Bluepad | Bluepad
Bluepad
आंब्यांना
नैनेश म्हात्रे
नैनेश म्हात्रे
24th Jun, 2022

Share

तर आंब्यांची आठवण अशी
खुप लहान होतो आम्ही जेव्हा; तेव्हा गावात विज होती पण ठराविक घरांमध्येच....
उन्हाळ्यात रात्रीची जेवणं उरकली की जवळ जवळ आख्ख शेजार एका ठराविक ठिकाणी विरंगुळा म्हणून मोकळ्या वातावरणातील शुद्ध ताजी हवा खाण्यास... गप्पा मारण्यास दिवसभरातील कामाचा थकवा घालवण्यासाठी एकत्र जमत.... मग झोप येईपर्यंत त्या गप्पा चालत...
मी मघाशी म्हटल्याप्रमाणे विज ठराविक घरांमध्येच होती.... उन्हाळ्यात गर्मीचा त्रास घालवण्यासाठी खुप जणं घराच्या बाहेर एका मोकळ्या *पायावर* (घरबांधणीसाठी उभारलेला Base) झोपत...असे खुप जमाव .. ठिकठिकाणी जमावा जमावाने झोपत...
मग झोपण्यासाठी ठिकठिकाणी बादलं(लाकडी चौपाई त्याला काथ्याच्या दोरीने विणलं जातं ती खाट).... त्याला आम्ही बादलं म्हणतं.
आणि फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया ,मुलं खुप सारी मंडळी बाहेर शुद्ध हवेत झोपतं.... आतासारखी प्रदुषीत हवा नव्हती तेव्हा ....
मच्छर ही नव्हतीच असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.. सत्पर्षी,चांदण्या,चंद्र....हे सर्व पाहत पाहत अंगणात झोपी जायचो..... सप्तर्षी ला आजी म्हातारीच खाटलं म्हणायची....😃 झोप येत नसेल तर माझा आवडीचा विषय.... आज्जी किंवा आई किंवा काकु भुतांची गोष्ट सांग.... जेव्हा गोष्ट चालु व्हायची तेव्हा खुप टरकलेली असायची माझी.पण गोष्ट ऐकत ऐकत आईच्या आज्जीच्या कुशीचा आसरा घेत घट्ट पकड...आणि मग कधी झोप लागायची कळायचं सुद्धा नाही...
कार्टून.... रिल्स.... इडियट बॉक्स न पाहता आम्हांस झोप लागायची😊
सर्व दादा ,भाऊ ,ताई मंडळी एकत्र यायचो अंगणात झोपायचो तेव्हा गप्पांना उधाण यायचं...आम्ही कच्चा लिंबु😃
त्यावेळी संसाधने कमी होती...पण माणसं सुखी होती..... घड्याळ काही जणांकडेच असायचा पण एकमेकांची विचारपूस करायला.. एकत्र यायला माणसांकडे वेळ होता....
तर सकाळी पहाटे लवकर उठून त्या आंब्यांच्या काळात (सिझन)मध्ये दादा..ताई लोक आंब्यांना जात... लवकर म्हणजे प्रत:काळी ३:०० वाजता...०५ वाजता.... बहुतेक त्यासाठीच हे लोक उन्हाळ्यात बाहेर झोपत असावे....
तर पहिला कोंबडा आरवला की तडबडत उठून आंब्यांना जाण्यास सज्ज....फक्त चुळ भरली...हातात काठी...आणि खुप महत्वाचं आणि काळोखात झाडाखाली पडलेले आंबे शोधण्यास आवश्यक आणि प्रकाशासाठी गरजेचं साधन म्हणजे *टेंब्या*
*टेंब्या* (एका काचेच्या बाटलीत घासलेट भरून तिच्यात वात टाकून ती प्रकाशासाठी वापरली जायची तिला बत्ती म्हणतात...तर ती बत्ती एका पत्र्याच्या डब्यात भोक पाडून घुसवली जायची.... मग डब्याला पकडायला तार बांधली जायची...तो *टेंब्या*)
डब्यामुळे त्याचा प्रकाश सरळ दिशेत पडायचा.... हवेपासून विझत नसायचा आणि पकडायला सोपा)
आंब्याना जाताना त्या *टेंब्याचे* खुप महत्व होतं😊... नंतर सेलची बॅटरी .... चार्जिंग ची बॅटरी
पण टेंब्याने त्याची जिम्मेदारी चोख बजावली होती .
मग ही मंडळी सर्व आंब्यांखाली फीरून...कोणी कासावरून.... कोणी वरांबीतुन...
आंब्यांना
गोणीभर आंबे घेऊन यायचे.... मग जर आंबे एकत्र एकटले (गोळा) केले असतील तर त्याची वाटणी केली जायची.... रायवली हा शब्द आम्हांस नंतर कळाला....आम्ही या सर्वांना *गावठी* आंबे म्हणत असु.
वाटा ही खुप मोठा असायचा...मग ते आंबे एका भांड्यात पाण्यात टाकून सर्व जण गोलाकार बसुन खाल्ले जायचे..
खाण्याचीही एक विशिष्ट पद्धत होती...आंबा धुतल्यानंतर त्याच्या डेक्याजवळचा भाग ठेचायचा....लस चिमटित दाबुन काढायची....मग त्याचा रस संपेपर्यंत चुपायचा (चोखायचा😋).. शेवटी राहतो तो बाटा...👈🏻त्याला असा हाताच्या पंच्यामध्ये दाबायचा आणि जिथुन जिथुन रस बाहेर पडेल तो चोखायचा...बोटांच्या मधुन ...हाताच्या खाली रेंगाळत आलेला रस ही😛.... अगदी तो पुर्ण शरीरातील रक्त संपल्यावर जसा सफेद होईपर्यंत....
तर आता जॉगिंग, वॉक करायला फिटनेस साठी ज्या Activities करव्या लागतात त्या .. त्यावेळी आपोआप घडायच्या आधुनिकतेतुन आपल्याकडे सुखसुविधा आल्या खर्या पण नैसर्गिक संसाधने कमी होत चालली.... झाडांची कत्तल ....तापमाणात वाढ...आसो....त्या वेळी छोट्या छोट्या गोष्टीत माणसं सुखी व्हायची.... आम्ही मोठे होता होता तो काळ बदलला....😞
तर आम्ही जेव्हा आंब्यांना जायचो तेव्हा तसेच मित्रांचा लवा जमा घेऊन... हो आम्ही सुद्धा पहाटे लवकर उठून...पण बहुतेक ०५ च्या नंतर असु...कोंबडा आरवला ..कावळे काकाळले(झाडावरून कावळे पहाटे उठण्याची वेळ.... कावळ्यांचा काव काव हा सामुहिक भल्या पहाटे चा आवाज)ऊठ ..जातोस ना आंब्यांना जिवन निघाला जा लवकर.... साखरझोपेत असताना आईचा आवाज कानावर पडायचा..मग आंब्यांना जाण्यासाठी माझी लगबग सुरू...पहिली पिशवी शोधणे.....मग आंब्यांना रवाना..
आमचा आंब्याचा मार्ग... सुरवात बापले हद्दीकडून...पहिला थांबा *वरांबी* (ठिकाणाचे नाव) वरांबीत गेल्यानंतर पहिला आंबा म्हणजे पांडूकाकांचा आंबा त्याला पांडूचा आंबा हेच नामकरण झाले होते...त्याची तोड पुर्ण वरांबीतील आंब्यांना नव्हती.... सका-सकाळी त्या आंब्याखाली खुप आंबे पडलेले असायचे... आर्धी पिशवी तर तिथेच भरली जायची.
वरांबी मध्ये *पांडूचा आंबा* ....मग मावशीच्या शेतावरील आंब्याखाली...मग मामांच्या आंब्याखाली......तिथुन वायल्यात....मग कामतात (त्याला बांधण ही म्हणतात) मग तिथुन पाचआंब्याकडे (महाजन्याकडे).....शेवट डुंबरे.
पिशवी भरून टूम व्हायची ...मग घरी मार्गस्थ.....
घरी पोचल्यावर आराम.... जेवण...छे ओ
कधी एकदा घरी जातोय आणि विहरीत डुबकी लगावतोय असं व्हायचं...
आम्ही कोकणातील अलिबागकर त्यामुळे अंगाची लाही लाही व्हायची असं नाही...पण खुप लांबचा पल्ला हुंदडून आल्यामुळे गर्मीत थंडाव्या साठी हक्काच swimming Station गावची सार्वजनिक विहीर.. *खारी विहीर* (विहीरीचे नाव)....जा रे लवकर पिशवी ठेवून ये पोहायला (मित्रांचा आवाज) मग सोबतीला लाईफ बॉय .....
मग एक एक करून विहरीत उड्या मारायचो...उडीचे प्रकार १)डुबा - डुबा म्हणजे दोन्ही पाय आणि हात शरीरासोबत घडी करून मारलेली उडी...
मग त्याची पण स्पर्धा व्हायची..कोणाचा डुबा उंच उडतोय (म्हणजे डुबा उडी मारल्यावर बाहेर जे पाणी उडतं ते कीती उंच किंवा विहरीच्या बाहेर उडतं असं)
२)पारंय(पाहार) _ हात शरीरासोबत सरळ आणि पाय ही सरळ ती मारलेली विहीरीतील सरळ उडी म्हणजे पारयं(पहार)😊
कुणी सुर मारायचं ( सैराट मध्ये परश्याने पाण्यात डोक्याकडून मारली ती उडी)
पोहायला कधी शिकलो आमचं आम्हालाच कळालं नाही....
त्यासाठी swimming class लावण्याची गरज नाही भासली आमच्या आई बाबांना...
तर पोहुन..जेवुन झाल्यावर कोणाच्या तरी ओटीवर बसायचो
मग दुपारी कोणाच्या तरी ओटीवर बसलेलो असताना बेत व्हायचा परत आंब्यांना जायचा....मग कधी कासावर(गावाबाहेरील डोंगर- जागेच नावं-जंगलात)
किंवा जवळच वरांबी किंवा बांधणात..
मग कासावर लिंबी आंबा,खोबर्या आंबा,लश्या आंबा , तोतापुरी,बिटकी अशी खुप सारे आंबे आणि त्यांना पडलेली नावे
वरांबीतील आंबे तोंडपाठ होते...आजुनही ते आंब्याखाली न जाता ओळखतो....
कधी कधी रात्रीही फेरी व्हायची
आम्हि कोकणातील त्यामुळे तेंव्हा हापुस, कलम, तोतापुरी खुप खाल्ले पण गावठी .... वेगवेगळ्या आकाराचे...चवीचे...रंगाचे आंबे त्यांची गोष्ट आणि त्या गोष्टीतील आठवणी निराळ्याच😞🙏🏻
माणसांकडे सर्व काही आले तरी ते दिवस पुन्हा मिळणे अशक्य
जांभळांचे ही दोन प्रकार खाऊन पाहायचं मग समजतं ती १)मांसाळ आहे की २)हडगळ😃
@मांसाळ (खुप जास्त गर
असलेली)
@हडगळ(खुप कमी गर असलेली...पण कधी कधी चविष्ट ही असते)
जांभळे उतरवयाची असतील(म्हणजे जमिनीवर न पडू देता...न फुटलेली) तर आम्ही चादर कींवा साडी घेऊन जात असु...मग कोणीतरी एक झाडावर चढुन फांदी हळवायचं ..खाली दोन जण चादर पकडून असायचं...ती जांभळे न फुटता खाली चादरीत(ती उतरवलेली जांभळं)
कच्च्या आंब्यांच करबुटल बनवलं जायचं
पहिलं आंबे सोलुन उमवुन (वाफवून) गुळ टाकून जिरं त्याची फोडणी आणि मग आंबट गोड अप्रतिम चवीची रेसीपी तयार
खरं तर करबुटलं करवंदापासुन बनवलं जातं...आणि आंब्यापासून ही..
खुप आठवणी आहेत आंब्यांच्या पण पहाटे लवकर उठून जाणे... मित्रांसोबत त्याची वाटणी करणे...परिवारासोबत खाणे....दुपारी विहरीत पोहणे....या आठवणी खास होत्या...
कच्चे उतरविलेले आंबे पिकवण्यासाठी पेंढ्या मध्ये ठेवले जात त्याला आंबे आडीला घातले अस म्हणतं....
आंब्याना जाऊन घराकडे परतताना जर रस्त्यात बैलगाडी वाले तात्या ,काका दिसले तर गाडीत डायरेक्ट जाऊन बसायचो त्यात कोणत्याही संकोच नसायचा...
लिफ्ट मागणं म्हणजे काय हे कधी कल्पनेत ही नव्हतं😃
तर व्यायाम... नैसर्गिक फळे... निसर्गाच्या सान्निध्यात.... oxygen आपसुकच आमच्या जिवनात यायचं...
तर अशी होती आंब्यांची आठवण
*आज्जी आणि आईच्या वेळेची* *आठवण* ✍🏻
*श्री नैनेश म्हात्रे*
*बोरघर-अलिबाग-रायगड*

220 

Share


नैनेश म्हात्रे
Written by
नैनेश म्हात्रे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad