Bluepad | Bluepad
Bluepad
!! व्यक्ती आणि वर्तन !! - - भाग - २
धर्मराज रत्तू पवार
3rd Aug, 2022

Share

२ . संस्कार : सर्वसत्यांस सयुक्त साकार म्हणजेच संस्कार . म्हणजे जे जे सत्य , शाश्वत , कल्याणकारी , मंगलमय आहे त्याला विरोध न करणे तर त्याशी सकारात्मक होण्याचे विचार मनात रूजवणे आणि जे जे अहितकारक , नुकसान करणारे आहे ते विचार मनातून काढून टाकणे . चांगले हे कसे उपयुक्त , चांगले आहे व वाईट हे का वाईट आहे याची जाणीव मनात ठेवून चांगले आचरणात आणण्याची तयारी करणे , जसे की जमिनीतील दगड , धोंडे , काटेकुटे , गवत हे निरूपयोगी , बाधक काढून टाकले जाते व उपजिवीकेस उपयुक्त धान , पिक ठेवले जाते , फळ , पिकांची लागवड करून तीच वाढवली जाते तद्वतच संस्काराचेही आहे . व्यक्ती सदाचारी , सद्वर्तनी , सुज्ञ , शांत , संयमी , होईल असा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे ही प्रक्रिया आहे .
३ . सेवा : सेवा परमोधर्म : सेवाभाव हा एक खूप चांगला संस्कार आहे . सेवेने खूप काही सिध्द होते . सेवाश्रमाने व्यक्ती अत्युच्च किर्तीशिखरावर पोहोचते , मनापासून खरी सेवा करणारी व्यक्ती सुखी , समाधानी , शांत होते . सेवा सिध्दी प्राप्तीचे खूप मोठे साधन आहे . कुटूंबातील आई वडील यांची सेवा , पत्नी मुलांचा सांभाळ , व्रूध्दांची सेवा , समाज , राष्ट्रसेवा , रूग्णसेवा करणारा व्यक्ती वाईट वर्तन करू शकत नाही . सामाजसेवा म्हणजे सामाजिक कार्यात भाग घेऊन शरिरश्रम करणे , समाजस्वच्छता करणे , सामाजिक कार्याला हातभार लावणे , रोगराई , वाईट विचार व गोष्टी याबद्दल जनजागृती करणे , चांगल्या गोष्टी ,विचार , आदर्शांचा पुरस्कार करणे अशाप्रकारे समाजसेवा करणारा व्यक्ती हा चांगला सद्वर्तनी ठरतो . अशाकडून वाईट वर्तन होण्याची शक्यता नसते . राष्ट्राच्या बाबतसुध्दा व्यक्तीच्या मनात सेवाभाव , प्रेम असेल तर व्यक्ती राष्ट्रद्रोह करणार नाही , राष्ट्रीय आदर्श , मानचिन्हे , प्रतिके यांचा अनादर करणार नाही . दहशतवाद , फुटीरतावाद करणार नाही किंवा त्यास कुठल्याही प्रकारचे साह्य करणार नाही .
४ समाज : समाज म्हणजे ज्या लोकसमुहात आपापसात रोटीबेटीचे व्यवहार होतात त्याला समाज असे म्हणतात . ज्या वैचारिक प्रणालिंच्या व्यक्तींचा समाज असतो त्या समाजातील कुटूंबात जन्मलेल्या व्यक्तीच्या बालपणी बालमनावर त्यांचे आपसुकच संस्कार झालेले असतात . जर सामाजिक वातावरण अस्वच्छ , गुन्हेगारी , जुगारी , व्यसनी किंवा धर्मांव जिहादी असेल तर तेच संस्कार होऊन समाजात , देशात त्याच तसल्या प्रकारचे वर्तन करणाऱ्या असंख्य व्यक्ती तयार होतात आणि स्वर्गासारख्या पुण्यपावन , शांत , सुखी , सम्रूध्द समाज व देशाची नरकावस्था झाल्याशिवाय राहत नाही . याउलट समाज हा सुशिक्षित , सुज्ञ , संस्कारक्षम , सदाचारी व्यक्तींचा असेल तर तेथे जन्मलेल्या बालकावर चांगले संस्कार होऊन समाज व देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यासारख्या वर्तन करणाऱ्या असंख्य व्यक्ती तयार होतील .
५ . वय : व्यक्तीचे वय हेसुद्धा व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे . व्यक्तीचे विचार आपल्या वयानुसार बदलतात म्हणजे व्यक्तीमध्ये वैचारिक परिवर्तन हे संभवते . वर्तन हे विचारानुसार घडते . एकंदरीत वयानुसार वर्तनातसुध्दा परिवर्तन होते . व्यक्ती बालवयात अनुकरणप्रिय असते . वडीलधारी मंडळी जे जे करतात ते पाहून ते करण्याकडे त्यांचा कल असतो . कुटुंब आणि समाजातील व्यक्ती या मद्यपान , धुम्रपान , मावा , गोवा , गुटखा व मटका करणाऱ्या असतील तर वयात येताच तेच वर्तन ते करतात .
तरूण वयात शारीरिक शक्तीची पूर्ण वाढ होऊन मस्ती म्हणजेच माज हा व्यक्तीला स्वस्थ , शांत राहूच देत नाही . ऊन्मत्त रेडा किंवा बैलाप्रमाणे व्यक्ती तरूण वयात बेधुंद , अनियंत्रित होऊन उधळते म्हणजेच अनिर्बंध वर्तन करू लागते . अशा या वेळी व्यक्तीने आपण घेतलेले शिक्षण , संस्कार याचे निरीक्षण करून त्याप्रमाणे आपले वर्तन आहे किंवा नाही याचे परिक्षण करावे लागते आणि परिक्षण करून अयोग्य आहे ते सोडून योग्य मार्गाचे आचरण करून संरक्षण करावे लागते .
व्रूध्दवयात काही व्यक्ती खूप दुःखी , कष्टी , नाराज , निराश आणि हताश होतात याचे कारण त्यांचे पूर्वायुष्यातील चंगळवादी , भोगवादी , छानछोकी , सर्वप्रकारचे वाईट वर्तन हेच असते .
६ . वाचन : वाचन म्हणजे केवळ पुस्तकांतील , ग्रंथातील , फळा , पाटीवरील अक्षरे , शब्द , वाक्य ही ओळखणे नसून त्यांतील तत्त्वार्थ , मतीतार्थ , भावार्थ समजून तो आपल्या जीवनाशी व्यापला पाहिजे . काय वाचले ? कशासाठी वाचले ? हे प्रश्न उपस्थित केले पाहिजे . वाचन आणि वाचनानंतर मनन चिंतन झाले पाहिजे . वाचनाने झालेली माहिती ही आचरणात आली पाहिजे तेव्हाच त्याला ज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त होईल व तेव्हाच ते वाचन सार्थकी लागले म्हणता येईल . बरे व्यक्तीचे वर्तन सुधारण्यासाठी , सदाचारी होण्यासाठी काय वाचावे हा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे . तर याचे उत्तर म्हणजे संतसाहित्य , आध्यात्मिक ग्रंथ , राष्ट्रभक्तीपर , नेत्यांची , विभुतींची चरित्रे , मानवतावादी ग्रंथ , शास्त्रज्ञ संशोधक यांची चरित्रे , तपस्वी ऋषी , मुनी , यांचे चरित्रग्रंथ अभ्यासले पाहीजेत .
७ विचार : विचार ही एक मनुष्याला लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे . ती एक कल्पवृक्ष , किंवा चिंतामणी आहे फक्त तीचा वापर हा चांगल्या गोष्टींचे चिंतन , विचार करण्यासाठी झाला पाहिजे अन्यथा शाप की वरदान अशी प्रश्नास्पद स्थिती होईल . इतर प्राणी पक्षी यांपेक्षा माणसांचे जीवन वेगळे , जगणे वागणे ते या विचारशक्तीवैशिष्ट्यामुळेच आहे . विचार करण्याच्या व माहिती ज्ञान साठवून ठेवण्याच्या धारणाशक्तीलाच आपण बुध्दी किंवा बुध्दीमत्ता म्हणतो . तर विचार हे व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करतात . व्यक्तीच्या सभोवतालचा परिसर , समाज , संगत , सहवास याला अनुसरून अनुकूल किंवा प्रतिकूल विचारवलये किंवा विचारतरंग व्यक्तीच्या मनात उठत असतात . त्यातील काही वलये ही तीरास पोहोचतात तर काही मध्येच विरतात . सभोवतालच्या गोष्टी , घटना या जेवढ्या तीव्र, जोराने शरिर मनावर आघात करणाऱ्या असतात तितक्याच प्रमाणात प्रतीक्रियासुध्दा निर्माण होतात . म्हणजे सहवास तसे चिंतन , चिंतन तशी क्रिया आणि क्रिया तशी प्रतीक्रिया हे एक विचारवर्तन सुत्रच आहे . यातून खरा बुध्दीवंत , ज्ञानवंत , सहनशै , आणि संस्कारक्षम व्यक्तीच मुक्त होऊ शकतो . आपले सद्वर्तन आबाधित ठेवतो .
८ . व्यवसाय : व्यवसाय हा घटकही व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करतो हे दिसून येते . व्यक्ती व्यवसायात गुंतून राहिल्यामुळे तिला तिच्या व्यवसायाशी निगडीत वर्तन करावे लागते . चांगले , खरे बोलावे आणि वागावे लागते . सौजन्याने रहावे लागते . तिरस्कार , द्वेष , मत्सर , क्रोध करून व्यवसाय चालत नाही . व्यवसाय भरभराटीला यायचा असेल तर व्यक्तीला सद्वर्तनी राहीलेच पाहिजे आणि म्हणूनच त्या व्यक्ती या उडाणटप्पू , उचापती करत नसतात . नोकरदार लोकांनाही सभ्य रहावे लागते , शिष्टाचार पाळावा लागतो . वेळेच्या बंधनात राहून काम पार पाडावे लागते . लाचलुचपत करून जमत नाही अन्यथा नोकरीवर पाणी सोडून बेकारीत जीवन घालवण्याची पाळी येते . राजकारण्यांनाही सांभाळूनच बोलावे लागते , श्रेष्ठींच्या सुचनांचे व आज्ञांचे पालन करावे लागते . नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात . वाद निर्माण होईल अशी वक्तव्य करून जमत नसते . भ्रष्टाचार केल्यास पद , पक्ष आणि प्रतिष्ठेला मुकावे लागते .
जे कोणतेही कामधंदा करत नाहीत , व्यवसाय करत नाहीत ते तशा व्यक्ती या उडाणटप्पू , उचापती , जुगारी , व्यसनी , आणि गुन्हेगारी वर्तन करणाऱ्या असतात . अशामुळे कुटुंबाचे , समाज व देशाचे नुकसान होते .
वर्तन म्हणजे स्वतः व इतरासंबधीत व्यवहार पार पाडणे .
व्यवहार म्हणजे विचार , वस्तू , भावना , भाषा आणि ज्ञान यांची देवाणघेवाण होय .
व्यक्तीचे वर्तन हे स्वच्छ , चारित्र्यवान , कर्तव्यदक्ष , सदाचारी , निर्मळ , मंगल , सेवाभावी , प्रयत्नवादी , प्रेरणादायी , आदर्श असले पाहिजे जे की गाव , समाज व देश यांना उर्जा देईल .
- - - - धर्मराज रत्तू पवार

245 

Share


Written by
धर्मराज रत्तू पवार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad