Bluepad२० एप्रिल २०२० नंतर लॉकडाउनमध्ये मिळणारी शिथिलता
Bluepad

२० एप्रिल २०२० नंतर लॉकडाउनमध्ये मिळणारी शिथिलता

D
Deepti Angrish M.
20th Apr, 2020

Share


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व सार्वजनिक सेवा काही काळासाठी बंद करून फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवल्या आहेत. पण यामुळे रोजंदारीवर असणार्‍या कामगारांचे मोठे हाल झाले. त्यांचं पोट रोजच्या कमाईवर पोसलं जात होतं. ही रोजची कमाई तर बंद झालीच शिवाय घरी जाण्याचे परतीचे मार्ग ही बंद झाले. त्यांच्या जगण्याचा प्रश्न इथल्या कम्यूनिटी किचनच्या माध्यमातून सोडवला गेला. त्यांना तयार जेवणाचा पुरवठा केला जात आहे. पण ही झाली त्यांची व्यवस्था. यामुळे लहान मोठे उद्योग जगू शकणार नाहीत. कोरोनाचे संकट टळल्यानंतर फार मोठे असे आर्थिक संकट संपूर्ण देशावर आणि जगावर येणार आहे. पण ते संकट थोड्या फार प्रमाणात कमी ठेवण्याची तयारी आपण आतापासूनच करायला हवी असं सर्वच अर्थतज्ञांचं मत आहे.
भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ३ मे पर्यन्त लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आपल्या १४ एप्रिल २०२० च्या संबोधनात जाहीर करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, कोरोनाला अटकाव करत उद्योग आणि सेवा कशा सुरू करू शकू याचं सुतोवाच केलं. ते म्हणाले की २० एप्रिलपर्यन्त कोरोनाचे संक्रमण अजिबात नाही किंवा अत्यंत कमी आहे असे विभाग पहिले जातील. त्यासाठी ब्लॉक्स, जिल्हे आणि राज्यांच्या कामगिरीवर काळजीपूर्वक नजर ठेवली जाईल असा इशारा देत ते म्हणाले की जिथे हा प्रादुर्भाव नसेल तिथे थोड्या फार प्रमाणात उद्योग आणि सेवा सुरू केल्या जातील. पंत प्रधानांच्या वक्तव्याप्रमाणे १५ एप्रिल रोजी मार्गदर्शक सूची केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य गृह मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आली. बघूया २० एप्रिल २०२० नंतर काय काय बंदच राहील आणि काय काय सुरू होणार आहे.
काय काय बंद राहणार –
(i) देशभरातील परिवहन सुविधा ज्यात टॅक्सी, रिक्षा, कॅब, विमान सेवा, रेल्वे, बस
(ii) शैक्षणिक कार्य, प्रशिक्षण संस्था
(iii) खेळ, सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स
(iv) सर्व सामाजिक, राजकीय कार्यक्रम
(v) सर्व धार्मिक स्थळ, सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम यावर बंदी कायम राहणार आहे.
(vi) मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी २० माणसांच्या वर परवानगी नसेल. याशिवाय या सर्वांनी लॉकडाउनच्या मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आदि सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे, काही ग्रीन झोनमध्ये येणार्‍या भागात पून्हा कोरोनाची चाचणी करून जिथे कोरोनाचे प्रमाण शुन्यावर असेल तिथे काही कार्यक्रमांना शिथिलता देण्यात येईल. मात्र सध्या तरी बंदीमध्ये या सर्वांचा समावेश आहे. असे गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशात नमुद केले आहे.
काय काय सुरू होईल –
(i) जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, त्यांचे मालवाहतुक करणारे ट्रक्स आणि ट्रकचे गॅरेजेस
(ii)शेतीसंबंधीची सर्व कामं, खत आणि कीटकनाशकांची विक्री करणारी दुकानं
(iii)मत्स्य व्ययसाय, सिंचन प्रकल्प आणि मनरेगाची कामं
(iv)डिजिटल व्यवहार
(v)आयटी सेवा आणि कॉल सेंटर्स
(vi)कुरीयर सेवा, इलेक्ट्रिशियन, प्लंबर्स, मोटर मेकॅनिक्स
(vii)सरकारी कार्यालये
(viii)ऑनलाइन शिक्षण
(ix)आरोग्य सेवा
(x)लॉकडाउनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्यासाठी हॉटेल्स, मोटेल्स आणि क्वारंटाईन सेंटर्स
२० एप्रिल २०२० नंतर कृषी व संबंधित कार्य पूर्णपणे कार्यरत राहतील; ग्रामीण अर्थव्यवस्था जास्तीत जास्त कार्यक्षमतेने काम करण्यासाठी रोजंदारीवर काम करणार्‍या आणि इतर कामगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. निवडक औद्योगिक उपक्रम ग्रामीण भागात सुरू करण्यात येतील मात्र, लोकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावयाची आहे. सर्वांना मास्क घालणे अनिवार्य आहे, असे गृहमंत्रालयाने सांगितले आहे. लक्षात ठेवा कोरोनाचा मुकाबला करणं हे ह्या संपूर्ण लॉकडाउनचं उद्दीष्ट आहे. उगीच गर्दी झालेली किंवा लॉकडाउनचे नियम पाळले जात नाहीत हे लक्षात आल्यास मिळालेली शिथिलता काढून घेतली जाईल आणि पुन्हा एकदा त्या त्या ठिकाणचे सुरू झालेले व्यवहार बंद होतील. आपल्याला आर्थिक व्यवहार सुरळीत होणं जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा कैक पटीने अधिक मौल्यवान लोकांचे प्राण आहेत. तेंव्हा आपण सर्वांनीच यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे.

0 

Share


D
Written by
Deepti Angrish M.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad