Bluepad | Bluepad
Bluepad
मराठी कवितांचा आनंद घ्या ‘ह्या’ युट्युब चॅनल्सवर!
A
Ashwini Kawale
24th Jun, 2022

Share

हल्लीच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत यूट्यूब हे सगळ्यांचंच आवडतं माध्यम आहे. वेगवेगळे कुकिंग शो, कार्टून, धार्मिक – आध्यात्मिक मजकूर, ट्रॅव्हल व्ह्लॉग्ज या सगळ्यांचीच सध्या युट्यूबवर चलती आहे. याबरोबरच मराठी कवितादेखील या माध्यमावर मोठ्या प्रमाणात सादर केल्या जातात. अनेक नावाजलेल्या कवींबरोबरच, हौशी कवींनी आपापले चॅनल्स सुरु केले आहेत. आज अशाच काही चॅनल्सबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

 मराठी कवितांचा आनंद घ्या ‘ह्या’ युट्युब चॅनल्सवर!

१) स्पृहा जोशी
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तितकीच संवेदनशील कवयित्री असलेल्या स्पृहा जोशीचं युट्यूब चॅनल हे तिच्या नावानेच आहे. शांत, आल्हाददायी आवाजात स्पृहा स्वतः लिहिलेल्या कविता सादर करते. वेगवेगळ्या व्हीडिओजचा वापर ती सादरीकरणासाठी करत असते. हरकत नाही, असा कोणीतरी, अचानक कसं सगळं, कोठे मनाला वाटतो, तू जर मला विचारशील या तिच्या कविता मनाला स्पर्श करतात. अगदी ज्यांना कविता ऐकण्याचा छंद नाही त्यांनाही या कविता ऐकताना आनंद मिळू शकतो. कवितांना संगीतवाद्यांची दिलेली साथ स्पृहाच्या कवितांचं वैशिष्ट्य आहे.

२) गुरु ठाकूर
मराठी कवी, गीतकार म्हणून गुरु ठाकूर यांचं नाव अतिशय मोठं आहे. अनेक सिनेमांना अर्थपूर्ण गाणी देण्यापासून, आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांवर, अनुभवांवर, मानवाच्या भावनांवर प्रकाश टाकणाऱ्या कविता गुरु ठाकूर सादर करतात. मौनाचा चालतो मौनाशी संवाद, शायद, सोसवेना शांतता, परतीच्या वाटेवरला, वक्त अशा अनेक काविता प्रत्येकाने ऐकल्या पाहिजे. अर्थपूर्ण शब्द आणि मंत्रमुग्ध करणारे ग्राफिक्स, व्हीडिओज आपल्याला कवितांमध्ये खिळवून ठेवतात. एक – दीड मिनिटांच्याच कविता असल्याने कमी वेळात अधिक अर्थ आपल्यापर्यंत पोहोचतो हे त्यांच्या कवितांचं आणि या चॅनलचं वैशिष्ट्य म्हणता येईल.

३) गझलमित्र
वेगवेगळ्या कवींच्या कविता या चॅनलवर सादर केल्या जातात. कवींची ओळख करुन देत कविता सादर करणं या चॅनलचं वैशिष्ट्य आहे. शिवाय कवितांच्या ओळीदेखील व्हीडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जातात. त्यामुळे कविता आपल्या संग्रही ठेवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पाहून लिहून काढण्याचा, स्क्रिनशॉट काढून मोबाईलमध्ये सेव्ह करण्याचा पर्यायही आपल्याकडे उपलब्ध असतो. निसर्गचित्रांचा, व्हीडिओंचा आधार घेत सादर केलेल्या कविता ऐकण्याबरोबर बघताना छान अनुभव देतात. कवितांची आवड असणाऱ्या प्रत्येकाने या चॅनलवरील कविता नक्की ऐकाव्यात.

४) पोएट सौरभ
जीवनावर, जगण्यावर भाष्य करणाऱ्या कविता पोएट सौरभ या चॅनलवर आपल्याला ऐकायला मिळतात. स्वलिखित त्याचप्रमाणे नावाजलेल्या कवींच्या कविता या चॅनलवर सादर केल्या जातात. सुरेश भट यांची असेच हे, कुसुमाग्रजांची कणा, विं. दा. करंदीकर यांची देणाऱ्याने देत जावे, मंगेश पाडगावकरांची सांगा कसं जगायचं, गुरु ठाकूर यांची असे जगावे दुनियेमध्ये याबरोबरच शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या कविता, स्थानिक कवींच्या कवितादेखील या चॅनलवर ऐकायला मिळतात. कवितेच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा मिळावी, आयुष्यात नवी उभारी यावी हा या चॅनलचा उद्देश आहे. या चॅनलला श्रोत्यांचा प्रतिसादही चांगला मिळतो.

५) M4marathi
M4marathi हेदेखील मराठी कवितांसाठी युट्यूबवर प्रसिद्ध असेललं चॅनल आहे. महाराष्ट्रातल्या विविध कवींच्या कविता या चॅनलवर सादर केल्या जातात. त्याचबरोबर, गाणी, भाषणं, वक्तृत्व स्पर्धांचे व्हीडिओदेखील आपल्याला या चॅनलवर बघायला, ऐकायला मिळतात. शिवाय, काव्यमैफलदेखील या चॅनलवर आयोजित केली जाते. हजारो, लाखोंच्या संख्येने या कवितांना व्ह्युज मिळत असतात. अशोक नायगावकर यांची शाकाहारी कविता, तुकाराम धांडेंची साहेब ही कविता, आई बाबा थोडं बोलायचंय, माझा बाप शेतकरी, एटीकेटीची प्रेम कहाणी, प्रेमाचा झांगडगुत्ता, समजून घे मला तू या कवितांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकाच चॅनलवर अनेक कवींची मांदियाळी हे या चॅनलचं वैशिष्ट्य आहे.

या सगळ्या चॅनल्समुळे अनेकविध विषयांवरच्या कविता आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत. आयुष्यातल्या नाजूक प्रसंगांपासून, शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रेम – प्रेमभंग सगळ्या विषयावर कविता या चॅनल्सवर आपल्याला बघायला मिळतात. कविता करण्याची आवड असणाऱ्या आणि कविता ऐकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला हे चॅनल्स नक्की आवडतील. तुम्ही कवितांचे कोणते चॅनल्स फॉलो करता हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

432 

Share


A
Written by
Ashwini Kawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad