साठे, शिंदे आणि गण्या हे कॉम्बिनेशन मुळात बनलं कसं याच या त्रिकुटाला बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात याव. शिंदे घराण्याची शान कुमार विनायक शिंदे. ज्याच्या वाडवडीलांनी खुद्द स्वराज्य निर्मितीत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत खांद्याला खांदा लावून अनेक लढाया जिंकल्या. नंतरच्या कैक पिढ्यांनी कुस्तीच्या फडाच्या लाल मातीत आपली हयात घालवली त्यांचा या पिढीचा वारस नाक्यावर सिगारेटचा धूर काढत लोकांच्या गाड्या दुरुस्त करतोय.वडिलोपार्जित अस काही विनायकच्या वाट्याला शिल्लक असेल तर जवळ जवळ सहा फुटीची दणकट शरीरयष्टी आणि कोणाच्याही धातीत धस्स व्हावं असा रानटी चेहरा. त्यात त्याने आधीच भरघोस असणाऱ्या भुवयांना एकत्र जुळवून कोणाकडे रोखून पाहिलं की त्या व्यक्तीला आपला मृत्यू दिसायला लागायचा. असलं हे जबरी व्यक्तिमत्त्व दहावीत एकदा आणि बारावीत दोनदा गटांगळ्या खावून अखेर असलम भाईच्या गॅरेज मध्ये गाड्या दुरुस्त करायला लागलं.
या उलट साठ्यांचा गौरव, अभ्यासात हुशार. कुठल्याही सिनेमात हिरो शोभावा अस देखणं रुप. पण तोही ग्रॅजुएट होवून वडिलांची पिठाची गिरणी चालवू लागला. दिवस रात्र डोक्याला रुमाल बांधून आधीच गोरा असलेला गौरव गोरामोरा होत लोकांची दळण दळून देतोय.या त्रिकुटातला शेवटचा कोन म्हणजे गण्या. आता गण्या नाव ऐकून तुम्हाला त्याच नाव गणेश, गुणेश, गणपत वैगरे वाटलं असेल पण गण्याचं खर नाव 'दिगंबर' त्याला वाटलं आपल्याही नावाचं दुनियादारी सारखं दिघ्या वैगरे होईल पण त्याच्याच आडनावने खो घातला आणि दिगंबर गणपुळे च झालं गण्या. तसा त्याने लोकांनी दिग्या हाक मारावी म्हणून बराच प्रयत्न केला. पण त्याच्या सख्ख्या मित्रांनी पोरींसमोर विथ अँक्शन 'ये दिगंबर 'म्हणून हाका मारून हैराण केलं. अखेरीस त्याने गण्या वर समाधान मानलं. याच नाव जरी गण्या असाल तरी तो अस्सल खानदानी होता. पूर्ण पुण्यात त्याच्या वडिलांची चार डिपार्टमेंटल स्टोअर्स होती. गावाकडे मोठी बागायती होती आणि हे कमी म्हणून की काय त्याचा मोठा भाऊ नगर सेवक होता. गण्या मात्र अगदी पायाच्या नखापासून मोजलात तरी पाच फुटाच्या आसपास उंची, शिडशिडीत बांधा, त्याच्या श्रीमंतीला शोभावा असा लख्ख गोरा रंग.नुकताच दहावीची परीक्षा देवून आला असा वाटावा असा गोल गोंडस चेहरा. वयाची विशी ओलांडली तरी अजून धड मिसरूड फुटायला तयार नाही. जिथे त्याच्या मित्रांचे ब्रेकअप वर ब्रेकअप होत होते तिथे याला एक पोरगी पटेना. अखेर त्याच्या मित्रांच्या अथक प्रयत्नानंतर साहेबांना एक पोरगी मनात भरली पण ती याला काही भाव देईना. ती होती कबीर सिंगची चाहती, तिच्या प्रियकराला शाहीद कपूरसारखी भरघोस दाढी मिशी असावी ही तिची मनोमन इच्छा.इथे गण्याला दाढी- मिश्यांच्या नावाखाली हनुवटीवर सोशल डिस्टंस पाळणारे केसांचे काही पुंजके. हा तिढा सोडवायचा कसा? अखेर त्याचे जानी दोस्त मदतीला आले. तिघांनी संशोधन करून ठरवलं की याची एकदा मनापासून हजामत करायची म्हणजे तरी याला जरा बेताची दाढी मिशी येईल. अखेर त्या तिघांनी जवळच सलून गाठलं. गण्याला न्हाव्याच्या दुकानातल्या खुर्चीत कोंबून त्याचे दोघे दोस्त शांतपणे बाजूच्या बाकावर त्याची हजामत पुरी व्हायची वाट पाहत बसले. इकडे न्हाव्याने त्याची हत्यार काढली, गण्याच्या तोंडाला फेस काढून त्याने वस्ताऱ्याची ब्लेड बसवली. दोन्ही गालफडं सुरळीत पार पडली.गण्याही मनातल्या मनात न उगवलेल्या मिशिवर ताव मारू लागला. न्हाव्याचा वस्तरा सरसर फिरत आता हनुवटीवर आला आणि तेवढ्यात गौरव साठे ने कपाळावरचा घाम टिपायला खिशातून रुमाल बाहेर काढला. पिठाच्या गिरणीत काम करताना तो हाच रुमाल कपाळाला बांधायचा . रुमाल बाहेर आल्याबरोबर रुमालाने आपल्या पोटातली सगळी माया मुक्तकंठे उधळली. त्यातले काही कण त्याच्या जवळ बसलेल्या कुमार शिंदेच्या नाकात गेले. काही क्षण हुळहुळ होवून शिंदे ने जोरदार शिंक दिली. त्याची ती गगनभेदी शिंक ऐकून न्हावी एवढ्यांदा दचकला की त्याचा वस्तरा ठरवलेला मार्ग सोडून तलवारीच्या वेगात गण्याची हनुवटी सरळ उभी कापत खाली गेला. रक्ताची एकच धार लागली. गण्या गेलेला मशागतीला आणि जखमी होवून आला. जखम एवढी खोल गेली की चांगले पाच- सहा टाके पडले. कबीर सिंग व्हायची स्वप्न बघणारा गण्या हनुवटी कापून हनुमंत होवून बसला. आता त्याला कोणी गण्या म्हणत नाही सारा परिसर त्याला आता हणम्या म्हणून ओळखतो. तुमची मात्र कधी गण्याशी गाठ पडली तर एकदा तरी त्याला प्रेमाने दिघ्या म्हणून हाक मारा. न जाणो तुमच्या त्या प्रेमळ हाकेने गण्याच्या डोळ्यातून अती आनंदाने दोन आसव गळून उजाड झालेल्या त्याच्या दाढीला पालवी फुटेल.