Bluepadसफूरा जरगर न्यायाच्या प्रतीक्षेत!
Bluepad

सफूरा जरगर न्यायाच्या प्रतीक्षेत!

S
Shruti More
14th Jun, 2020

Shareभारत हा लोकशाही राज्यपद्धत असलेला देश आहे. २९ नोव्हेंबर १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द करून ते त्यांनी देशाला समर्पित केलं. त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून भारतीय प्रजासत्ताकाची सुरुवात झाली. हे तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्हाला सांगत नाहीये तर त्या तमाम वर्चस्ववादी लोकांना आठवण करून देण्यासाठी मी हे लिहिले आहे जे आपण किती श्रेष्ठ आहोत हे सांगण्यासाठी कोणत्याही थराला जातात. आपण एका स्वतंत्र आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणार्‍या देशात रहात आहोत आणि इथे प्रत्येकाला आपल्या म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, हे काही लोक जणू काळाच्या ओघात विसरून गेले आहेत.
गेल्या सहा वर्षात आपल्या देशात अनेक बदल घडले. बदल हे आवश्यक आहेत. पण ते समाजावर लादून करता येत नाहीत. पण मागच्या काही वर्षात आपण हीच कायदे अंमलात आणण्याची पद्धत आहे की काय असं मानायला लागलो आहोत. अशाप्रकारे “उद्या काय घोषणा होईल आणि आपलं संपूर्ण आयुष्य बदलून किंबहुना उद्ध्वस्त होऊन जाईल” अशी भीती सामान्य माणसाच्या मनात घर करून राहिली आहे. या भीती सोबतच आणखी ही एक भीती आहे ती या सगळ्याविषयी “ब्र” काढण्याची. कारण देशाच्याच नाही तर राज्यकर्त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात बोलण्याला “देशद्रोह” समजला जात आहे. काहीही कारण नसताना किंवा योग्य कारण नसताना कोणाचीही धरपकड केली जात आहे. मग त्यात स्त्री पुरुष असा भेद केला जात नाहीये.

लॉकडाउन पूर्वी संपूर्ण देशात सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मोठा वादंग माजला होता. ह्या कायद्याविषयी इथे चर्चा करणार नाहीये. पण सरकार एका रात्रीत जर एखादा कायदा आणत असेल तर त्याला विरोध करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. पण सध्याच्या सरकारला आपल्या विरोधात असणार्‍या प्रत्येकाला गजाआड पाठवायचं आहे. म्हणून या कायद्याच्या विरोधात उसळलेल्या दंगली नंतर दोन महिन्यांनी त्यांनी काही आंदोलकांच्या विरोधात एफआयआर नोंदवली आणि काही लोकांवर अशा कलमान्वये गुन्हे दाखल केले ज्यामुळे त्यांना सहजासहजी जामीन सुद्ध मिळणार नाही.

२३ फेब्रुवारी २०२० रोजी दिल्लीतील इतर अनेक ठिकाणांप्रमाणे उत्तर दिल्लीतील खुरेजी आणि चाँद बाग परिसरात देखील आंदोलन सुरू होते. या आंदोलनात शांततापूर्ण आंदोलन करणारी एक कार्यकर्ती सफूरा जरगर आधी खुरेजी भागात गेली आणि तिने तिथे भाषण सुद्धा दिलं. त्यानंतर ती चाँद बागेत गेली पण तिथे तिने भाषण दिलं नाही. मात्र ती तिथून निघाल्यानंतर बर्‍याच वेळानंतर चाँद बागेत दंगल उसळली. यासाठी पोलिसांनी काही लोकांना अटक केली. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी म्हणजे लॉकडाउन सुरू असताना पोलिसांनी सफूरा जरगर, डॉ. काफील खान आणि शार्जील इमाम आणि इतर आंदोलनकर्त्यांच्या विरोधात ४८ नंबरची एफआयआर नोंदवली. त्यांच्यावर भडकाऊ भाषण केल्याचा आरोप ठेऊन त्यांना १० एप्रिल २०२० रोजी Unlawful Activities Prevention Act अर्थात यूएपीए अंतर्गत त्यांना अटक केली. त्यावेळी सफूरा जरगर ही दोन महिन्यांची गरोदर होती. १३ एप्रिल रोजी सफूराला जामीन मिळाला पण लागलीच तिला एफआयआर क्रमांक ५९ अन्वये २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी जाफराबाद मेट्रो स्टेशनमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याची योजना केल्याचा आरोप ठेवल्याने तिला जामीन नाकारला गेला. सध्या ती तिहार जेलमध्ये आहे. सफूरा दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील एम.फीलची विद्यार्थिनी आहे. याशिवाय ती जामिया कोओर्डिंनेशन कमिटीची मीडिया कोओर्डिंनेटर आहे.

१८ एप्रिल आणि ३० मे रोजी सफूराच्या रितेश धार दूबे आणि त्रिदीप पैस या वकिलांनी जामीनासाठी अर्जं केले पण ते अनुक्रमे २ मे आणि ४ जून रोजी नाकारले गेले. ह्या दोन्ही वेळी न्यायाधीशांनी साक्षीदार आणि वाट्सअॅप चॅट वरून हे ग्राह्य धरून आपले निकाल ऐकवले. सफूरा गरोदर असल्यामुळे तुरुंगात तिची व्यवस्थित काळजी घेतली जाईल अशी शाश्वतीही त्यांनी यावेळी दिली. पण मुळात न दिलेल्या भाषणासाठी तिच्यावर बेकायदेशीर कृत्याचा आरोप ठेवून अशा प्रकारे कारागृहात टाकणं हे सर्वथा अमानवी आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपल्या देशातील एका वर्गाला दुसर्‍या एका वर्गावर अन्याय होतोय याची काही तमा नसते. आपण उगीच ‘अनेकतेत एकता’ वगैरे मखमली शब्द वापरुन आपल्या देशाचं एक सुंदर चित्र उभं करतो पण प्रत्यक्षात ते तसं नाहीये. विनाकारण इथे कोणाला अटक होतेय तर कोणाला प्रत्यक्ष पुरावे असताना सोडून दिलं जात आहे आणि त्याचा उत्सवही साजरा केला जातो आहे. पण सफूरासारख्या लढवैयांचा मात्र अपमान केला जातो. याचं प्रत्यंतर आलं ते सफूरावर झालेल्या ट्रोल हल्ल्यानंतर.

सफूरा गरोदर आहे यावर गरोदर स्त्रीला कारागृहात ठेऊ नये, एवढी साधी भूमिका आपल्या देशातील तथाकथित स्त्री दक्षिण्य मानणार्‍या लोकांनी घेतली नाहीच. उलट ट्विटर वर तिला ट्रोल करत तिच्या गरोदरपणावर शंका घेत तिच्यावर लांछनास्पद आरोप केले. “आई” ह्या शब्दाभोवतीचं सर्व तत्वज्ञान धुळीस मिळालं आहे की काय असं वाटू लागलं आहे. तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जातेय. इथे तिला झालेली अटक ही किती अयोग्य आहे अशा भावना व्यक्त करण्याऐवजी हे जे काही एका स्त्रीचा अवमान करण्याची भाषा बोलली जात आहे ते त्या स्त्रीच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारं नाही का? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा गैरफायदा नाही का? आश्चर्य म्हणजे यावर उजव्या विचारसरणीची कोणीही स्त्री काहीही बोलत नाहीये. न्यायालये सुद्धा राज्यकर्त्यांची भाषा बोलत आहे. सामान्य माणसाला वाली उरला नाही म्हणतात ते हेच.

आता सफूरावर सरळ ट्रायल सुरू होणार आहे. तोवर कदाचित तिचं बाळ जन्माला येईल. कारागृहात जन्म घेणार्‍या बाळाची भविष्यवाणी आपण नव्याने करण्याची गरज नाही हे लक्षात असू द्यावं.

15 

Share


S
Written by
Shruti More

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad