सकाळी लवकर उठलो सगळं आवरलं आणि 6 च्या सुमारास रिसॉर्ट चेक आऊट केलं आणि तिथूनच अवघ्या 6 km वर असलेल्या कुंकेश्वर ला गेलो. जाताना वाटेत एक सुंदर सकाळ पाहायला मिळाली. वाटेत खूप छान झाडी, बीच होता. समुद्रातील लाटा उसळ्या घेत होत्या. ते सगळं पाहताना खूप मस्त वाटत होतं. साधारण एक 15 ते 20 मिनिटात आम्ही कुंकेश्वर ला पोचलो. कोविड च्या नियमामुळे तेव्हा मंदिर अजून बंद होते त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं. तिथं महादेवाचं मंदिर आहे अगदी बीच च्या काठालगतच वसलं आहे. मग आम्ही थोडा वेळ तिथंच बीचवरती थांबलो आणि समुद्रातून येणाऱ्या लाटांचा आंनद घेतला. आणि थोड्या वेळानी तिथून निघालो.यावेळी आम्ही फोंडाघाटातून जायचं ठरवलं. जाताना इकडचाही भाग पाहायला मिळेल म्हणून त्यामार्गी गेलो. हा रस्ता आम्हाला थोडा लांब पडणार होता पण आम्ही सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही संध्याकाळपर्यंत निवांत पोचणार याची आम्हाला खात्री होती. नांदगावपासून पुढे आलो आणि फोंडा घाट सुरु झाला.हा घाट कणकवली तालुक्यात येतो आणि याची लांबी जवळजवळ 15 km आहे. हा घाट अवघड नव्हता पण जास्ती km पर्यंत पसरला होता आणि शिवाय वाटेत गर्द, दाट झाडी जवळजवळ जंगलच म्हणायला हरकत नाही. हा घाट एखाद्या अभयारण्यासारखा भासत होता. वाटेत ठिकठिकाणी प्राण्यांबाबतच्या सूचना लावल्या होत्या. बाकी कोणत्या प्राण्याचे दर्शन झाले नाही पण माकडे आणि त्यांची पिल्ली भरपूर होती तिथे. अगदी रस्त्यावर बसून ती खात होती. वाहणं होती तशी रस्त्यावर पण एकेकदा रस्ता पूर्ण सुनसान असायचा त्यामुळे कधी कधी भीती वाटायची की जर एखाद्या प्राण्याने दर्शन दिलं तर काय होईल? पण सुदैवाने तसं काही घडलं नाही.
त्या घाटातही आम्ही बरेच फोटो, व्हिडिओ काढले आणि ते अगदी कमालीचे आले. घाट अतिशय सुंदर होता. निसर्गाच्या अगदी कुशीत गेल्याची भावना मनात आली. पुढे घाट संपल्यानंतर एका ठिकाणी एक हॉटेल बघून जेवायला थांबलो. तेव्हा दुपारचे 12 -12.30 वाजले होते.तिथंही जेवण अप्रतिम होतं. जेवण आटपून आम्ही तिथून निघालो.आणि पुढे थोडं थांबत थांबत आम्ही राधानगरी अभयारण्याजवळ येऊन थांबलो. तिथं पावसाळ्याच्या दिवसात जाण्यात मजा आहे त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला.आणि पुढे राधानगरीचं धरण बघत बघत पुढे निघालो. तिथून आदमापूर 29 km आहे आणि अजून भरपूर वेळ होता त्यामुळे तिकडे जाण्याचा प्लॅन केला आणि पुढे गेलो. पुढे रस्ता थोडासा कच्चा होता आम्ही तसाच तो पार करत पुढे गेलो. आणि आदमापूर ला जाऊन पोचलो. मग तिथे संत बाळूमामाचे दर्शन घेतले. खरंच तेही खूप छान मंदिर आहे. तिथंही जाण्याची माझी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती ती तेव्हा पूर्ण झाली. दर्शन घेतलं. बाळूमामाची बसलेली मूर्ती डोळ्यात साठवली आणि तिथं बसलेल्या एका आजोबांनी भंडारा कपाळाला लावला तेव्हा खूप मस्त वाटलं. खरंच एक वेगळीच ऊर्जा आहे तिथे. तिथे मंदिराच्या अवतीभावती जी दुकानं आहेत तिथं घोंगडी विकायला आहेत. दर्शन घेऊन थोड्या वेळ थांबून आम्ही तिथून निघालो.
दुपारचे 2 -2.30 वाजले होते आता तिथून सरळ कोल्हापूर आणि मग जयसिंगपूर असा आमचा प्रवास होता. आता तिथून कोल्हापूर 49 km होते. आम्ही तो टप्पा पार करून संध्याकाळी 6 च्या दरम्यान जयसिंगपूर ला पोचलो. खरंच एक अविस्मरणीय प्रवास होता तो. तिथं जाण्यापूर्वी अगदी रिकाम्या हातानी गेलो होतो पण परत येताना एक आठवणींचा मोठा साठा घेऊन परत आलो होतो. परत आलो तेव्हा हातपाय अगदी दुखत होते सलगच्या प्रवासामुळे पण मनात एक आनंद होता तो त्या निसर्गाच्या कुशीत जाऊन गोष्टी अनुभवण्याचा. खरंच प्रत्येकानी असा एक प्रवास एकदा तरी आयुष्यात केलाच पाहिजे आणि मुख्य म्हणजे कोकणात. कारण कोकणातून खरंच कोणी रिकाम्या हातांनी परत येत नाही.
तुम्हाला हा अनुभव वाचून कसं वाटलं ते कंमेंट्स मध्ये नक्की कळवा. मी त्या नक्की वाचेन आणि रिप्लाय करेन.