गलतफहमियों के सिलसिले आज भी इतने दिलचस्प हैं
कि हर एक ईंट सोचती है, दीवार मुझपर ही टिकी है।
"अहो ! काय हे !! तुमची बाहेर थेर चालायची ते मी नाईलाजाने खपवून घेत होते. पण आज तुम्ही, माझ्या घरात, या सटवीला माझ्या बेड वर घेवून आलात. हे मी कदापि सहन करणार नाही. आधी तिला माझ्या घरातून बाहेर काढा". रोहिणी नवऱ्यावर जोरात ओरडत म्हणाली.
पाचवा महिना लागला होता. बरं नाही वाटत म्हणून कामावरून लवकर घरी आलेल्या रोहीणीला, आपल्या घरात हे असे काही पाहायला मिळेल याची सुतराम कल्पना नव्हती. आज पर्यंत ती नवऱ्याचे बाहेर चाललेले अफेयर ऐकून होती. बऱ्याच वेळा विरोध केला होता. पण तो चार दिवस गप्प बसायचा, की परत त्याची थेर चालू व्हायची. आजपर्यंत बाहेर असलेले प्रकरण, आज तिच्या घरा पर्यंत, अगदी बेडरूम मध्ये येवून पोचले होते.
"ए ! सटवे !! चल उठ !!! " तिला अर्धवस्त्र अवस्थेत चादरी मधून बाहेर ओढत रोहिणी कडाडली. एक जोरदार थप्पड तिला लगावत, तिचे खाली पडलेले कपडे तिच्या अंगावर फेकले आणि तिला हात धरून बेडरूमच्या बाहेर ढकलणार तोच ...
काडकन तिच्या कानाखाली नवऱ्याची थप्पड बसली. क्षणभर तिच्या डोळ्या समोर अंधारी आली. ती तोल जावून बाजूच्या ड्रेसिंग टेबलवर कोसळली. तिच्या धक्क्याने ड्रेसिंग टेबलचा आरसा फुटून चक्काचूर झाला. जणूकाही तिच्या सर्व विश्वासाचा चक्काचूर झाला होता. टेबलवरील सांडणाऱ्या कुंकवाची डबी तिला पकडता आली नाही. सांडलेल्या कुंकूवाचा एक फराटा दरवाज्या पर्यंत पसरला गेला. तिला त्याक्षणी जाणवले की, तिचे कुंकू तिच्या हातून निसटले होते.
"तुझे घर ! कुठले तुझे घर !!" तिच्या अजून एक थोबाडीत मारत नवरा म्हणाला. मी लोन काढून हे घर घेतले आहे. माझ्या पगारातून या घराचा हप्ता जातो. सोसायटी मध्ये आणि दरवाज्यावर माझे नाव आहे. हं ! म्हणे माझे घर."
"आता या घरात ही माझी मैत्रीण रहाणार. तुला या घरात थारा नाही. चल! चालती हो." कानाखाली मारलेल्या थपडे पेक्षा जीवघेणा वार, तिच्या नवऱ्याने तिच्या हृदयावर केला.
रोहिणीच्या मनात विचारांचे काहूर माजले...
हे माझे घर नाही???
गेली १० वर्षे काडी काडी जमवून जोडलेला हा संसार माझा नाही? या घरासाठी पैसे कमी पडल्यावर माझे स्त्रीधन विकून नवऱ्याला या घरासाठी पैसे दिले, ते घर माझे नाही?
कोणी घर देता का घर. एका सर्वस्व गमावलेल्या गृहिणीला कोणी घर देता का घर.
नवऱ्याची ओढाताण बघून जमत नसताना नोकरी धरली. नोकरी, घरकाम, करताना थकायला व्हायचे. पण आपले घरटे उभे रहावे म्हणून ज्याच्या साठी कष्ट सहन केले, ते उभारलेले घरटे माझे नाही?
कोणी घर देता का घर. बांधलेले घरटे मोडून पडलेल्या एका चिमणीला कोणी घर देता का घर.
घराचा हप्ता नवऱ्याच्या पगारातून जात होता. घर खर्चाला पैसे कमी पडू लागले म्हणून नोकरी धरली आणि घराचा हप्ता तू भर माझ्या नोकरीच्या पैशातून मी घर चालवेन असे सांगून माझा पूर्ण पगार ज्या माझ्या घरासाठी वापरला ते घर माझे नाही? चार वर्षांपूर्वी, ज्या घरासाठी मातृत्वाची लागलेली चाहूल सुद्धा नाकारली होती, ते घर माझे नाही?
कोणी घर देता का घर. एका नवऱ्याने टाकलेल्या बायकोला, एका होणाऱ्या आईला तिच्या बाळा साठी, कोणी घर देता का घर.
माझी राणी, माझी राणी म्हणून घरासाठी मोलकरणी प्रमाणे राबवून घेणाऱ्या नवऱ्याचा तिला राग आला होता.
पण त्या रागापेक्षा आपल्या असहाय्य परिस्थितीचा तिला प्रचंड राग आला होता.
आईवडिलांच्या मर्जी विरूध्द प्रेमविवाह केला म्हणून ते घर, माहेर माझे राहिले नाही.
नवऱ्याने त्याच्या घरातून बाहेर काढले म्हणून ते घर माझे राहिले नाही.
घरावर नवऱ्याच्या नावाची पाटी. म्हणून हे घर त्याचे झाले.
अरे ! मग माझे घर कुठाय? कोणी सांगेल का मला.
आज अशा कित्येक रोहिणी हाच प्रश्न मनात ठेवून आपल्या आजूबाजूला वावरत आहेत.
"जा चालती हो माझ्या घरातून" या एका वाक्याने, वर्षानुवर्षे मनात जपलेला "माझे घर" हा समज, आपला गैरसमज होता याची स्त्रीला प्रचिती येते.
✍️©अजित✍️