Bluepad | Bluepad
Bluepad
बखर एका अहल्येची
धनश्री अजित जोशी
3rd Aug, 2022

Share

बखर एका अहिल्येची(29)
बाबा गेले जाताना रमेचे बालपण आठवून गेले . आईचं इरकली लुगडे मला फार आवडायचे.
मला आठवतंय त्या दिवशी लक्ष्मी पूजन होते.आई गर्भरेशमी इरकली लुगड्यात लक्ष्मी सारखी दिसत होती .
आम्ही सगळे नवीन कपडे घालून लक्ष्मी पूजनासाठी तयार होऊन बसलो होतो.
आजोबांनी लक्ष्मी पूजन केले श्रीसुक्त झाले. वठारातल्या बायका हळदीकुंकवासाठी येत होत्या .सगळे जण आईचे खूप कौतुक करत होते.
माझ्या एकदम काय डोक्यात आलेनी, " आई , मला लुगडं नेसवना? "
" काय आत्ता नेसायचंय.? परकर पोलकं घातलेस ना? "
" मला ते नकोय. मला आत्ता लुगडं नेसायचंय ."
" अग पण.."
" अग नाही पण नाही ..मला लुगडं नेसायचंय .आत्ताच्या आत्ता."
"ठीक आहे नेसा की नाही कोण म्हणतंय? " आज्जी म्हणाली.
" जा घेऊन ये तुला हवं ते .मी देते नेसवून."
" मला हे लुगडं हवंय .आईचं ."
" आता बायका येतात हळदीकुंकवाला , रमा आत्ता मी हे नेसलंय नं ? तुला दुसरं नेसवतं हवं ते."
"नाही , मला हेच नेसायचंय "
आईने समजूत घालण्याचा करू प्रयत्न केला पण आमची समजूत पटेल तर ना? शेवटी भोकाड पसरलनी.
तशी आज्जी एकदम म्हणालीन ," सुनबाई , तिला हवय तर द्या बदलून ,लहान आहे ती.उगाच लक्ष्मी पूजनाला संध्याकाळी रडं नकोय घरात. "
आई मुकाट्यानी आत गेली तिने लुगडं बदलनी आणि मला नेसवलंन. तेव्हा कुठे आम्ही शांत झालो.
लुगडं नेसवून झाल्यावर मला जवळ घेऊन म्हणाली ," छान दिसतंय हो माझे लेकरू.आरश्यात बघ जा."
अंगा पेक्षा बोंगा जास्त असं ते रूप बघून " काही चांगलं दिसत नाहीए .तू खोटं बोलतेस ." असे म्हणून पुन्हा भोकाड पसरलं .
तेव्हा मला जवळ घेऊन म्हणाली ," छान दिसतेस ग.लुगडं जरा मोठं आहे ना.तू लहान .."
"मला नको हे ..आत्ताच्या आत्ता बदल ." म्हणून परत परकर पोलकं घातलंन.
आता आठवलं तरी वाईट वाटतंय .आईला किती त्रास दिला न. आता तेच लुगडं तिने आठवणीने आपल्यासाठी पाठवलन.
आईच्या आठवणींनी मन गलबलून आले .लुगड्यावरून हात फिरवताना मला आईच भेटत होती जणू.
"कशी आहेस ग? किती दिवस झाले तुला पाहिले नाही" .
" तू कशी आहेस रमे? " आवाज आला.
लुगड्याच्या प्रेमळ स्पर्शातून जणू आई विचारत होती.
घडीवरून हात फिरवता फिरवता " तुझी रमा खूप खूश आहे .तुझी आठवण येते ग आई , तू कशी आहेस? " मी कळत नकळत आठवणींचे धागे गुंफत आईशी गप्पा मारू लागले..
खूप दिवसांनी आई भेटत होती तिच्या साडीच्या स्पर्शातुन..किती वेळ मी हातात लुगडं घेऊन त्यावरून हात फिरवत होते.
" काय म्हणताय अहिल्याबाई, कुठं रमलात ?" वहिनींच्या प्रश्नाने एकदम भानावर आले . " चला ओटीवर येताय ना .कशिदा भरायला शिकायचाय ना? रूखवतासाठी रुमाल भरायचेत ."
" हो हो आलेच ."
वन्संच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती. तुळशीच्या लग्ना लगतचा मुहूर्त धरला होता.
सासुबाई छान भरत काम करत.आम्ही आपलं त्या सांगतील तशी त्यांना मदत करत असू. भरता भरता गप्पा रंगात येत एरवी कधी फारसे न बोलणार्या काकू त्या दिवशी मोकळ्या झाल्या .
" मला पण भरायची हौस होती हो. आठवतंय किती हौसेने काय काय भरलं होतं , लहान होते आईला खूप हौस होती .ती भरायची काय काय ,आमची आपली तिला मदत हो."
" लग्न म्हणजं काय कळायच्या आतच मला बाबांनी मला परत घरी आणलीन.एक रंग उरला लाल .
पहिल्यांदा केस कापलं, पलिकडच्या बाहेरच्या खोलीत.काहीच कळत नव्हतं काय चाललय. आरश्यात पाहिले तेव्हा टाहो फोडलानी . काही दिवसांनी बाबा येऊन घरी घेऊन गेले."
आम्ही सुन्न होऊन ऐकत होतो.काकू सांगत होत्या .
"आई बाबांकडे गेल्यावर ..नाही कापले केस .आई बाबा असे पर्यंत त्यांनी प्रेमानं बघिलन.
मी कोणाला दोष नाही देत ..त्यांच्या माघारी भावांनी परत इथे आणून सोडलनी . भोग माझे. पुन्हा बाहेरच्या समोर बसून केस कापून घेताना ब्रह्मांड आठवलंनी."
सांगता सांगता भरून आलेले डोळे पुसत त्या हासत हासत म्हणाल्या आता सगळं बदलनी. तुम्ही सगळं प्रेमानं वागताय तर छान वाटतं .काहीतरी पुण्याई आहे म्हणायचीनी काय? "
" माझा असा संसार नशीबात नाही,असं नाही मनात आणायचं .तुम्ही सगळी माझीच आहात .आनंद आहे ." त्या म्हणाल्या तसं बरं वाटलंन.
मनुताईही घरात छान रमल्या होत्या . वन्संच्यापेक्षा थोड्या मोठ्या , त्यांच्याशी चांगली गट्टी जमलेलीन . कामातही छान मदत करत . काकूंच्या हाताखाली छान तयार होत होत्या.
घरात लग्नाची तयारी चालली होती. सगळे मिळून यमूवन्संची थट्टा मस्करी करत होते. मधूनच हास्याची खसखस पिकत होती. मनुताई कुठं दिसत नव्हत्या .
बराच वेळाने काकूंच्याच लक्षात आले ." अग मनुताई कुठय? दिसल्या नाहीत बराच वेळात .
" खरंच की , अहिल्या जरा बघ बाई? " काकूंनी म्हटलं तशी "मनुताई ..मनुताई .." हाका मारत परसदारी, घरात सर्वत्र फिरले त्या दिसल्या नाहीत तशी वरच्या खोलीत गेले .
" मनुताई , त्यांची ट्रंक उघडून, फणी करंड्याची पेटी उघडून बसल्या होत्या. डोक्यावरचा पदर कमरेला खोचला होता. त्यांनी कपाळावर छानसं कुंकू लावले होते .आपलंच रूप त्या आरश्यात बघत होत्या." मी त्यांच्याकडे बघतच राहिले किती सुंदर दिसत होत्या त्या. डोक्यावर नुकतेच केस येऊ लागले होते .."
तेवढ्यात वहिनीही तिथं आल्या. त्याही बघत राहिल्या. माझ्या खांद्यावर हळूच स्पर्श करून खूण केली.आम्ही तिथून बाहेर पडलो तश्या हळू आवाजात मला म्हणाल्या ," हे कुठं बोलू नका. " मी मान डोलावली. खाली आलो तशी वहिनी म्हणाल्या ," मनुताई वर आहेत हो. डोळा लागलेलान.म्हटलं दमल्या असतील पडू दे जरा ".
" या वेळी कधी त्या वरती जात नाहीत हो.खरंच दमल्या असतील. पडू दे .पडू दे जरा." मोठ्या आई म्हणाल्या तसं बरं वाटलंनी.
थोड्यावेळाने मनुताई खाली आल्या , डोक्यावर पदर आणि कपाळावर ठसठशीत गोंदलेलं. नजरेत भरणारं .
कोणत्या मनुताई खर्या मगाची पाहिलेल्या का आत्ता समोर आलेल्या .? त्यांचेकडे पाहून जीव गलबलला. मी वहिनींकडे पाहिलं तर त्याही डोळ्याच्या कडा पुसत होत्या.
मनुताई मात्र काही घडलंच नाही अश्या शांतपणे खाली आल्या ..परिस्थिती माणसाला किती मोठं करते ना?
" या मनुताई झाली का झोप ?" मोठ्या आईंनी विचारलं तशी त्यांनी न समजून होकार भरला.
" स्वप्न पडलं की नाही छानसं , अग रोज बघते ना मी झोपल्या ना शांत की हसत असतात .गालातल्या गालात .मग म्हणतं झोपू दे हो झोप बाई .निदान सुखाची स्वप्न तरी बघ हो."
मनुताईंना काय कळलं कुणाशी ठाऊक ? डोक्यावरचा पदर सारखा करत खाली बसल्या .. हातात सुई घेऊन रेशीम ओवू लागल्या ..तशी त्यांचा करंगळी नसलेला हात एकदम नजरेत भरला ..
सुई एकदम बोटाला टोचली.त्यातून रक्त येऊ लागले..
सौ धनश्री अजित जोशी पुणे
#बखर_एका_अहिल्येची
बखर एका अहल्येची

168 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad