*#त्या_तिघी....*
( सावरकर घराण्यातील वीर स्त्रिया )
*#भाग_४६*
या सुमारास माईंना पण पोटाचा त्रास होऊ लागला. तात्यांची तब्येत तर तोळामासाच होती. त्यांचा मुलगा विश्वास व सुनबाई... तात्या व माईंची खूप सेवा करायचे. नात विदुला चा दोघांना छान विरंगुळा होता ! लक्ष्मीताई भेटायला गेल्या की त्यांना माई म्हणायच्या या जीवघेण्या दुखण्यात परमेश्वरानं विदुला च्या रुपानं गोड विसावा पाठवलाय बघ. तिचे बोबडे बोल ऐकून तात्या पण विरघळत...भातुकली खेळताना तात्यांना ती म्हणते , " इत्ते बस , तुला मी कलत कलत ( गरम / कढत ) पोल्या कलून वालते...! तिचं ते बोबडे बोल , साजिरे रूप , आग्रह पाहून तात्या तिच्यासमोर बसून भातुकली खेळत.
तात्यांची तब्येत क्षीण होत होती. त्यातच एक दिवस घरातच ते पाय घसरून पडले. मांडीचं हाड मोडलं. शस्त्रक्रिया करावी लागली. तात्या रुग्णालयात माई घरी ! माईंचा जीव पुन्हा टांगणीला लागलेला. आपल्या स्वारींची सेवा स्वतः करावी असे त्यांना वाटे पण त्यांची स्वतःची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. पोटाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं ! त्यामुळे रुग्णालयात तात्यांसोबत विश्वास , सुनबाई किंवा ताई थांबत. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर घरी जाण्याची परवानगी मिळाली. पण नेमकी त्या दिवशी अमावस्या होती. आजच्या दिवस त्यांनी रुग्णालयात थांबावे असे त्यांच्या काही अनुयायांच्या मनात आलं. पण तात्या आपल्या विचारांवर ठाम असायचे.
शरीर साथ देत नसलं तरी त्यांचं मन खंबीर , कणखर होतं. स्वतःच स्वतःचे निर्णय घेत.
मी घरी केंव्हा परतावं हे त्या चिकित्सकां नी ठरवायचं ज्योतिषांनी नव्हे. अरे , तिकडे एक रशियन स्त्री अंतराळात उड्डाण करतेय. अमेरिका , रशिया चंद्रावर , मंगळावर उतरण्याचा प्रयत्न करताहेत आणि तुम्ही माझे अनुयायी काय काय करत आहात ? नसते भ्रम उराशी धरून मी कधी घरी जावं हे ठरवण्यासाठी तुम्ही ज्योतिषाचा आधार घेता. किती हास्यास्पद आहे हे सगळं ! तात्यांची कसली ही आबाळ होऊ नये म्हणून घरी आल्यावर एक परिचारिका ठेवली. जवळ जवळ तीन महिन्यानंतर ते काठीचा आधार घेऊन घरात चालू लागले.
हे सगळं थोडं सुरळीत होत असताना... माईंची प्रकृती जास्त आहे त्यांना डॉ. तळवलकर यांच्या इस्पितळात नेल्याचा निरोप लक्ष्मीताईंना आला. माईंना पाहून ताईंना भडभडून आले. माईंना असं पलंगावर झोपलेलं , हाताला अन् नाकाला नळ्या लावलेलं कधी कोणी पहिलंच नव्हतं. त्या इतक्या खंगल्या होत्या की पलंगावर निजलेल्या ही दिसत नव्हत्या. आपल्या जावेला लक्ष्मीला बघून त्यांना ही भरून आलं ! दोघींच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा ओघळत होते. लक्ष्मी...अगं घरी का नाही आलीस ? किती वाट पाहिली मी तुझी...!
माई , अहो येणारचं होते पण घरात आला गेला , पोरांचं सगळं पाहता पाहता वेळचं मिळाला नाही...! जावा असूनही किती प्रेम करत होत्या ह्या अगदी बहिणीसारखेच ! त्यातला एक तारा येसूवहिनी तर कधीच निखळून गेला होता. लक्ष्मी , मला घरून निघताना स्वारींशी थोडं बोलायचं होतं ग ! पण ते खोलीतच बसून होते. आता मी इथून घरी परत जाणार नाही , हे माहितेय मला ! ...माई शांत राहा , धीर धरा..सगळं काही ठीक होईल. औषधोपचार चालू आहेत ना मग विश्रांती घ्या. शांत झोपा. जास्त बोलू नका. मी आता इथेच थांबेन तुमच्याजवळ...!
" लक्ष्मी , तू किती करतेस ग सगळ्यांसाठी ! ह्या दुखण्यातून माणसाची सुटका नाही हे मला कळलंय , म्हणूनच मला घरातून बाहेर पडताना स्वारींना डोळे भरून पाहायचं होतं. मी खूप विनवणी केली पण स्वारींनी खोलीचं दार बंद केलं होतं. तू असतीस ना घरी तर तू नक्की स्वारींना माझ्या समोर आणलं असतंच. स्वारींच्या चरणांचं मनोमन स्मरण करून , सदनाला ही अखेरचा रामराम करून इथे आलेय मी ! लक्ष्मी आता वेळ थोडा आहे ग ! आयुष्यभर स्वारींची सावली बनून मी जगले. मला त्यांनी खूप सुख , समाधान दिलं. त्यांच्या महान कार्यात मी पत्नी बनून खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य परमेश्वरानं माझ्या झोळीत टाकलं. मी खूप समाधानी आहे. पण मनाला एक गोष्ट सलतेय. ...निघताना स्वारींचं दर्शनसुद्धा घडलं नाही...स्वारी... स्वारी...!"
बोलता-बोलताच माई ग्लानीत गेल्या. तितक्या परिचारिकेनं त्यांना सुई टोचली व त्या शांत निजल्या. माईंचं बोलणं ऐकून ताई अस्वस्थ झाल्या....काय चुकलं होतं या माऊलीचं ? तात्या भावोजी असं का वागले ? माईंना का दुखावलं त्यांनी ? अनेक विचारांनी ताईंचं मन सैरभैर झाले. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीताई सावरकर सदनात गेल्या. तात्या झोपूनच होते. त्यांना पाहून तात्या म्हणाले , ' वहिनी , बरं झालं आलीस ! आम्ही शेवटच्या प्रवासाला निघालो. माई बहुतेक माझ्या आधीची गाडी पकडणार ! पण आमच्या दोघांचं ही परलोकाच्या गाडीचं आरक्षण झालंय हे नक्की.....!!
क्रमशः
( संदर्भ -
त्या तिघी : डॉ. सौ. शुभा साठे लिखित कादंबरीमधून साभार )
✒️ सौ राजश्री भावार्थी
पुणे