Bluepad | Bluepad
Bluepad
शांततेचा आवाज....एक हितगुज मनाची मनाशी.
डॉ अमित.
डॉ अमित.
3rd Aug, 2022

Share

शांततेचा आवाज....एक हितगुज मनाची मनाशी.
शांततेचा आवाज....एक हितगुज मनाची मनाशी.
शांततेचा आवाज....एक हितगुज मनाची मनाशी.
आज जिकडे तिकडे नुसते आवजाचेच साम्राज्य आहे....सकाळी लवकर उठवण्यासाठी लागणारा अलार्म चा आवाज...इथून सुरू होणारा दिवस ते रात्री निजेपर्यंत निरनिराळ्या आवजाशी आपला सामना होत असतो...
बाजारातल्या गर्दीचा आवाज...रस्त्यातल्या गाड्यांचा आवाज....माझ्यासाठी म्हणाल तर रोज पेशंट म्हणून येणाऱ्या लहान लहान मुलांच्या रडण्याचा आवाज.
आवाजांच्या या गर्दीत आपण विसरून जातो तो एक असा आवाज जो खरे तर रोज न चुकता आपण ऐकायला हवा...तो म्हणजे शांततेचा आवाज...
हो अगदी बरोबर वाचलेत तुम्ही..
"शांततेचा आवाज"...मनाचा आवाज.
ॲमेझॉन वर काही निवडक मराठी पुस्तकांची यादी पाहताना रत्नाकर मतकरी यांचं "शांततेचा आवाज" नावाचं पुस्तक समोर दिसलं....नावातच वेगळेपण असलेलं हे पुस्तक पाहताक्षणी मी मागवून घेतले...रत्नाकर मतकरी हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतात त्या त्यांच्या 'रहस्यकथा...भयकथा'....मनाला गुंग करणाऱ्या कथा...त्यांची या पठडीतील बरीच पुस्तके मी वाचली आहेत ...नि मी त्यांचा चाहताच झालो..
यू ट्यूब वर त्यांच्या कथांचे वाचन करणारी काही चॅनल्स सुद्धा आहेत ज्यात तितक्याच प्रभावशाली पद्धतीने त्यांचे श्रवणीय रूपांतरण केले आहे...पण त्यांच्या या नेहमीच्या पठडीला छेद देणारं असं हे पुस्तक म्हणजे "शांततेचा आवाज".यातील एक एक छोट्या छोट्या कथा म्हणजे मानवी मनाच्या भावभावनांचा ठाव घेणाऱ्या..या तुम्हाला नक्कीचं अंतर्मुख करतील.यातल्या काही कथा तुमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करतील.. तर कधी गालातल्या गालात खुदकनं हसवतील...माणसाच्या जीवनाचे...त्यांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू अगदी हळुवारपणे उलगडणाऱ्या कथांचा हा संग्रह.हा लेख म्हणजे फक्त पुस्तक परिचय मुळीच नाही....कारण हे एक असे पुस्तक आहे जे तुमचा तुमच्या स्वतःशी नव्याने परिचय करून देईल...त्यामुळे इतक्या चांगल्या पुस्तकाचा मी पामराने काय परिचय द्यावा?फक्त इतकेच सांगेन की
आवर्जून संग्रही असावं असं हे पुस्तक आहे...
"ग्रंथशिल्प"...इथे जीवन आमूलाग्र बदलते.
ही माझी घरची लायब्ररी.इतक्यातच मी तिचे हे असे नामकरण केलं आहे.आता फक्त ती माझी म्हणणे चुकीचेच होईल...कारण माझा मुलगा शर्विल आणि त्याची आई...म्हणजे माझी पत्नी😂😂 ( उगाच फिरकी घेतली बसल्या बसल्या ) या दोघांनाही पुस्तकांचा लळा लागला आहे...ते दोघेही अगदी हिरीरीने वाचन करत असतात...प्रत्येकाची वाचनाची आवड भले वेगळी असली तरी त्यांचीही पुस्तकांशी झालेली ही मैत्री मला मनापासून सुखावून गेली आहे...
म्हणूनच की काय हल्ली ॲमेझॉन
वरून आम्ही प्रत्येकाच्या आवडीची पुस्तके खरेदी करण्याचा सपाटाच जणू लावला आहे...एक नियम मात्र केला आहे .. पहिले मागवलेलं पुस्तक वाचून झाले की मगच दुसरे पुस्तक ऑर्डर करायचे...याने होते काय की प्रत्येकजण जणू हिरीरीने पुस्तक वाचून काढण्यासाठी अगदी आतुर झालेला असतो...
एवढ्यासाठीच मी ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप देखील घेतली आहे...त्यामुळे होते काय की एक जरी पुस्तक मागवायचे असले तरी डिलिव्हरी चार्जेस लागत नाही बऱ्याच पुस्तकांना..फ्री डिलिव्हरी मिळते...लवकर डिलिव्हरी मिळते...शिवाय अधून मधून ॲमेझॉन
प्राईम वर रिलिज होणारी दर्जेदार चित्रपट देखील पहावयास मिळतात...😊🤗
इतक्यातचं प्रवीण दवणे सरांच्या एका पुस्तकात एक वाक्य वाचण्यात आलेलं की "पुस्तकांसाठी केलेला खर्च ही आयुष्यातील सर्वात महत्वाची जमा-पुंजी असते"..अगदी तंतोतंत खरे असे हे वाक्य आहे...एकदा का तुम्हाला वाचनाची गोडी लागली की तुमचं स्वतःच असे एक जग तयार होते...या जगात तुम्ही पुस्तकांच्या संगतीने इतके तल्लीनं होवून जाता की तुम्हाला बाहेर असणाऱ्या वेगवेगळ्या आवाजाचा....बाहेरच्या कोलाहलाचा काहीच परिणाम होत नाही...तुमच्या मनाला एका वेगळयाच शांततेचा अनुभव येत राहतो...तुमचा तुमच्याशी संवाद सुरू होतो....हाच तर तो आवाज आहे...शांततेचा आवाज...
आता बरेच जण मोठ्या फुशारकीने म्हणत असतात की आम्ही पुस्तके वगैरे वाचत नाहीत तर आम्ही माणसांचे चेहरे वाचतो...आता हे लिहिता लिहिता मला आपलं ते शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या बाजीगर या चित्रपटातील ते बागेतलं गाणं आठवतंय ... 'किताबे बहोतसी पढी होगी तुमने..मगर कोई चेहरा भी तूमने पढा है"...😂😂
या अश्या चेहरे वाचणाऱ्या बाजीगरांना देखील माझी कळकळीची विनंती आहे की....तुम्ही माणसांचे चेहरे वाचताय चांगलीच गोष्ट आहे पण माणूस कळण्यासाठी तुम्हाला स्वतःस एक चांगलं माणूस व्हावे लागेल आणि पुस्तकांचे वाचन तुम्हाला खरोखरच एक चांगलं माणूस होण्यास नक्कीचं मदत करेल हे मी तुम्हाला पुस्तकांच्या वतीने वचन देतो..
कारण पुस्तकांचे वाचन तुम्हाला इतके प्रगल्भ बनवेल की तुम्हाला समोरच्या माणसाच्या मनातला शांततेचा आवाज देखील ऐकू येईल....मग भले त्या समोरच्या माणसाने कोणताही मुखवटा धारण केलेला असला तरी तुम्हाला त्याचं अंतररुप उलगडत राहील...हीच तर खरी ताकत आहे तुमच्या मनाची जी तुम्ही तुमचा आतील शांततेचा आवाज ऐकून मिळवली असणार आहे...
तुम्हालाही जर शांततेचा आवाज अनुभवायचा असेल तर तुम्ही दिवसातला काही वेळ तुमच्या स्वतः साठी द्या...तुमच्या आवडी निवडी साठी द्या...पुस्तकांच्या वाचनासाठी द्या...तुम्ही करत असलेली तुमच्या आवडीची कोणतीही गोष्ट तुमच्या मनाला एक वेगळीच शांती देवून जाईल...तुम्हाला तुमच्या शांततेचा आवाज ऐकवील... नि तुमची तुमच्या मनाशी एक वेगळीच हितगुज होत राहील....😊
डॉ अमित.
बुधवार.
३ ऑगस्ट २०२२.

167 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad