Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेम काय आहे ?❤️
❤️heart hacker ❤️
❤️heart hacker ❤️
4th Aug, 2022

Share

प्रेम काय आहे ?❤️
आपले हृदय खूप जपून ठेवा, . ते खूप नाजूक असते. काही छोट्या छोट्या गोष्टी आणि घटनांचे त्यावर गंभीर प्रभाव पडतात. किंमती रत्नांना एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी देखील सोन्या चांदीचे कोंदण बनवावे लागते. त्याप्रकारे ज्ञान आणि विवेकाच्या कोंदणामुळे आपले हृदय दिव्यत्वाशी जोडलेले राहू शकते. मन आणि हृदय साफ आणि निरोगी ठेवण्यासाठी दिव्यत्वाशिवाय दुसरे उत्तम काहीही नाही. मग व्यतीत होणारा काळ आणि घटना यांचा त्यांना ना स्पर्श होऊ शकेल, ना ते जखमा करू शकतील.एखादी व्यक्ती जेंव्हा अतिशय प्रेम व्यक्त करत असते तेंव्हा काय प्रतिक्रिया द्यावी किंवा त्यांचे आभार कसे मानावे हे आपल्याला समजत नाही. खरे खुरे प्रेम मिळवण्याची क्षमता प्रेम दिल्याने, प्रेम वाटल्याने प्राप्त होते. जेवढे तुम्ही केंद्रित होत जाल तेवढे तुम्हाला तुमच्या अनुभवांच्या आधारावर हे ज्ञात होत जाईल कि प्रेम निव्वळ भावनाच नाही तर प्रेम तुमचे शाश्वत अस्तित्व आहे, मग कोणी कितीही प्रेम कोणत्याही रुपात व्यक्त केले तरी तुम्ही स्वतःला आपल्या स्वचेतनेत स्थिर असलेले बघाल.
प्रेमाचे प्रकार
प्रेमाचे तीन प्रकार आहेत
प्रेम जे आकर्षणाने मिळते.
प्रेम जे सुख सुविधेमुळे मिळते.
दिव्य प्रेम.
जे प्रेम आकर्षणाने मिळते ते क्षणिक असते कारण ते अज्ञानामुळे वा मोहामुळे निर्माण झालेले असते. यामध्ये आकर्षण कमी होण्यासोबत मोह भंग होतो आणि तुम्हाला उबग येते. हळूहळू हे प्रेम कमी होत जाऊन त्याजागी भीती, अनिश्चितता, असुरक्षितता आणि औदासिन्य येते.
जे प्रेम सुख सुविधामुळे तयार होते त्यात घनिष्टता असते परंतु त्यात जोश, उत्साह आणि आनंद नसतो. उदा. आपण आपल्या नवीन मित्रापेक्षा जुन्या मित्राशी खूप आरामदायक आणि मोकळीक अनुभवतो कारण आपण त्यांना सुपरिचित असतो.
या दोन्ही प्रेमांपेक्षा दिव्य प्रेम उत्कृष्ट आहे. ते सदाबहार आणि नित-नवीन राहते. याच्या जितके जवळ जाल तितके ते आकर्षक आणि गहन होत जाते. याचा कधीही कंटाळा येणार नाही उलटे ते प्रत्येकाला उत्साही ठेवते. प्रापंचिक प्रेम सागराप्रमाणे असते पण सागराला देखील तळ आहेच नां. दिव्य प्रेम आकाशाप्रमाणे आहे – असीम, ज्याला कोणतीही सीमा नसते. सागराच्या तळाऐवजी असीम आकाशात भरारी मारा. दिव्य प्रेम कोणत्याही नाते-संबंधापेक्षा श्रेष्ठ आणि सर्व नाते-संबंधाना सामाऊन घेणारे असते.
प्रेम हे एवढे जटील का आहे?
कारण लोकांना हे माहितीच नाही कि प्रेमाचा स्वीकार कसा करावा? कोणीतरी तुमच्या जवळ येतं आणि म्हणतं, ‘मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो/करते’.आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला आपले कान बंद करावेसे वाटतात आणि तुम्ही म्हणता, ‘ओहो..हे तर माझ्यासाठी अति झाले. मला इथून दूर जायचे आहे.’ कारण कुणाला प्रेमात असणे सुद्धा सहजपणाचे वाटत नाही. कारण आपण आपल्या आत तेवढे खोल शिरलोच नाहीत. आपण कधी हे जाणवून घेतलेच नाही की आपण कोण आहोत. आपल्याला हे माहितीच नाही कि आपण अश्या वस्तू पासून बनलेले आहोत ज्याचे नाव ‘प्रेम’ आहे. म्हणून, जेव्हा आपण आपल्याच स्त्रोताशी जुळलेले नाही, तर मग दुसऱ्यांसोबत जुळणे आपल्यासाठी तेवढे सहजसोपे नसते. म्हणून जेव्हा दुसऱ्या कुणाला तुमच्यासोबत जुळावेसे वाटले की तुम्ही बेचैन होता, कारण तुम्हाला जाणवते की तुम्ही स्वतःशीच जुळलेले नाही आहात. म्हणूनच प्रेमाचा स्वीकार कसा करावा हे तुम्हाला कळत नाही.
म्हणूनच, एकजुनी म्हण आहे, ”डुकरासमोर रत्ने टाकू नका.’ तुम्ही पहिले प्रेमाचा आदर करा. आणि समोरची व्यक्ती प्रेमाचा आदर करीत नसेल तर प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करू नका. तसेच तुमच्याजवळ प्रेम देण्याचे सुद्धा कसब असायला हवे. प्रेम देण्याचे कसब म्हणजे प्रेमात रमलेले असणे. केवळ प्रयत्न करणे नव्हे. प्रेम ही एखादी कृती नाही तर ती तुमच्या मनाची अवस्था आहे. तुम्हाला त्यात बिनशर्त रहायचे आहे. बघा, मी इथे कसल्याही शर्तीविना तुमच्यासाठीच आहे. आता इथे येणे व त्याचा स्वीकार करणे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या आतील शक्तीमुळेच इतर लोकं तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. तसेच तुम्हाला समजून घ्यावे म्हणून तुम्ही इतरांवर जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही फक्त मनातून प्रेम करा आणि ह्या साऱ्यात सामावून जाण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्या. तुम्हाला माहित असायला हवे कि ह्या बाबतीत जोरजबरदस्ती करायला गेलात तर अजून भलतेच त्रांगडे निर्माण होईल.
पहिल्या नजरेतील प्रेम
बहुतेक लोक पहिल्या नजरेतच प्रेमात पडतात. मग काळ लोटेल तसे ते दुषित आणि कमी कमी होत जाते आणि घृणेमध्ये रुपांतरीत होऊन गायब होते. याऐवजी जर याच प्रेमाला ज्ञान रुपी खत घातले तर ते प्रेम भव्य वृक्ष बनून दिव्य आणि प्राचीन प्रेम बनून जन्मोजन्मी सोबत करते. हि आपली स्वतःची चेतना होय. येथे आपण आपल्या वर्तमान शरीर, नांव, स्वरूप आणि नाते-संबंधामध्ये सीमित रहात नाही. भले तुम्हाला तुमचा भूतकाळ आणि प्राचीनता अवगत नसेल पण तुम्ही प्राचीन आहात, हे जाणून घेतलेत तरी पुरेसे आहे.
प्रेम दुखावले गेले तर ते क्रोध बनते, प्रेमाचा विक्षोभ बनतो तेंव्हा त्याची ईर्षा बनते, जेंव्हा ते प्रवाहित असते तेंव्हा ते करूण बनते आणि ते प्रज्वलित होते तेंव्हा ते परमानंद बनते.

175 

Share


❤️heart hacker ❤️
Written by
❤️heart hacker ❤️

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad