आपलं शरीर जसं एक स्वयंपूर्ण हॉस्पिटल असतं तसंच मन ही एक प्रयोगशाळा असते. इथे अनंत प्रकारचे हॉर्मोन्स आपले प्रताप दाखवत असतात. तुम्ही खुश असता तेंव्हा गुड हॉर्मोन्स आणि दु:खी असता तेंव्हा बॅड हॉर्मोन्स स्त्रवित होऊन रक्तात मिसळतात. जर बॅड हॉर्मोन्स रक्तात मिसळले तर त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो रोज दु:खी राहिल्याने तो वाढत जातो. त्यामुळे कितीही दु:खी असलात तरी स्वतःला जबरदस्तीने का होईना पण खुश ठेवा. त्यासाठी युट्युब वर एखादा कॉमेडी प्रोग्रॅम पहा. सोशल मीडिया वरील ट्रोलिंग आणि एकमेकांवर कुरघोडी करणार्‍या पोस्ट वाचू नका. हलती बोलती माणसं असणारे विनोदी नाटक, सिनेमा, स्कीट्स पहा. जसे की चला हवा येऊ द्या, व्यक्ती आणि वल्ली, लहान मुलांचे विडिओ जसे Kids Arguing with Dad,  Big Shot By Steve Horway, मुलांसाठी बनवलेले गोष्टींचे व्हिडीओज, इत्यादी पहा. ह्या गोष्टी तुम्हाला आनंद देतील.
यातून बरं वाटलं की 'मेलुहा' सारखी हलकी फुलकी कादंबरी वाचा. यावेळी वैचारिक, ऐतिहासिक किंवा अभ्यासाची पुस्तकं वाचू नयेत. पण प्रत्येकाची आवड वेगळी असते त्यामुळे तुम्हाला वैचारिक वाचनाने बरं वाटणार असेल तर ते वाचा. 'मेलुहा' मध्ये अगदी प्राचीन काळातील मनोरम चित्र उभं केलं आहे. त्यामुळे ते वाचताना तुमच्या मनात ते चित्र आकार घेऊ लागतं. साहजिकच तुमचं मन वेगळ्या गोष्टीत गुंतून जातं. म्हणून मी इथे मेलुहाचा उल्लेख केला.
३. खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. हे शरीरासाठीच नाही तर मनासाठी सुद्धा फार आवश्यक आहे. आपल्या शरीरावर आपल्या मनाचा ताबा असतो. तुम्ही सकाळी लवकर उठता तो असतो निर्धार - मनाचा निर्धार. अशाच सर्व वेळा पाळणं म्हणजे मनाला शिस्त लावणं. शिस्त लागलेलं मन प्रत्येक कृती विचारपूर्वक करतं. अपवाद आहेत. पण आपण इथे सर्व सामान्यपणे होणाऱ्या गोष्टी बोलत आहोत.
४. मनात जे काही असेल ते लिहा. वरील उपाय करण्याआधी आणि केल्यानंतर सुद्धा लिहा. यात माझं काय चुकलं, कोणाचं चुकलं, कोण बरोबर होतं, माझी किंवा इतर कोणाची चूक एवढी मोठी होती का की तिला माफ करता येणार नाही? मी आता काय करायला हवं? हे सर्व लिहा.
५. लिहिताना सर्वात महत्वाचा मुद्दा. तुमच्या मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण, नातेवाईक यांच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल. ते लिहा. आणि मग तोच सल्ला स्वतःला द्या. स्वतःच स्वतःचे मित्र आणि गाईड व्हा. नैराश्यावर गोळ्या घेण्यापेक्षा हे कधीही उत्तम.
बुद्धाने म्हटलंय ना 'अत्त दीप भव'. जगात तुमच्यासाठी कोणीही रिकामं बसलेलं नाही. सोबत मिळाली तर उत्तम पण जर नाही मिळाली तर तुम्ही स्वतःचे सोबती व्हा. मग अशा एखाद्या व्यक्तीचे सोबती व्हा ज्यांना तुमची गरज आहे. तुमच्यासारखे अनेक लोक आहेत, त्याचे अश्रू पुसा. पण हे तेंव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही ह्या जगात सर्व आव्हानांना सामोरं जात जिवंत रहाल.

जगताना अनेक समस्या, अडचणी आल्या म्हणून जगणं ही शिक्षा म्हणूनही जगू नका आणि भिक्षा म्हणूनही जगू नका. तर नव जीवनाची दीक्षा म्हणून जगा...
चला, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनाच्या प्रयोगशाळेची कवाडं उघडा.... जगा आणि इतरांना जगायला लावा..

57 

Share


undefined undefined
Written by
undefined undefined

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad