Bluepad | Bluepad
Bluepad
चुकामुक भाग २
Dilip Bhide
Dilip Bhide
4th Aug, 2022

Share


चुकामुक  भाग २
चुकामुक

भाग २

भाग १ वरून पुढे वाचा.
“इथे एक लहान मुलगी बसली होती, ती कुठे आहे “ एका पोलिसांनी विचारलं.
“माहीत नाही. आम्ही इथूनच चढलो. हे आमचं तिकीट.” -एका बाईने उत्तर दिलं.
“इतर कोणाला माहीत आहे का ?” – पोलिस
वरच्या बर्थ वर बसलेल्या माणसांनी सांगितलं “ खाली एक फॅमिली बसली होती, ते लोकं तिला आपल्या बरोबर घेऊन इथेच उतरले.”
“अरे बापरे, कशी होती ती फॅमिली ?” – पोलिस.
“चांगली फॅमिली वाटली साहेब, त्यांचा एक सहा वर्षाचा मुलगा पण होता. बदमाश नाही वाटले. कदाचित ते मुलीला घेऊन पोलिसांकडेच गेले असतील.” वरच्या बर्थ वरचा माणूस म्हणाला.
“तसं असेल तर ठीकच आहे.” असं म्हणून पोलिस चालले गेले. तिथून ते स्टेशन वरच्या पोलिस चौकीत गेले आणि त्यांना सांगून ते स्टेशन मास्टर च्या ऑफिस मधे गेले. तो पर्यन्त गेट वर असलेला टिकिट चेकर पण आला होता. कोणालाच ती मुलगी सापडली नव्हती. आता परिस्थिती गंभीर झाली होती. स्टेशन मास्टर ला घाम फुटला होता. याची चौकशी होऊ शकली असती आणि हलगर्जी पणाचा ठपका त्यांच्यावर बसला असता.
“साहेब,” तिकीट चेकर म्हणाला “बरेच लोक तुटलेल्या कंपाऊंड मधून जातात. चटकन बस मिळते म्हणून. तसेच हे लोकं गेले असतील तर मंदिरात सापडतील. आपल्याला मंदिरात शोध घ्यायला हवा.” पोलिसांनाही ते पटलं. ते त्यांच्या चौकीवर गेले आणि गावातल्या पोलिस स्टेशनशी संपर्क करून त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर, सिटी पोलिस स्टेशननी मंदिरात दोन साध्या वेशातले पोलिस ताबडतोब पाठवले,
आणि त्यांना सांगितलं की मंदिरातल्या चौकी वर जावून त्यांना पण बरोबर घ्या.
***
सुनंदाबाई आणि त्यांचं कुटुंब सरळ देवळात गेलंच नाही. देवळाच्या शेजारीच थोड्या अंतरावर त्यांच्या ओळखीचे कोणी राहत होते त्यांच्या कडे गेले. सगळ्यांनी तिथे आपापल्या आंघोळी वगैरे आटोपल्या. सुनंदाबाईंना मुलगा होता, त्यामुळे त्यांची मुलीची हौस त्या नितावर भागवून घेत होत्या. त्या नीता मधे इतक्या गुंतून गेल्या होत्या की, जणू काही ती त्यांचीच मुलगी होती. त्यांनी तिला छान न्हायला घातलं आणि केस छान विंचरून त्याचा पोनिटेल बांधला आणि वरतून तीचाच हेअर बॅन्ड लावला. तिला तिच्याच पिशवीत आणलेला एक स्कर्ट ब्लाऊज घातला. पोरगी इतकी गोड दिसत होती की सुनंदाबाई ज्यांच्या कडे उतरल्या होत्या त्यांनी लगेच एक काजळाचं बोट तिच्या गालावर टेकवलं.
सगळे तयार झाल्यावर, सगळी मग दर्शनाला निघाली. दर्शन वगैरे आटोपून मग सुनंदाबाई जरा दोन अध्याय वाचायला बसल्या. ते ही झाल्यावर मग सगळे व्हरांड्यात येऊन योगेशची वाट पहात बसले.
***
योगेशची बस अकोल्याला सकाळी 10 वाजता पोचली. चौकशी केल्यावर कळलं की दर अर्ध्या तासांनी शेगावची बस आहे. पण पाचच मिनिटं पूर्वी गेली. आता अर्धा तास थांबावं लागणार होतं. मग योगेशनी चहा नाश्ता उरकून घेतला आणि साडे दहाच्या बस मधे बसला. रस्ता एकेरी होता. समोरून बस आली की, दोन्ही बसेस ना रस्त्याच्या खाली उतरण्यावाचुन काही पर्याय नसतो, अश्या रस्त्यांवर. आणि हे नेहमीचं होतं यात काही विशेष नव्हतं. यांची पण बस खाली उतरली आणि थोड्या वेळात लक्षात आलं की चाक पंक्चर झालं आहे म्हणून. चाक बदलण्यात अर्धा तास गेला. बस चालू झाली आणि ड्रायव्हर च्या लक्षात आलं की जे चाक बदललं होतं त्यात हवा कमी होती, मग बसचा प्रवास अगदी हळू हळू सुरू झाला. जी बस साडे अकरा – बारा पर्यन्त पोचायला हवी होती, ती दिड वाजता पोचली. योगेशच्या जिवाची प्रचंड घालमेल होत होती. पण त्याच्या हातात काहीच नव्हतं. शेगावला पोचल्या, पोचल्या त्याने स्टेशन वर धाव घेतली. तिथे त्याला जे कळलं त्यांनी तो सर्दच झाला. आता पर्यन्त त्यांनी किमान एक लाख वेळा तरी गजाननाचा जप केला असेल. तो तसाच मंदिरात जायला रिक्षात बसला. मंदिरात गेल्यावर सर्व प्रथम त्याने पोलिस चौकी शोधून काढली.
***
बारा वाजे पर्यन्त वाट पाहून झाल्यावर सुनंदा बाई नवऱ्याला म्हणाल्या “अहो बारा वाजले आहेत, पोरांना भूक लागली असेल, आपण जेवून घ्यायचं का ? जेवण झाल्यावर पुन्हा इथे येऊन वाट बघू.” मग सगळे जणं महा प्रसाद घ्यायला गेले. जेवण झाल्यावर, पुन्हा सगळे बाहेर येऊन बसले. दीड दोन वाजे पर्यन्त सगळे बसून बसून कंटाळले. मग सुनंदाचा नवरा म्हणाला की “आपण अकोल्याला जाऊ, दादाला भेटू आणि रात्रीच्या गाडीने नागपूर जाऊ. इथे बसून बसून कंटाळा आलाय.”
“अहो पण ही नीता, तिचे बाबा अजून भेटले नाहीये. बिचारी डोळे लावून बसली आहे. आपण जाणार म्हणजे तिला पण न्यावी लागेल.” – सुनंदाबाई.
“अग आपण इतका वेळ वाट पाहिली, तिचे वडील यायला हवे होते आत्ता पर्यन्त. काय अडचण आली असेल हे समजायला मार्ग नाहीये. आपण नागपूरला जावून हळू हळू तिच्याकडून सगळं काढून घेऊ आणि तपास करू.”- सुनंदाचा नवरा.
“ठीक आहे. तुमचं बोलणं पटतंय मला. चला.” – सुनंदा म्हणाली आणि सर्व वरात अकोल्याच्या मार्गाला लागली.
***
योगेश पोलिस चौकीत पोचला आणि त्यांनी स्वत:ची ओळख दिली, आणि विचारलं “काय, काही खबर लागली का ?”
“नाही हो, आम्ही चौघे आणि देवस्थानचे चार कर्मचारी सतत शोध घेताहेत, पण दोन वेण्या आणि फुलाफुलांचा लाल फ्रॉक घातलेली मुलगी कोणाला दिसलीच नाही. परत आम्ही नवरा, बायको, एक सहा वर्षाचा मुलगा आणि तुमची मुलगी असं कुटुंब पण शोधतो आहोत, पण ते ही कुठे अजून तरी दिसलं नाही. चला आपण पुन्हा शोध घेऊ.” त्या दोघांनी मिळून संपूर्ण मंदिर चार वेळा पालथ घातलं पण नीता काही दिसली नाही. योगेश आता हताश झाला होता. त्यांनी दर्शन घेतलं आणि गजानन महाराजांची धुनी आणि पलंग होता त्याच्या जवळ बसून राहिला. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि तोंडांनी गजाननाचा जप चालू होता. काहीच कळत नव्हतं, मग त्याच्या मनात विचार आला की इथे बसून आता काही उपयोग दिसत नाहीये, तेंव्हा आता अकोल्याला जावं, काकांकडे गेल्यावर जरा हलकं वाटेल. मग तो उठला आणि बस स्टँड कडे निघाला.
***
अकोल्याला पोचल्यावर, सायकल रिक्षाने मंडळी सुनंदाच्या नवऱ्याच्या भावाकडे जात होती.
जाता जाता नीता मोठ्याने “बाबा” असं ओरडली. सुनंदाने ताबडतोब रिक्षा थांबवली.
“तुला बाबा दिसले का ? कुठे आहेत ?”
“बाबांचं ऑफिस.” नीता म्हणाली.
“बाबांचं ऑफिस ?, अग तू बिलासपूरला राहतेस असं म्हणालीस ना ?, मग इथे कुठे आलं तुझ्या बाबांचं ऑफिस ?” सुनंदाचा नवरा आश्चर्याने म्हणाला. नीता रिक्षातून उतरायला लागली. “अग कुठे चालली तू ?” - सुनंदाबाई.
पण तो पर्यन्त नीता रिक्षातून उतरून धावत त्या इमारती समोर पोचली पण होती. इमारतीवर स्टेट बँक ऑफ इंडिया ची मोठी पाटी होती आणि त्याच्यावर मोठा निळा गोल आणि त्यावर किल्लीची खाच असलेलं चित्र होतं. नीता त्याच चित्राकडे बोट दाखवत होती. सुनंदाचा नवरा एकदा तिच्याकडे आणि एकदा त्या लोगो कडे बघत होता. मग त्याच्या लक्षात आलं. त्यांनी निताला विचारलं “ तुझ्या बाबांच्या ऑफिस वर अशीच पाटी आहे का ?”
“हो” नीता म्हणाली.
मग रिक्षा सोडून, सगळे बँकेत शिरले. बँकेचं टाइमिंग तो पर्यन्त संपलं होतं त्यामुळे वॉचमननी त्यांना अडवलं. “बँक बंद झाली आहे. “ – वॉचमन.
“आम्हाला वेगळं काम आहे, मॅनेजर साहेबांना भेटायचं आहे.” सुनंदाचा नवरा.
तो थोडे आढे वेढे घेत होता, पण फॅमिली बघून त्यांनी त्यांना सोडलं. आत मॅनेजर साहेबांच्या केबिन मधे अजून दोघे जण बसले होते. हे सगळे जणं केबिनच्या बाहेर उभे होते. त्यांना काचेतून पाहिल्यावर मॅनेजर साहेबांनी त्यांना आत बोलावलं.
“काय काम आहे ?”
“साहेब, ही मुलगी हरवली आहे, तुम्ही जर थोडी मदत केलीत तर या पोरीच्या वडिलांचा पत्ता लागू शकेल.” सुनंदाचा नवरा.
“काय प्रकार आहे हा ? साहेबांच्या समोर बसलेल्या माणसांनी विचारलं “ आणि आमच्या कडून कुठल्या मदतीची अपेक्षा आहे तुम्हाला ?”
“साहेब, पांच मिनिटे द्या सर्व सांगतो.” - सुनंदाचा नवरा.
“हूं” – साहेब.
मग सुनंदांच्या नवऱ्याने सर्व कथा सांगितली आणि म्हणाला, “साहेब, ही मुलगी तुमच्या बँकेचा जो लोगो आहे त्याकडे बोट दाखवून म्हणाली की हे माझ्या बाबांचं ऑफिस आहे. यांचा अर्थ आम्ही असा लावला की, हिचे वडील स्टेट बँकेत आहेत, म्हणून आम्ही तुमच्या कडे आलो.”
संपूर्ण कहाणी ऐकल्यावर, सगळ्यांची मनं हेलावली. साहेबांनी त्यांच्या साठी खुर्च्या मागवल्या आणि चहा पण सांगितला.
साहेब म्हणाले “आता ट्रंककॉल लावला तर तो मिळेल की नाही याची शक्यता कमीच आहे. (ही साधारण ३० ते ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळेस, STD तर नव्हतेच, पण दुसऱ्या गावात फोन करायचा तर ट्रंक कॉल लावावा लागायचा. आणि ट्रंक कॉल सुद्धा लागायला 10 -10 तास लागायचे.) मग काय करायचं?”
“साहेब,” तो समोर बसलेला माणूस म्हणाला ‘ लायटनिंग कॉल लावा साहेब.”
“अरे पण त्याला खूप खर्च येतो, बँक देईल का ? ऑडिट ऑब्जेक्शन आलं तर काय उत्तर द्यायचं ?”
“साहेब, तेंव्हाचं तेंव्हा बघू. आता विचार करायला वेळ नाहीये.”
“ठीक आहे.” असं म्हणू साहेबांनी बिलासपूरच्या मेन ब्रांच मधे कॉल लावला.
“बिलासपूरला आपल्या बँकेत कोणी योगेश देशपांडे नावाचे गृहस्थ काम करतात का ?”
“ हो, SECL ब्रांच मधे काम करतात, ब्रांच मॅनेजर आहेत. का ? काय झालं. ते दोन दिवस सुट्टीवर आहेत.”
“ते त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन शेगांवला चालले होते, पण त्यांची चुकामुक झाली. आता ही मुलगी आमच्या ब्रांच मधे SBI चा लोगो ओळखून आली आहे. आता आम्ही तिची काळजी घेऊ, तुम्ही ते बिलासपूरला आल्यावर त्यांना सांगा, की मुलगी सुखरूप आहे म्हणून.” - अकोल्याचा मॅनेजर.
***
योगेश अकोल्याला उतरला. रिक्षाने त्याच्या काकांकडे जात असतांना त्याला स्टेट बँक लागली. त्यानी रिक्शा थांबवली. आणि बँकेत शिरला. तो विचार करत होता की मॅनेजरला सांगून बिलासपूर ला निरोप देता येईल म्हणून. तो बँकेत शिरला आणि निताचं त्याच्याकडे लक्ष गेलं. ती जोरात “बाबाss बाबाss” म्हणून ओरडली आणि धावत जावून योगेशला बिलगली. योगेश तिथेच खाली जमिनीवर बसला आणि निताला घट्ट पकडलं. दोघांच्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या. आणि त्यांना पाहून बँकेतल्या प्रत्येकाचे डोळे ओले झाले नसते तरच नवल.
********************
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.

230 

Share


Dilip Bhide
Written by
Dilip Bhide

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad