बाहेर मस्त पाऊस कोसळतोय, सारे वातावरण आल्हाददायक व थंड झाले आहे अशावेळी गरमा गरम भजी आणि वाफळता चहा मिळाला की जणू काही स्वर्गच असतो. म्हणूनच हल्ली सगळीकडे अमृततुल्य चहा मिळू लागला आहे.
आपल्याला रोज उठल्यावर चहा हा लागतोच. काहींना चहा पिणे आणि सोबत पेपर वाचण्याची सवय असते. तर ब-याच जणांना सकाळचा चहा घेतला नाही तर पोट साफच होत नाही. म्हणूनच चहा हे पृथ्वीवरील अमृत आहे असे म्हणतात. चहा प्यायल्याने माणूस ताजा तवाना होतो असे मानले जाते.
जगभरात १५ डिसेंबर हा दिवस इंटरनॅशनल टी डे म्हणून साजरा केला जातो. जगभरात चहाचे शौकीन कोट्यावधींच्या संख्येने आहेत.
चहाचा शोध सर्वप्रथम चीन मध्ये लागला हे सत्य अनेकांना माहिती असेल. शीन नुंग नावाच्या राजाच्या गरम पाण्याच्या कपात नजरचुकीने चहाचे वाळलेले पान पडले आणि त्या पाण्याचा रंग बदलला. राजाने या पाण्याची चव घेतली तेव्हा त्याला तो स्वाद खुपच आवडला आणि त्यातून चहाचा शोध लागला. आज पाण्यानंतर जगात सर्वाधिक कुठले पेय प्यायले जात असेल तर ते आहे चहा. सुरवातीला हे पेय फक्त हिवाळ्यात औषध म्हणून प्यायले जात असे पण दररोज चहा पिण्याची प्रथा सर्वप्रथम भारतात १८३५ पासून सुरु झाली असे सांगतात.
आज जगात १५०० प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. मात्र काळा, पांढरा, पिवळा आणि हिरवा हे चहाचे प्रकार प्राचीन मानले जातात. भारतात आसाम हे चहा उत्पादन करणारे महत्वाचे राज्य असून चहाचे सर्वाधिक उत्पादन चीन आणि त्यापाठोपाठ भारतात होते. चहामधील एल थेनाइन हे द्रव्य मेंदूची शक्ती वाढविते. स्ट्रेस कमी करते आणि बुद्धी विकास करते. यामुळे झोप पळून जाते असेही मानले जाते.
काळा चहा किंवा कोरा चहा हा ऊर्जा प्रदान करणारा असतो. अति कष्टाळू आणि चंचल माणसे नेहमी कोरा चहाच पितात. कोरा चहा हा रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करतो. तसेच हृदयविकार असणारे लोक नेहमी याचे सेवन करतात कारण कोरा चहा पिल्याने रक्तप्रवाह सुधारतो. अतिसार किंवा उलट्या होत असल्यास कोरा चहा प्यावा. कर्करोगात सुद्धा कोरा चहा गुणकारी आहे. काळजी घेण्यासारखी बाब म्हणजे कोऱ्या चहामध्ये साखरेचा वापर कमी करावा. त्याऐवजी गुळ वापरावा कारण गुळाच्या चहामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते. चयापचय संस्था व्यवस्थित काम करते तसेच गुळाचा चहा हा कफनाशक देखील आहे.
उपाशी पोटी चहा पिणे टाळावे. उपाशी पोटी चहा घेतल्याने प्रोस्टेट कॅन्सर सारखा आजार संभवतो तसेच एसिडिटीचा त्रास जाणवतो. उपाशी पोटी चहा प्यायल्याने तेवढ्यापुरती तरतरी जाणवते पण दिवसभर पुन्हा थकवा येऊ लागतो. मळमळ सुरू होते. अति चहा पिल्याने हृदय आणि आतड्याचे आरोग्य बिघडते. अति चहामुळे निद्रानाश जाणवतो तसेच रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो.
भारतातील सर्वोत्कृष्ट चहा पावडर ब्रँड -- टाटा टी, ताज महाल चहा, ब्रुक बाँड टी, सोसायटी चहा, लिप्टन टी, वाघ बकरी चाय.
चहाचे काही मुख्य प्रकार -- ग्रीन टी, ब्लॅक टी, व्हाइट टी, हर्बल टी, ओलॉन्ग टी, किण्वित चहा