Bluepad | Bluepad
Bluepad
बखर एका अहल्येची
धनश्री अजित जोशी
4th Aug, 2022

Share

बखर एका अहिल्येची (30)
शेजारचे दामूकाका रोज रात्री जरा गप्पा मारायला म्हणून येत असत. चार दिवस झाले ते फिरकले नाहीत.
दुपारी अचानक आलेनी.
" या दामूकाका , पत्ता कुठय ? चार दिवस फिरकलान नाहीत ते.." मामंजींनी त्यांचे स्वागत केले.
आम्ही सगळेच ओटीवर काहींना काही कामं काढून बसलो होतो .एकिकडे गप्पा जमल्या होत्या.
" जे काय चाललंय ते ठीक नाही..बघा."
" आता काय झालं ? काय बरं नाही?"दादांनी विचारलंन.
" हेच तुमचं वागणं .स्पष्टच बोलतो.'बाहेरच्याला' बंद केलातनी , गप्प बसलो.. आता काय रंगीत लुगडं आणून दिलंत. अधर्म चाललाय ..अधर्म. गावात चर्चा चाललीन.पंचायत बोलावलीन आहे.तोच निरोप द्यायला आलो होतो. शास्रीबुवांच्याच घरात हा अधर्म ? छे .छे.छे.
लांबचं का होईना आपण पडलो नात्यातलं , गावात तोंड काढायला जागा ठेवली नाहीत."
" काका या आत या आधी ..शांत व्हा ." दादांनी पुढे होऊन समजूतीनी घ्यायचा प्रयत्न केला .
" आत बोलावतोय शहाणा मला . मी नाही यायचा हो.आम्ही धर्म नाही सोडलानी. निरोप द्यायला आलो होतो .उद्या दुपारी पंचायत बोलावली आहे. या तिकडं .."
असे म्हणून तावातावाने निघून गेले.
" मला कल्पना होतीच असं काही होईल म्हणून .मी तयारीतच आहे." दादा म्हणाले.
" म्हटलं नव्हतं , अरे गावांत चार घरी चर्चा होईल , लोक काय काय म्हणत असतील ? " मोठ्या आईंनी डोळ्याला पदर लावलान.
पंचायत वगैरे ऐकून मला तर भीती च वाटली. आम्ही सगळ्या गप्प झालो.हातातलं काम पुढं रेटायचा प्रयत्न करत होतो..पण कुणाचंच मन लागत नव्हतं.
" मला ही कल्पना होतीच .. बघूया काय होतं ते? " मामंजी म्हणाले.
" हे बघा बाबा.एक म्हणजे धर्मात असं काही सांगितलेलं नाही .आपली मतं प्रामाणिकपणे मांडायची .आपण काही गुन्हा केलेलान नाही . आपल्याला कोणी काही म्हणू शकत नाही.आता राज्य कायद्याचं आहे."
" खरं आहे तू म्हणतोस ते.बघूया. "
" तुम्ही काही काळजी करू नका. मी आणि गौतमा आहोत तुमच्या बरोबर आम्ही येतोय ..काय गौतमा? "
" हो मी तयार आहे .दादा म्हणेल तसं ."
दामूकाकांनी आणलेल्या निरोपानी आनंदावर विरजण पडल्या सारखं झालंनी. येवढं बरीक खरं .
दुसर्या दिवशी पंचायतीसमोर गेलेनी ..बराच वेळ झाला .संध्याकाळ होऊन गेली .जरा उशिराने च सगळं घरी आले. काय झालं असेल याची आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता होती.
" पंचायतीत काय झालं नी ? " मोठ्या आईंनी काळजीनं विचारले .
" काही नाही सगळं ठीक झालंनी." आपलं उपरणं टोपी खुंटीवर लावत मामंजी म्हणाले.
" काय होणार आपलं म्हणणं पटवलनी काय.. दादांनी . " हे म्हणाले.
" भूक लागली आहे.जेवणं होऊ दे .मग बोलू .." असं दादांनी म्हणताच, पानं वाढली . सगळ्यांची जेवणं उरकलीन तसे सगळे ओटीवर जमलं.
तेवढ्यात ..दामुकाकांची परिचीत हाक आली ," झाली का जेवणं?" तेव्हा खात्री पटली सगळं व्यवस्थित आहे.
" दादा , पंचायतीत तू बरीक छान बोललास हो .छान पटवून दिलंस .." दामूकाकांनी दादांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली न.
" गौतमा, आता तू सांग हो , काय झालं पंचायतीत .आम्हांला सगळ्यांना उत्सुकता आहे."
असं मोठ्या आईंनी म्हणताच सगळ्यांनीच मान हालवून होकार भरलानी.
" शास्रीबुबांच्याच घरात अधर्म चाललानी ..त्यांना जाब विचारलान पाहिजे ,समज दिली पाहिजे असा पंचायतीचा सुर होता , बाबांनी धर्मात असा कुठेही उल्लेख नाही असे स्पष्ट करून सांगितले, तसं इतकी वर्ष आपण हे सगळं पाळत होतो.परंपरा रूढी पध्दती याला काही अर्थ आहे की नाही असा मुद्दा केशव शास्रांनी मांडला तेव्हा सगळ्यांनी तो उचलून धरलानी. तेव्हा दादांनी लोकमान्य , आगरकर, चिपळूणकर , रानडे ..यांचे लेखातील भाग वाचून दाखवलानी ..आणि माणूसकी चा धर्म सगळ्यात श्रेष्ठ हे ठणकावलनी ." हे सांगत होते .सगळे मन लाऊन ऐकत होते.
" आपणच आपल्या आईला , बहिणीला, मुलीला असं वागवणं योग्य आहे का? यात धर्म आहे का? आपण दारी आलेला याचक, गाय गुरं ,कुत्री मांजरी यांनाही अशी वागणूक देत नाही मग या बायकांना का? त्यात त्याची काही चूक नसताना? " असा प्रश्न दादांनीच पंचायतीला विचारला.
खूप चर्चा झालीन आणि हे आपण ज्याच्या त्याच्या मतावर सोडूया. ज्याला जसं हवं पटलं तसा निर्णय घ्यावा . असं ठरलनी ." ह्यांनी सविस्तर सांगितलनी , तसं बरं वाटलं .
"खरं आहे रे दादा तू म्हणतोस ते . आमची राधा घरी आली रे अशी , नवरां गेल्यावर बोडकी करून पाठवलीन हो त्यांनी .तेव्हा जेमतेम पंधराची असेल बघ..जीव तुटतो रे.आज पाच वर्षे झाली.दर महिन्याला निमूटपणे 'बाहेरच्या' समोर बसून डोकं भादरून घेते .नंतर दोन दिवस बघवंत नाही हो तिच्याकडं . जीव तुटायचा रे .लोक काय म्हणतील म्हणून करत राहिलो . आता नाही हो..आता नाही करणार .आज डोळे उघडलनी.
घरी गेलो अन् तिच्यासमोर हात जोडून उभा राहिलो ..म्हंटलं ," पोरी माफ कर ग ..माफ कर. तशी ती हात हातात घेऊन ओक्साबोक्सी रडलीन .
..कितीतरी दिवसांनी पोरीशी बापासारखा वागलो. .राक्षस झालो होतो मी." दामुकाका रडायला लागले तशी काय होतंय ते कळेना.
" अरे चल आता डोळे उघडलंन ना? आपली चूक आपल्याला कळली . या पोरांनी आपल्याला शहाणं केले .अनंत उपकार आहेत त्याचे ,माणूस जागा केलास रे आमच्यातला .." मामंजी दादांकडे पाहून म्हणाले ."
"आहेच हो माझा नातू शहाणा. नुसती पुस्तकं वाचल्यानी शहाणपण येत नसतं. योग्य अयोग्याची जाणं असायला लागते. " मोठ्या आईंनी म्हटलं तशी सगळेजण दादांकडे कौतुकाने बघू लागले.
पंचायतीत काहींनी विरोध दर्शवलानी.चालायचचं पण अखेरीस नव्या विचारांचे स्वागत करणारा निर्णय पंचायतीने घेतलेला पाहून बरं वाटले .
बाहेर निरभ्र आकाशात पौर्णिमेचा चंद्र कसा शोभून दिसत होता.
क्रमशः
सौ.धनश्री अजित जोशी.
#बखर_एका_अहिल्येची30
 बखर एका अहल्येची

185 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad