Bluepad | Bluepad
Bluepad
"मनभावन श्रावण"
Pratibha Jojare
Pratibha Jojare
3rd Aug, 2022

Share

" आषाढ संपून श्रावणाची सुरवात..श्रावण म्हणजे रिमझिम बरसणाऱ्या रेशीम धारा..कविवर्य मंगेश पाडगावकरांचे "श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा" हे आठवणारच..निसर्ग आपल्याला भरभरून देतो ..निसर्गात आपल्या मनीचे भाव व्यक्त होतात..आपल्या परसात असलेली फळझाडे, फुलझाडे त्याचे रोपं करणे त्यांना फुटलेला अंकुर, रुजलेले बी,त्याचे रोपटे पुढे त्याची वाढ आलेले फुले फळे हे सर्व आपल्याशी संवादच साधतात नाही का?त्यांच्या वाऱ्यावर डोलण्यात हालण्यात ते आपल्या बोलण्याला प्रतिसादच देतात नाही का?..भर उन्हाळ्या नंतर पडणारा मृगचा पाऊस आणि त्या नंतरचा मृदगंध मन मोहून टाकतो..मग आठवतो कालिदासा चे मेघदूत...
श्रावणामध्ये पावसाच्या दोन सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते. ते ज्याला सोसत नाही ती व्यक्ती खरोखरच नाजूक असली पाहिजे. या श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' आशा भोसले यांनी 'एक होता विदूषक' या चित्रपटासाठी गायली आहे.
श्रावणातील निसर्ग तर महत्वाचा आहेच पण निसर्गाला अनुसरून सण आणि परंपरा ही आहेत.चातुर्मासात श्रेष्ठ असणारा हा महिना.ऊन पावसाचा खेळ या महिन्यात सुरू होतो.मेघातून जाणाऱ्या माणिक मोत्याच्या धारांनी शेतकऱ्याचं हिरवं स्वप्न फुलू लागत.शेताच्या बांधावरून "भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं रं।" असे सूर ऐकू येतात.धरती जणू हिरवा शालूच पांघरते अगदी रहदारीच्या रस्ताच्या कडेचे गवत सुध्दा हिरवेगार तजेलदार दिसते.मातीच्या कणा कणा तुन या श्रावण धारांनी जणू चैतन्य फुलते. सासुरवाशीण महिलांना हवा हवासा वाटणारा श्रावण. श्रावणातील सणाला भाऊ येणार माहेरी नेण्यासाठी म्हणून ती वाट पाहते आणि म्हणते "सण श्रावणा चा आला , आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघायला" श्रावण सोमवार ला फार महत्व बालकवी वर्णन करतात.
"देव दर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात..वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत...
श्रावण महिना उजाडला की
ऊन-पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू होई.
श्रावणमासी, हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात पिवळे ऊन पडे!
श्रावणातील नागपंचमी हा खर तर महिलांच्या उत्सवाचा सण नव नवे वस्त्रालनकार घालून वेगवेगळे खेळ खेळणे, नटून थटून नागोबाच्या पूजेला जाणे. फुगडी,झिम्मा,कोंबडा हे फेर खेळ खेळणे.लाटण्याचा खेळाचे गाणे पहा मजेशीर आहे "लाटा बाई लाटा। चंदनी पेटा
मामांनी दिला मला। सोन्याचा लोटा
आई मी लहान। केटकीच पान
मामांना सांग। मला कंबर पट्टा आण
एक सुं सुं। दोन सुं सुं
आपण दोघी मैत्रिणी। नव्या साड्या नसू...
श्रावणातील मंगळागौरीच्या खेळांमध्ये फुगडी या खेळा प्रमाणेच मंगळागौरीचा कोंबडी हा खेळ प्रचलित आहे.अतिशय उत्साहाने आणि आनंदाने खेळला जातो.यामध्ये पंखाचा झिम्मा आणि उडता कोंबडा हे दोन प्रकार आहेत..या खेळाचा वेळी गायले जाणारे गीत..
घोडा घोडा एकीचा एकीचा
पेठ करणी लेकीचा
अशी लेक गोरी गोरी लावा
हळद थोडी थोडी
या गाण्यात मध्ये सगळ्या संख्या वेगवेगळी फुले , फळे, नाते याला गुंफून गाणी गातात छान झिम्मा खेळतात.
सई बाईंचा कोंबडा आला माझ्या दारी
सांडीत मोती घालीत चारा
शेजी बाईंचा बटवा
दिर दाजीला नटवा
अश्या प्रकारची गाणी सहजतेने गाउन आनंद व्यक्त करतात...विविध फुलांच्या नानाविध रंगांच्या छटा,क्षणात पडणारे ऊन आणि क्षणात येणाऱ्या रिमझिम पाऊस धारा मनाला आणि निसर्गाला समृध्द करण्याची जादू आहे श्रावण स्पर्शात, एकूण काय तर सर्व आसमंतात समृध्दीचे वरदान देणारा.
नारळी पौर्णिमा हा श्रावणातील महत्वाचा सण. सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केलेला असतो.शुक्ल पक्षातील पौर्णिमेला 'नारळी पौर्णिमा' म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण. ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे अशा 'समिंदराला' या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो. रंगबेरंगी पारंपरिक पोशाखाने समुद्र किनारा फुलतो. नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी होडी समुद्रात सोडण्याची प्रथा आहे.आणि दुसरे महत्व राखीचे ...रक्षा बंधनाचा हा महत्वाचा दिवस आहे. चितोडच्या राजा महाराणा संग्रामसिंग याचा मृत्यू नंतर चितोडची परिस्थिती चिंताजनक झाली. चितोडची महाराणी कामलावती हिने दिल्लीचा बादशहा हुमायू याला बंधुप्रेमाची राखी पाठवून चितोडचे रक्षण केले.राखी हा केवळ धागा नसून त्या मागे बहीण भावाची अतूट माया,प्रेम, त्याग आणि कळकळ आहे.
सर्वांचीच मने अशी समृध्द व्हावीत अन् विश्वात्मक देवाने प्रसन्न व्हावे यासाठीच तर ज्ञानदेव माऊलींनी पसायदान मागितले आहे. श्रावणाच्या निमित्ताने नव्या जाणिवा, नवे दृष्टीकोन स्वीकारून, जुनी कात टाकून देऊन आपणही स्वीकारू हा समृध्दीचा वसा. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही म्हणत पुढे जाऊ या.
प्रतिभा जोजारे/कुलथे

167 

Share


Pratibha Jojare
Written by
Pratibha Jojare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad