Bluepad | Bluepad
Bluepad
घरगुती हिंसाचाराचं सावट गडद होत आहे...
undefined undefined
undefined undefined
21st Apr, 2020

Share


घरगुती हिंसाचाराचं सावट गडद होत आहे...

माणूस मनातून जरी नेहमी प्रियजनांच्या घोळक्यात राहण्याची कामना करीत असला तरी जेंव्हा वेळ येते तेंव्हा तो ह्या गोष्टीला कंटाळतो. आपण मुलाबाळांना घेऊन मे महिन्याच्या सुट्टीत गावी जातो तेंव्हा हा प्रत्यय येतोच. नेहमी उठून कामाधंद्याला जाणार्‍या स्त्री पुरूषांना सुट्टी ही सुट्टीप्रमाणे एंजॉय करायला आवडते. यासाठी ८ ते १० दिवस पुरेसे असतात. त्यातही ते विविध ठिकाणी भेटी देणं, मित्रांना, नातेवाईकांना भेटणं, ख्याण्यापिण्याचे छंद जोपासणं ह्या गोष्टी करत असूनही ८-१० दिवसात त्याला कंटाळतात. मग आज तर कोरोना विषाणूने अख्ख्या जगाला घरात लॉक करून ठेवलं आहे. बर्‍याच वर्षांनी मिळालेली सुट्टी एंजॉय करा, राहून गेलेल्या गोष्टी करा असं आपण देखील या वेबसाइटच्या माध्यमातून आणि अनेक लोक अनेक प्लॅटफॉर्म वरून सांगत त्याचे मार्ग देखील सांगत आहेत. पण पुन्हा तेच. आपले छंद लोक किती काळ जोपासतील?

आजचे दिवस हे अनिश्चिततेचे. त्यात वेळच्या वेळी घरगुती सामान न मिळणं,  रांगा लावून सामान खरेदी करून आणणं, एटीएम, बँका बंद, हातात पैसे नाहीत, सर्व जगात दिसत असलेली नोकरी आणि आर्थिक स्थैर्याची अशाश्वती आणि कोरोनासंसर्गाची भिती या सगळ्याचा परिणाम हळू हळू सगळ्यांवरच जाणवू लागला आहे. पण लॉकडाउनच्या ही कितीतरी युगे आधी सुरू असलेली एक प्रवृत्ती या काळात डोकं वर काढू लागली आहे. आणि ती आहे कौटुंबिक हिंसाचाराची. जिथे नाती लग्नाच्या बंधनाने बांधून ‘घडवली’ गेली आहेत तिथे ही नाती आता बिघडलेली दिसत आहेत आणि त्यांनी चक्क हिंसेचं रूप धरण केलं असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.

लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी म्हणजे २७ फेब्रुवारी २०२० ते २२ मार्च २०२० पर्यन्त १२३ तक्रारी मेल आणि फोनच्या माध्यमातून दाखल झाल्या होत्या. मात्र लॉकडाउन सुरू झाल्यापासून म्हणजेच २३ मार्च २०२० ते १६ एप्रिल २०२० पर्यन्त राष्ट्रीय महिला आयोगाकडे तब्बल ५८७ स्त्रियांवरील अत्याचाराच्या तक्रारी मेल आणि फोनच्या माध्यमातून दाखल झाल्या. यातील २३९ तक्रारी ह्या निव्वळ घरगुती हिंसाचाराच्या आहेत. १० एप्रिल २०२० रोजी राष्ट्रीय महिला आयोगाने ७२१७७१३५३७२ हा व्हाट्सअप नंबर सुरू केला आहे आणि १७ एप्रिल पर्यन्त या नंबर वर ४० तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या तक्रारी मेल आणि फोनच्या माध्यमातून नोंदवल्या गेलेल्या आहेत. इथे अनेक स्त्रियांना राष्ट्रीय महिला आयोग ‘किस चिडिया का नाम’ हेच माहीत नाही तिथे तक्रारी नोंदवणं तर दूरच. व्हाट्सअप नंबरही अनेकांना म्हणजे अगदी नोकरी व्यवसाय करणार्‍या स्त्रियांनाही माहीत असेल की नाही ही शंकाच आहे. त्यामुळे प्रत्यक्षात होत असलेल्या घरगुती हिंसेचा आकडा लक्षणीय असू शकतो. या काळात आपण जिथे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य अधिक जपण्याचे प्रयत्न करीत आहोत तिथे ह्या घरगुती हिंसा स्त्रियांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी अधिक घातक ठरू शकतात.

हे दृश्य फक्त भारतातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील हीच परिस्थिती दिसून येते. ६ एप्रिल २०२० रोजी द न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात घरगुती हिंसचाराला ‘Intimate Terrorism’ ह्या नावाने तज्ञ आता संबोधू लागले असल्याचं म्हटलं आहे. सर्वच देशांनी तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन सुरू केल्यानंतर फक्त २ आठवड्यात एरवी येणार्‍या तक्रारींच्या वर सरासरी १८ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली. हे पाहणारे अधिकारी सांगतात की आम्हाला स्त्रियांना फार वाईट अनुभवाला सामोरं जावं लागत असल्याचं दिसत आहे. घरगुती हिंसाचार आधीही होत होते पण आता त्याने फार वाईट रूप धरण केलं आहे.

याच लेखात हार्वर्ड विद्यापीठाचे ट्रॉमा एक्स्पर्ट जुडीथ लुईस हर्मन यांचं एक विषण्ण करणारं विधान दिलं आहे. ते म्हणतात की, “सध्या घरात असणारे पुरुष इतके हिंसक वागत आहेत की ते घरातील स्त्रिया आणि मुलांवर दहशत माजवण्यासाठी एखादा अपहरणकर्ता अपहरण करून आणलेल्या पिडीताशी जसं वागेल किंवा हुकुमशाहीच्या सरकारातील पोलीस राजकीय कैद्यांशी त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी जसं वागतं तसे वागत आहेत.”स्पेन, फ्रांस इटली, अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान, जर्मनी अशा सर्वच देशांनी आपापल्या देशातील घरगुती हिंसाचाराचे कायदे ह्या लॉकडाउनच्या काळात कडक केले आहेत. पण जिथे नात्यालाच तडा गेला असेल तिथे कायदे त्याला एकसंध ठेऊ शकतील का?

तसं पहिलं तर सध्या विरोधी चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे सेलिब्रिटी असलेले स्त्री आणि पुरुष आपण घरातील कामे कशी विभागून किंवा एकट्यानेच करीत आहोत याचे विडिओ सोशल मीडियावर टाकत आहेत तिथेच सामान्य माणसाच्या घरात बायको कशी भांडी घासायला आणि लादी पुसायला लावते याचे विनोद वायरल होत आहेत. पूर्वी गम्मत म्हणून याचा आनंद स्त्रियाही घेत होत्या पण आता ते विनोद देखील नको वाटतात. अनेक पुरुष देखील याला विरोध करतात. त्यामुळे जसा कोरोनासंबंधी विनोद पाठवण्यावर अटकाव करण्यात आला आहे तसाच बायकांसंबंधी विनोदांवर बंदी असावी. अन्यथा ह्या एका मोठ्या दुखण्याचं गांभीर्यच लयाला जाईल. आज सर्वांनीच संवेदनशीलता दाखवण्याची गरज आहे. तरच हे दिवसही निघून जातील नाहीतर जाताना मागे फार वाईट पाऊलखुणा ठेऊन जातील.

22 

Share


undefined undefined
Written by
undefined undefined

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad