चहा! फक्त शब्द उच्चारला अन् अंगाला, मनाला हुशारी आली. सवयच झाली आहे या गोष्टीची. त्यात रामभरोसे हिंदू हाॅटेल फलक लावलेले दुकान असेल तर निश्चितच डबल हुशारी आलीच समजा. राजस्थानमधील या माणसांनी फार पूर्विपासून मुंबई शहरांत ही दुकाने थाटली व फक्कड चहा बनविण्याच्या आपला हातखंडा प्रसिद्ध केला. यांच्या या फक्त चहाच्या हाॅटेलमद्धे कितीतरी चहाचे नाना प्रकार. एक नंबर पासून पांच नंबर दिलेले चहाचे प्रकार, कधी स्पेशल चहा, गुलाबी चहा असे चहाचे नाना प्रकार. खरोखरच यांच्या चहाची चवच काही विशेष आहे. नक्किच चहा प्याल्याचे समाधान मिळतेच. त्यांच्या हाॅटेलची ठेवणसुद्धा कधीच बदलली नाही. पूर्वि होती तशीच राहीली. तसेच त्यांनी चहाचा दर्जासुद्धा कधी ढासळू दिला नाही. अतीशय प्रामाणिकपणे त्यांची ही सेवा आजही जिकडे तिकडे चालूच आहे. त्यामुळेच त्यांच्या या चहाची चवच काही औरच आहे. याचप्रमाणे इराण्याच्या हाॅटेलातील पाणीकम चहा फार प्रसिद्ध व वेगळ्याच चवीची होती. यांचे हाॅटेलसुद्धा दिसण्यात कधी बदललेच नाही. त्याची ठेवणं कायम एकाच प्रकारची मग कुठेही जा. विशेष म्हणजे टेबलांचे, खुर्च्यांचे आकार सुद्धा सर्वत्र सारखेच. टेबलावर जाड पांढरी सफेद गोल संगमरवरी फर्शी व काळ्या रंगाच्या पाॅलीशचे वाकडे गोलाकार पाय. चहाची चव सुद्धा सर्वत्र सारखीच आणि विशेष प्रकारची. आज या इराण्यांची हाॅटेल्स कमी झालेली दिसून येतात. अशी ही चहाची हाॅटेल्स विशेष करुन मुंबई शहरांत प्रसिद्ध होती. आज लोकसंख्या वाढल्यानंतर भरपूर ठिकाणी चहाची विक्री व्यवस्था आढळून येते. अशा प्रकारे रस्त्यातून फिरत असताना प्रवास करणाऱ्या थकल्या भागलेल्या प्रवाशांची चहाची व्यवस्था ही मंडळी खूप चांगल्या प्रकारे आज कित्येक वर्षे करत आहेत.
खरोखरच चहा हे एक असे पेय आहे की जे कंटाळलेल्या मानसिकतेला ताजेतवाने करणारे, उत्साहित करणारे पेय. माणसाचा थकवा काही प्रमाणांत तरी दूर होतो. तसे म्हटले तर चहा हे एक गरीबाला जीवनांत साथ देणारे सुद्धा पेय आहे. जेंव्हा आर्थिक तंगी असते तेंव्हा माणसाला चहाच्या आधारे काही दिवस आपल्या भूकेवर मातसुद्धा करता येते. चहामद्धे पोहे बूडवून जरी खाल्ले तरी खूप आवडीने खावून माणूस भूकेवर सहज मात करु शकतो. गरीबांचे चहा साधे पोहे हे कठिण काळांत साथ देणारे अन्नच आहे. तसे चहामध्ये इतर कोणतीही खाद्यवस्तू बूडवून सहज खाता येते व भूकेचे शमन सहज करता येते. खरोखरच चहा हे गरीबांसाठी एक वरदानच आहे. खूप भूक लागली असल्यास झट की पट चहा बनवून त्याबरोबर काही त्वरित खाल्यास भूकेचे शमन माणसाला चटकन करता येते. बाजारांत साखरेच्या किंमती परवडेनाशा झाल्यास केंव्हा केंव्हा गुळाचा चहा बनविण्यांत येतो. त्याची चव सुद्धा काही वेगळीच असते.
या विश्वाचा मालक सर्वेसर्वा परमेश्वर बघा किती दयाळू व समंजस आहे. त्याने या विश्वात निसर्गात चहासारखी वनस्पती निर्माण करुन मानव जातीची केव्हढी मोठी सोय केलेली आहे. भारतांत आसाम, दार्जिलींग ही चहाच्या उत्पादनांची मोठी नैसर्गिक केंद्रे आहेत. या ठिकाणी चहा वनस्पतींचे मोठमोठे मळेच आहेत. हा चहाचा व्यापार फार मोठा आहे.
मानवी जीवनांत चहा या गोष्टीला खरोखरच अनन्य महत्व आहे. घरी पाहूणे मंडळी आली असता त्यांचे स्वागत केल्यानंतर चहापान कार्यक्रम ही आपली संस्कृतीच झालेली आहे. कोणत्याही महत्वाच्या समारंभांत किंवा कार्यक्रमांत चहाची उपस्थिती न चूकता करण्यांत येते. सर्वांचे तोंड गोड करुन मानवी जीवनांतील स्नेहपूर्वक प्रेमळ भावना व्यक्त करण्यांत चहाचे फार मोठे योगदान आहे. चार मित्र चहाच्या टपरीवर जमून चहाचा मनसोक्त आनंद घेत मजेशिर गप्पांचा कार्यक्रम आपल्याला नेहमीच पहायला मिळतो. त्यांतील काही सिगारेट फूकणारे असतील तर जोरजोरात धूराचे लोट हवेत फिरताना दिसून येतात. हल्लीच्या काळांत तर एक नवीन गंमतच पहायला मिळते म्हणजे काही बिनधास्त तरुणीसुद्धा चहासोबत हे धूराचे लोट तोंडातून बिनधास्तपणे बाहेर फेकतांना आढळून येतात. हे दृष्य म्हणजे एक अवर्णनिय मजेशिर हास्यास्पद आनंदाचे क्षणच असतात. हा सर्व काही अविस्मरणिय देखावा असतो. चालायचंच, कालाय तस्मै नमः !
मोठ्या लोकांचा चहापान तर काही औरच असतो. सर्व काही हाय फाय म्हणजे हात कुठे आणि पाय कुठे असे. कसलेतरी साखरेचे चौकोनी तूकडे असतात त्याबरोबर सफेद कागदी पूडीत चहा पावडर धाग्याला लटकलेली, दोन्ही वस्तु गरम दुधात टाकून चमच्याने हलवत बसायचे. थोड्याच वेळात चहा तयार झाला की प्यायला सुरुवात करायची. या लोकांचे सर्वच काही औरच असते, सर्व जगावेगळे. खरे म्हणजे त्यांना सिद्ध करायचे असते की आम्ही काहीतरी वेगळे हाय फाय आहोत. हे सुद्धा चालायचंच, कालाय तस्मै नमः! जग कितीही बदलल तरी चहाने बाकी आपली चव काही बदलली नाही. ती कुठेही प्या ती म्हणते मी फक्कड आहे तेच बरे.
चला, भरपूर चहा पाजला आता बस करतो. आता मला स्वतःला पिउदे.