Bluepad | Bluepad
Bluepad
चहा गरम
धनश्री अजित जोशी
24th Jun, 2022

Share

चहा गरम
आलं स्टेशन या सारे सारेजण ,
आता झुकझुक गाडीतून जाऊ आपण
गरमागरम चहा वाला नाशिकचा चिवडेवाला,
थंडा थंडा सरबत घ्या लोणावळ्याची चिक्की घ्या चहा गरम..
या बालगीतातून चहाशी पहिली ओळख झाली..मला आठवतंय..आईला चहा मागितला की ती कपभर दुधात दोन चमचे चहा टाकून द्यायची..चहा कसला तो..चहादूधच म्हणायचे..लहानपणी तेवढ्यानेही समाधान व्हायचे..
मला वाटते सगळ्यांना थोड्याफार फरकाने " चहा" ची ओळख साधारण अशीच होत असावी.
आता मात्र आपण पक्के चहाबाज..केव्हा ही कधीही चालतो..दिवस सुरू होतो तो चहानेच..मस्त गरमागरम वाफाळता अल्ला डालके. कडक ..चहा चांगला झाला की दिवसाची सुरुवात भारी.. मग नऊचा .फार नाही..दुपारी तीन आणि सहा..बस्स दिवसातून चार वेळा लागतोच
..कोणी आलं गेले , कुठे गेलो..तर चहाला कसं नाही म्हणणार ना..? तसा थोडाफार. चहा केव्हाही चालतो .चहाने भूक मरते..झोप येत नाही अशी आपली कुठली ही तक्रार नाही..
चहाच्या वेळी चहा लागतो...आणि कोणत्याही वेळी चालतो..चहाची वेळ असते..आणि चहाला वेळ नसते ही टॅग लाईन पटणारी..
पाऊस पडतोय..गरमागरम चहा आणि बरोबर भजी क्या बात है..पंचतारांकित जेवण फिके त्यापुढे.
चहा बरोबर मारी , ग्लुकोज कोणतीही बिस्किटं..हिंदुस्थान ची खारी , बाॅम्बेखारी आणि मुस्कापाव म्हणजे क्या बात है..चहाची लज्जत दसपट..
चहा गरम
चहा आल्या चा , मसाल्याचा , शक्कर बिना शक्कर , गुळाचा , इराण्याचा ,टपरीतला ..कोणताही चालतो..
चहा म्हटलं की तरतरी येते..उगाच नाही चहाला अमृत म्हणत.
हल्ली गल्लोगल्ली चहाची दुकाने दिसतात..प्रेमाचा चहा , गुळाचा चहा.., खोमण्यांचा चहा..अमृततुल्य चहा..इराण्याचा चहा..साई चहा..वेळ कोणतीही असो सिझन कोणताही असो चहाच्या दुकानात ही...गर्दी..काही नाही जमत चहाची टपरी काढ..चालणारच..लोकांना चहा लागतो ..आवडतो..आणि ..लाभतो..
लागतो ,आवडतो इतपत ठीक आहे "लाभतो " हे काय नवीन? असे म्हणाल. ..तर लाभतो..प्रेम व्यक्त करताना , भांडणतंटे मिळवताना , चहाच कामी येतो..चहाच्या कपात खूप सामर्थ्य आहे बर का..एक कट चहा आणि त्याबरोबर तासंतास रंगलेल्या गप्पा हे प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले अविस्मरणीय क्षण..अगदी बिझनेस चे डील असो वा प्रेमाचे कित्येक यशस्वी घडामोडींचा साक्षीदार चहाचा कप असतो.
संसाराची सुरवात..मुलगी बघण्याचा कार्यक्रम..आठवतो..का ..चहा पोहे ? कित्येकांच्या प्रथम भेटीचा साक्षीदार हा चहाचा कप असतो...थरथरत्या हाताने..दिलेला तो चहाचा कप..आणि ओझरता स्पर्श..युगायुगांचे ओळख पटवणारा..आयुष्याचा जोडीदार मिळवून देण्यार्या क्षणांचा साक्षीदार असलेला चहा.
काॅलेजमध्ये असताना एक कटींग चहाच्या मोबदल्यात ऐकलेली गाणी मारलेल्या गप्पा..हे सगळे आठवताना हमखास आठवतो ..तो राजकपूर नर्गीस श्री चार सौ बीस..चहाच्या टपरीवर फुलले प्रेम आणि अजरामर गीत " प्यार हुआ इकार हुआ " साधेसुधे भोलेभाले प्रेम..
एक चहाचा कप पाहिला आणि असंख्य गोष्टी आठवल्या..कित्येक वादळे या चहाच्या कपात शमली असतील , कित्येक जणांना त्याने जवळ आणले असेल याची गणतीच होवू शकणार नाही.
" या एकदा आमच्या कडे चहाला "
" आमच्याकडे चहाला नक्की यायचं हं " अश्या बोलावण्याने कित्येकांना जवळ आणले असेल ? दोस्तांमधल्या दोस्ती चा साक्षीदार चहा.. तसं पाहिला गेले तर चहाला..म्हणजे चहापाणी वगैरे...संमहार द्वंद्व.. बरोबर पोहे उपमा ...वगैरे..चहा महत्वाचा..
चहाने माणसे एकत्रच आणली नाहीत तर चहाने क्रांती केली..अमेरिकन राज्यक्रांती ..बोस्टन टी पार्टी..
स्वातंत्र्य पूर्व काळात पुण्यात घडलेली घटना..लोकमान्य टिळक आगरकर..इत्यादी नेत्यांनी घेतलेला चहा बरोबर खाल्लेले बिस्किट. पुण्याच्या , नव्हे नव्हे भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात घडलेली क्रांतिकारक घटना...उलथापालथ घडवणारी..
या एक कप चहा पिण्यासाठी पूर्वी भारतीय स्त्रियांना किती युक्त्या कराव्या लागल्यात..कित्येकींना मारहाण सहन करावी लागली आहे...त्यांनी सहन केले म्हणून आज आपण उजळमाथ्याने चहा पिऊ शकतो..इतिहास साक्ष आहे..
तर असा हा चहा..सर्व मान्य ..अर्थात काही काॅफी वाले खडूस भेटतात अधून मधून..पण चहा तो चहाच हो..आता काय म्हणे चहाचे आईस टी कोल्ड टी असे ही वेगवेगळे प्रकार मिळतात म्हणे..
पण गरमागरम चहाला कोणत्याही सिझन मध्ये कोणत्याही वेळी पर्याय नाही हेच खरे हो..बरोबर बिस्किट्स असतील तर उत्तम..नाहीतर चहा..कडक चहा..हेच खरं हो..
उगाच नाही त्याला अमृत म्हणत.
चहा गरम

176 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad