Bluepad | Bluepad
Bluepad
भारत - विंडीज तिसरा टिट्वेंटी सामना
Dr. Datta Vighave
Dr. Datta Vighave
3rd Aug, 2022

Share

भारत - विंडीज तिसरा टिट्वेंटी सामना
सुर्यकमारची आयसीसी मानांकनात जोरदार मुसंडी ; रोहितच्या दुखापतीनंतरही भारताची बाजी !
सेंट किट्सच्या वॉर्नर स्टेडियमवरील लागोपाठच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या भारत व विंडीज यांच्यातील तिसऱ्या टि २० सामन्यात आधीच्या सामन्याच्या उलटा खेळ बघायला मिळाला. दुसऱ्या सामन्यात विंडीजने भारताला पराभूत करताना खेळाच्या सर्वच क्षेत्रात निष्प्रभ केले होते. विंडीजच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते ; तर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना आरामात खेळून विजय साकारला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याच खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांना फारसे उधळू दिले नाही व १६४ धावांवरच त्यांना रोखले. तर प्रत्युत्तरात सुर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळासमोर विंडीजचे गोलंदाज पालापाचोळ्या सारखे उडून गेले. दुसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला ओबेद मकायला या सामन्यात एकही बळी मिळाला नाही तर बाकीच्या गोलंदाजांनाही चांगलाच घाम गाळावा लागला.
भारत - विंडीज तिसरा टिट्वेंटी सामना
विंडीजच्या डावात काईल मेयर्सने ७३ धावांची सर्वोत्तम खेळी केल्याने विंडीज १६४ धावांपर्यंत पोहोचले. तर भारताच्या डावात सुर्यकुमार यादवने २६ चेंडूत अर्धशतक ठोकताना एकूण ४४ चेंडूत खेळत ७६ धावांची जोरदार खेळी केली. त्यामध्ये ६ चौकार व ४ षटकार सामील होते. सुर्याच्या या खेळीने विंडीजचे या सामन्यात भारताला पराभूत करून मालिकेत आघाडीवर जाण्याचे मनसुबेही उध्वस्त झाले. त्याचबरोबर संघ प्रबंधनाचे त्याला सलामीला खेळविण्याचा प्रयोगही तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाला. वास्तविक बघता सुर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर संघाची धुरा व्यवस्थित हाताळत असताना त्याला सलामीला खेळविणे अद्यापही योग्य वाटत नाही, कारण तो मधल्या फळीत डावाच्या मध्यावर जलदगती व फिरकी गोलंदाजांचा यशस्वी सामना करू शकतो. त्यामुळे सुर्याला मधल्या फळीत खेळविणेच जास्त रास्त ठरेल. शिवाय ईशान किशन सारखा खास सलामीवीर सलामीला आल्याने कर्णधार रोहित शर्मासह डावा - उजवा हे समिकरणही जुळवता येईल व प्रतिपक्षावर दबाव टाकून चांगली सलामीही संघास मिळेल.
दुसऱ्या सामन्यात भारताच्या डावाची सुरूवात रोहित शर्माचे पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने भारताला मोठा हादरा बसला होता व पुढे त्याचा फटका भारताला पराभवाच्या रूपाने बसला. मात्र या सामन्यात रोहित झटपट बाद झाला नाही पण केवळ पाच चेंडूत एक चौकार व एक षटकार ठोकून अकरा धावा फटकविल्यानंतर त्याच्या पाठीचे दुखणे उफाळले आणि त्याला तातडीने मैदानाबाहेर जावे लागले. तेंव्हा भारताच्या सामना जिंकण्याच्या मोहिमेला धक्का बसतो की काय असे वाटू लागले होते. मात्र श्रेयस अय्यरने सुर्यकुमार यादवसह ८६ धावा जोडल्या. त्यामुळे संघाला शतकी सलामी मिळालीच शिवाय पराभवाचे घोंघावणारे वादळही आपोआप दूर झाले. श्रेयसचे या भागीदारीत केवळ २४ धावांचेच योगदान होते, परंतु त्याच्या साथीमुळे सुर्यकुमार यादव बिनधास्त फटकेबाजी करू शकला.
रोहितला हॅमस्ट्रिंग व पाठदुखी कायम सतावत असल्याने त्याला यापूर्वी बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे. आता मात्र अशा दुखापतींमुळे त्याचे संघाबाहेर राहणे टिम इंडियाला परवडणारे नाही. कारण आशिया चषक व टि-२० विश्वचषक स्पर्धा काही दिवसांवर आल्या असल्याने त्याचे तंदुरूस्त असणे गरजेचे आहे. रोहित निव्वळ महत्वाचा फलंदाजच नाही तर अनुभवी व सर्वांना घेवून दबाव पेलणारा सक्षम कर्णधार असल्याने तो संघात असणे अगत्याचे आहे. फार तर तो विंडीज विरूध्दचे पुढचे दोन टि२० सामने नाही खेळला तरी चालेल परंतु पुढील महत्वाच्या स्पर्धांसाठी तो शंभर टक्के फिट होणे आवश्यक आहे.
सुर्यकुमार यादवाचा चांगल्या खेळीचा लाभ त्याला आयसीसीच्या टि२० मानांकनात ८१६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचण्यास झाला. सध्या प्रथम क्रमांकावर असलेला पाकिस्तानच्या बाबर आझमचे ८१८ गुण आहेत. विंडीज विरूध्द अजून दोन सामने बाकी असून त्याच्यात सुर्याने असाच चमकदार खेळ केला तर तो बाबरला मागे सारून आयसीसी मानांकनात अव्वल स्थानी जाऊ शकतो. असे जर झाले तर आगामी आशिया चषक व टि२० वर्ल्ड कपमध्ये केवळ सुर्यकुमारचाच नाही तर भारतीय संघाचाही आत्मविश्वास दुणावू शकतो.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
भारत - विंडीज तिसरा टिट्वेंटी सामना

228 

Share


Dr. Datta Vighave
Written by
Dr. Datta Vighave

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad