*#त्या_तिघी....*
( सावरकर घराण्यातील वीर स्त्रिया )
*#भाग_४७*
ताई , तात्यांना म्हणाल्या...भावोजी परलोकाविषयी म्हणाल तर मनुष्य जन्माला येतो त्याच वेळेस त्यांचं परतीचं आरक्षण झालेलं असतं. कोणती गाडी कधी जाणार हे आपल्याला कुठं ठाऊक असतं ना ! आपल्या धाकट्या वाहिनीच्या ह्या वाक्यावर तात्या म्हणाले , खरंय वहिनी जीवनात किती तरी वेळा परलोकाची गाडी माझ्यासमोरून धडधडत निघून गेली पण आता मात्र ही गाडी मी चुकू देणार नाही. हेच मला माईला सांगायचं होतं...! पण तात्या भावोजी तुम्ही माईंशी काहीच बोलला नाहीत म्हणे...तुमचं दर्शन , तुमचा निरोप घेण्यासाठी त्या खूप तळमळत आहेत...!
वहिनी , खरे सांगायचं तर मला माईचे हाल बघवत नाहीत. मनाला खूप वेदना होतात. माझ्या सहवासात तिनं बरीच वर्षे सुखाचा संसार केलाय तिला सतत चालती फिरती , काम करताना पाहिलंय ...यावर ताई म्हणाल्या...भावोजी फासावर लटकणाऱ्याच्या सुद्धा शेवटच्या इच्छेचा मान राखला जातो. त्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते...आणि इथे तुम्ही आपल्या जीवन सहचारिणीची शेवटची इच्छा पूर्ण करू नये. तुमची फक्त भेट हवी आहे माईंना...!
आधीची भेट मग शेवटची का ठरू नये ह्यावर...तात्यांचा खूप राग आला ताईंना..! त्यांच्या बुद्धिवादी विचारांचा तिटकारा वाटत होता. कठोर वागण्याची चीड येत होती. राग आला होता...! माई बिचाऱ्या साध्वी , त्यांच्यासाठी जीव तळमळत होता. आता पुन्हा इस्पितळात गेल्यावर जर माईंनी विचारलं तर काय उत्तर असणार माझ्यापुढे...? स्वामिनी , मी खूप द्विधा मनःस्थितीत होते ग !
इस्पितळात गेल्यावर पाहिले तर माई विश्वासच्या मांडीवर डोके ठेवून निजल्या होत्या. क्षीण हसत म्हणाल्या , कशी गमंत आहे बघ ना , लहान असताना विश्वास माझ्या मांडीवर निजायचा आणि आज मी लहान होऊन त्याच्या मांडीवर निजले....! विश्वास , मला सोडून जाऊ नको ना...! विश्वास आपल्या आईला लहान बाळासारखा थोपटत होता. शांत करत होता. म्हणत होता, नाही माई , मी तुला सोडून कुठे ही जाणार नाही . थोड्या वेळाने पुन्हा डोळे उघडून , मला घरी न्या , मला स्वारींना बघायचंय , असं काहीतरी बरगळत होत्या. इतकं बोलून माईंना ग्लानी आली.
मोठ्या बाईंनी ( येसूवहिनी ) त्यांचा मृत्यू समीप दिसताच , शेवटी मोठ्या भावोजींचा ( बाबाराव ) भेटीचा ध्यास घेतला होता. आणि आता माई पण...! बाबांचं पण सगळं ताईंनी लहान असून आईच्या मायेने केलं आणि आता माईंची पण अवस्था तशीच होती.उठून बसणं होतं नव्हतं. सगळं काही अंथरुणावरचं ..! लक्ष्मीताई सगळी सेवा करायच्या , माईंना अपराध्यासारखं वाटायचं ! अगं , किती करशील ? जाते मी आता , पण जाण्यापूर्वी स्वारींची भेट झाली असती तर....!
विश्वास आपल्या आईची मनापासून सेवा करायचा. त्यांच्या वेदना पाहून ताईंना क्षणभर का होईना वाटले , परमेश्वराने माईंच्या या यातना थांबवाव्यात.अखेर....! तात्यांच्या भेटीची मनीषा पूर्ण न होताच माई ८ नोव्हेंबर १९६३ ला हे जग सोडून गेल्या. तो दिवस होता रमा - माधव पुण्यतिथीचा ! विश्वास खूप रडला.सूनबाईंनी त्याला सावरलं. धाकटी नात विदुला कावरीबावरी झाली. माईंचं शव घरी नेण्याची व्यवस्था करत असतानाच...तात्यांचा निरोप आला , माईंचे शव रुग्णालयातून परस्पर चंदनवाडीच्या विद्युत स्मशानाकडे नेण्यात यावं. तात्यांचा हा निर्णय जरा धक्कादायक व पचवायला कठीण होता. पण सगळ्यांनी मूकपणे त्यांच्या सूचनेचं पालन केले.
ताईंनी घरी आल्यावर अशोकला ( मुलगा ) कार्यालयात दूरध्वनीवर निरोप दिला व येताना जरीचं हिरवं लुगडं घेऊन यायला सांगितले. हिरवा चुडा , ओटीचं सामान घेऊन लक्ष्मीताई पुन्हा रुग्णालयात गेल्या. माईंच्या भावाने ही माहेरचं लुगडं आणलं. नथीपासून सगळे दागिने , माईंच्या अंगावर घातले. कपाळावर ठसठशीत कुंकू लावलं...! माईंचं ते रूप लक्ष्मीताईनी डोळ्यात साठवून ठेवलं.
अखेर...माई अहेवपणी शेवटच्या प्रवासाला निघाल्या....!
सगळे जण तात्यांची वाट बघत होते. पण ते आलेच नाहीत. त्यांनी फक्त निरोप दिला..." अंदमानातून मुक्तता झाल्यावर तिनं माझ्यासह चाळीसएक वर्षे सुखाचा संसार केला. नातवंड खेळवली. तिच्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या. आता मृतदेहावर शोक करण्यात काहीच अर्थ नाही..! तिचं जीवन सार्थकी लागलं आहे. माझी वाट न पाहता पुढील कार्यवाही उरकून घ्या. "
माईंचा अंत्यविधी तात्यांशिवाय यथासांग पार पडला. त्यावेळेस ताईंचा मुलगा विक्रम नागपुरात आंदोलनात गुंतला होता. अखंड भारतावर , फाळणीला जबाबदार कोण ?..ह्या वर विक्रमनी जबरदस्त भाषण दिलं होतं. त्या संबंधीची वार्ता तरुण भारत व महाराष्ट्र टाईम्स मध्ये ही आली होती.
तात्या आयुष्यभर आपल्या विचारांना , मतांना चिकटून राहिले होते...! माईंचा दहावा दिवस जवळ आला होता, माईंचे भाऊ दादा चिपळूणकर घरी आले होते. माईंचं उत्तरकार्य पार पाडायला...पण तात्यांना कोण समजावेल ? " मरणोत्तर विधी नि कावळ्यांना पिंडदान यावर त्यांचा विश्वास नव्हता...म्हणून हे असले विधी काही करायचं नाही असे त्यांचे मत होते...!!
क्रमशः
( संदर्भ -
त्या तिघी : डॉ. सौ. शुभा साठे लिखित कादंबरीमधून साभार )
✒️ सौ राजश्री भावार्थी
पुणे