Bluepad | Bluepad
Bluepad
पोस्टमन काका
Ashwini Sonawane
Ashwini Sonawane
5th Aug, 2022

Share

पोस्टमन काका
अस्मय ला म्हणजे माझ्या ९ महिन्याच्या बाळाला आज एका पुस्तकातले चित्र दाखवत होते त्यात पोस्टमन च चित्र दिसलं आणि लहानपण आठवलं. खाकी शर्ट पँट, डोक्यावर टोपी, खांद्यावर ती फुटभर लांब नाडी असलेली एक पत्रांची थैली घेऊन सायकलवरून यायचे आणि बाहेरूनच नाव घेऊन जोरात ओरडायचे ते पोस्टमन काका. त्यांचा आवाज येऊन पत्र घ्यायला बाहेर जाईपर्यंत पत्र टाकून त्यांचा मोर्चा पुढच्या घराकडे वळलेला असायचा आणि मग मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून जरा नाखुशिनेच घरात यायचे. पूर्वी पोस्टमन काका हा घरातील प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असायचा. अनायसे त्यांचा चेहरा बघायला मिळालाच तर त्यांना पाणी आणि चहा विचारल्याशिवाय मात्र जाऊ द्यायचं नाही हा जसा अलिखित नियमच होता. आत्ताच्या मुलांना बहुधा पोस्टमन काका चित्रातच बघावे लागणार. अलीकडेच वाचनात आल की आता पोस्टमन ही सज्ञा बदलून पोस्टपर्सन ही सज्ञा वापरण्यात येणार आहे. (स्त्री - पुरुष समानता) म्हणजे आता मुलांना पोस्टमन शब्दही ऐकायला मिळणार नाही. असो. पोस्टमन काका येणार किंवा येऊन गेले तर ते देऊन गेलेल्या पत्रातली बातमी वाचण्याची फार उत्सुकता असे. पूर्वी एक अजून छान संकल्पना अस्तित्वात होती गेल्या दशकापर्यंत लोक प्रत्येक सणाला पत्र लिहायचे आणि पोस्टमन काका प्रत्येकापर्यंत हे पत्र पोहोचवायचे. सुखाचे आणि दुःखाचे दोन्ही निरोप पत्रातूनच मिळायचे. मम्मी अगदी ५ वर्षांपूर्वीपर्यंत मामाला रक्षाबंधन येण्याआधी राखी सोबत पत्र पाठवायची. आता फोन आले आणि पत्राची जागा व्हॉट्सॲप च्या "happy rakshabandhan" या मेसेज ने घेतली आणि खाली राखी च चित्र ही असतंच सोबतीला. पण या व्हॉटसॲप च्या मेसेज आणि पत्र यातला सगळ्यात मोठा फरक काय आहे माहितीये का? बहीण जेव्हा भावाला पत्र लिहायची तेव्हा भावाच्या काळजीने कंठ दाटून आलेला असताना डोळ्यात जे अश्रू जमा व्हायचे ते थेंबाच्या रूपाने त्या पत्रावर पडलेले असायचे आणि पसरलेल्या शाईच्या माध्यमातून ती भावना त्या भावापर्यंत अलगद पोहोचायची. व्हॉट्सॲप च्या मेसेज मध्ये त्या पत्रातल्या स्पर्शाचा ओलावा सापडणार नाही. पूर्वी पत्र लिहून पोस्ट करण्यासाठी लोकांकडे भरपूर वेळ होता. दुरावलेली मन सुद्धा पत्र वाचून जवळ येत आणि हल्ली टेक्नॉलॉजी ने वेळ वाचतो पण स्क्रीन भरून मेसेज लिहला तरी भावनांची देवाणघेवाण सहजासहजी होत नाही. नाती टिकून राहण्यासाठी पोस्टमन काकांची गरज आहे एवढं मात्र नक्की.

0 

Share


Ashwini Sonawane
Written by
Ashwini Sonawane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad