फ्रेंडशिप डे - आठवण हरवलेल्या पाखरांची
( ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजऱ्या होणाऱ्या फ्रेंडशिप डे निमित्य विशेष लेख )
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी असणाऱ्या फ्रेंडशिप डे ची सुरवात अमेरिकेत १९३५ साली झाली . सध्या आपल्या भारतात सुद्धा हा दिवस मोठा धूमधडाक्याने साजरा होते . माणूस हा समाजशील प्राणी असल्यामुळे आजकाल असा व्यक्ती क्वचितच असणार कि त्याला मित्र नाही . वयानुसार मित्रांची गरज जरी बदलत असली तरी मित्र हे आपल्याला आरसा दाखवायचे काम करीत असतात .त्यामुळे फ्रेंडशिप ब्रँड दिला तरच मैत्री घट्ट होते हा गोड गैरसमज मनातून काढणे आवश्यक आहे.
नुकताच जुलै महिना संपला कि सगळ्यांना वेध लागतात ते विविध सणांचे . नवनवीन कपडे घालून सणानिमित्त घरगुती व्यंजनांचा आस्वाद घेणे यासारखा "दुग्धशर्करा " योग नशिबात असणे हे तर खर आजकालच्या काळात नशीबवान माणसाचे लक्षण आहे अर्थात यात सुद्धा काळानुरूप बदल झाला आहे . आजकालच्या "इव्हेंट मॅनेजमेंट " च्या संस्कृतीत आपण किती आनंदी (?) आहोत याची सर्वत्र चढाओढ लागलेली दिसून येते.आपली श्रीमंती फेसबुक , व्हॅटप्प च्या स्टेटस वर कधी झळकणार आणि त्यावर कौतुकाची ( ?) थाप कधी पडणार याची आतुरता असते.आपलं व्हॅटप्प स्टेटस किती जण बघतात आणि लाइक करतात यावर आपलं "स्टेटस " अवलंबून असते.फेसबुक वर जर हजारापेक्षा जास्त मित्र असतील , इंस्टाग्राम वर शेकडो फोल्लोवर्स असतील तर त्या माणसाचा सगळीकडे चांगला "वट" असतो. आपले कोण कोण मित्र आहेत हे सांगणं आणि दाखवणं हल्लीच्या काळात आवश्यक झालं आहे.या काळातील अशी मैत्री बघितली हि मन भूतकाळात गेल्या शिवाय राहत नाही .
आजकालची पिढी तर सुज्ञ आहे यात शंकाच नाही परंतु मैत्रीची परिभाषा १९९० अथवा त्याअगोदरची पिढी चांगल्या अर्थाने सांगू शकतील. दर रविवारी मित्राकडे जाऊन त्याच्या " कृष्णधवल " संचावर "चंद्रकांत " , "रामायण " बघून ( जमल्यास रविवारचा नास्ता करून )आमची स्वारी मैदानात दाखल होई . जो पर्यंत एखाद्याच्या आई वडिलांचे आगमन मैदानात होऊन पाठ सुजत नसे तो पर्यंत खेळाची मजा आल्यासारखी होत नसे.आपल्याकडे काका , मामा आले कि पहिले ओळख मित्राची करून देणे अत्यावश्यक ठरत असे.मित्राला सायकलवर डबल सीट बसवून त्याला पायडल मारावयाला लावणे हे जरी " सारथी " पणाचे लक्षण ठरत असेल तरी त्यात निष्पापपणाची भावना असे .मित्रांकडे जाण्यात आणि खाण्यात ( मार सुद्धा हा ) काही कमीपणा वाटत नसे. एखादा मित्र अभ्यासात कमी पडत असेल तर सगळे मिळून त्याला मदत करी ( मग ते कॉपी पुरवण्यात का होईना ) , कसाही करून त्याला सोबत आणावे अशी इच्छा सगळ्यांची असे.दुसऱ्या ग्रुप मधील भांडणात जर आपला मित्र कमी पडत असेल तर स्वःताच्या अंगात शंभर हत्तीचे बळ आणून त्याला मदत करून "मित्रता " जपण्यात येई.असे हे जुने प्रसंग आठवले कि आज सुद्धा मन गहिवरून येते . कधी कधी मनात विचार येतो " त्या काळातील ते " मंतरलेले दिवस " खरंच पुन्हा येतील का ? माझे (मोबाइलला मध्ये ) हरवलेले मित्र मला परत भेटतील का ? याच उत्तर जर आपल्याला थोडं जरी सकारातमक मिळत असेल तर आपण लवकरच " हरवलेल्या पाखरांचे " स्वागत करून येणारे पुढील सर्व "फ्रेंडशिप डे " अजून मोठ्या जल्लोषात करू शकू यात तिळमात्रही शंका नाही .
- निखिल पद्माकर सोनक