एका शिष्याने आपल्या गुरुंना विचारले, " खरंच देव आपण दाखविलेला नैवेद्य ग्रहण करतात का ? जर देव तो ग्रहण करतात, तर ते पदार्थ नाहीसे का होत नाहीत ? " त्यावेळी गुरुंनी त्या शिष्याला काहीच ऊत्तर दिले नाही. आपला नियमित पाठ शिकवित राहिले.
त्या दिवशीच्या पाठामध्ये गुरुंनी आपल्या शिष्यांना एक श्लोक शिकविला.
"पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।"
पाठ संपल्यावर गुरूंनी सर्व शिष्यांना पुस्तकात पाहून हा श्लोक कंठस्थ करण्यास सांगितले.
काही वेळानंतर गुरूंनी प्रश्न विचारणाऱ्या शिष्याजवळ जाऊन त्याला विचारले, " काय, श्लोक तोंडपाठ झाला की नाही ? " त्यावर त्या शिष्याने गुरूंना तो श्लोक अचूक म्हणून दाखविला. तरी देखील गुरूंनी नकारार्थी मान हलविली.
त्यावर शिष्य म्हणाला, " तुम्हाला हवं असेल तर पुस्तकात बघा आर्य, मी श्लोक बरोबर म्हंटलाय ! " त्यावर गुरू म्हणाले, " अरे, श्लोक तर पुस्तकातच आहे, मग तू कसा काय कंठस्थ केलास ? " त्यावर शिष्य काहीच बोलू शकला नाही.
त्यावेळी गुरूंनी त्याला समजाविले की, " सध्या पुस्तकात जो श्लोक आहे, तो स्थूल स्थितीत आहे , आणि तू जो श्लोक कंठस्थ केलास तो सूक्ष्म स्थितीत तुझ्या अंतरंगात प्रविष्ट झाला. तुझे मनही त्याच स्थितीत असते. तू श्लोक कंठस्थ केलास त्यावेळी पुस्तकातील जे त्याचे स्थूल रुप आहे, त्याचा काहीच ह्रास झाला नाही."
त्याचप्रकारे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा जेंव्हा आपण अर्पण केलेल्या नैवेद्याचे सूक्ष्म स्थितीत ग्रहण करतो, तेंव्हा त्याच्या स्थूल रुपात काहीच ह्रास होत नाही . नैवेद्याचे ते स्थूल रुपच आपण नंतर प्रसाद म्हणून स्विकारतो."