Bluepad | Bluepad
Bluepad
लग्नाचं बंधन बेडी वाटू लागते तेव्हा काय करायचं?
M
Manjiri Pardeshi
24th Jun, 2022

Share

लग्न झाल्यापासून मला एक स्वप्न सतत अधून मधून पडत रहायचं की मी काहीही करायला गेले तरी मला ते करता येत नाही कारण माझे हात साखळीने बांधलेले असतात. मी बोलायचे प्रयत्न करते पण मला बोलताच येत नाही, उठून उभं रहायचे प्रयत्न करते, तर पायही एका दोरीने घट्ट बांधलेले असतात. ती दोरी जोरात कोणी मागे ओढतं आणि बघता बघता एका अंधाऱ्या खोल डोहात मी पडते...... पण याच वेळी मला नेहमी जाग यायची. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे!’ माझी आई नेहमी म्हणायची. मी सतत विचार करत रहायचे. पण माझ्या मनात काय चालू होतं, कसली अस्वस्थता होती? मला ते स्वप्न का पडत होतं या विषयी नंतर माझं मलाच कळत गेलं.

लग्नाचं बंधन बेडी वाटू लागते तेव्हा काय करायचं?

एके दिवशी सकाळी घरातली सर्व कामं आटपून मी टेबलावर कोरा कागद दिसला म्हणून त्यावर एक चित्र काढू लागले. नवऱ्याने ते पाहीलं. “हा काय बालिशपणा आहे?” तो म्हणाला. तरीही त्याला अगदी उत्साहात मी ते चित्र दाखवलं पण त्याने त्याचं कौतुक तर सोडाच; हातात घेतलेला कागद एखाद्या कचऱ्याप्रमाणे फेकून दिला. हे असं पहिल्यांदाच झालं नव्हतं. मला चित्रकलेची आवड होती, आजही आहे हे त्याच्या लक्षातच नव्हतं.

आमच्या गावाच्या घराच्या कामासाठी पैसे द्यायचे होते. माझं एटीएम कार्ड नवऱ्याकडे असतं. त्याने माझ्या खात्यावरचे पैसे काढून परस्पर दिरांना दिले. मला बँकेचा मेसेज आला तेव्हा कळलं. ते पैसे काढताना मला सांगणंही त्याला महत्त्वाचं वाटलं नाही? मला जेव्हा घर खर्चासाठी पैसे हवे असायचे तेव्हा त्याला सांगणं माझ्यासाठी बंधनकारक होतं पण तो मला कधीही सांगायचा नाही. कोणत्याही आर्थिक बाबीत मला स्वातंत्र्य नव्हतं.

लग्ना आधी कुठे हिंडण्या फिरण्याचं मला बंधन नव्हतं. वडिलांची कधी परवानगी घ्यावी लागत नव्हती. पण लग्न झाल्यानंतर सासूबाई, नवरा यांची परवानगी घ्यावी लागे. कुठे मैत्रिणी बरोबर जायचं म्हंटलं की सासूबाई कामाची यादी सांगायच्या आणि नवरा वेळेचं बंधन आधीच घालून द्यायचा. शिवाय बाहेर गेल्यावर फोन चालूच असायचे. काही दिवसांनी माझं हिंडण फिरणं बंद झालं. नवरा मात्र त्याच्या मित्रांसोबत फिरायला जायचा.

सासूबाईंना ठराविक रंगाची साडी हवी म्हणून नवरा आणि मी दुकानात गेलो होतो. तेव्हा तिथे एक अबोली रंगाची साडी होती. मला अबोली रंग आवडतो हे त्याला माहित होतं. तो रंग माझ्यावर छान दिसतो, असं तो लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात म्हणायचाही. पण त्या दिवशी साडी समोर असून तो काहीच बोलला नाही. मी ही मागणी केली नाही.

पाहुणे कधी आले तर काम करुन माझा अगदी दम निघायचा पण नवऱ्याचं त्यावेळी माझ्याकडे लक्ष जायचं नाही. काही चूक झाली की मात्र तो मला माफ करायचा नाही. शिवाय पाहुण्यांकडून मोठेपणा मिळावा म्हणून फर्माइशी सुरू असायच्या. एवढ्या गडबडीत मी जेवले की नाही हा प्रश्न त्याला कधी पडला नाही. दोघातल्या प्रत्येक भांडणा नंतरही मलाच माघार घ्यावी लागे.

लग्नाचं बंधन, सात जन्म, वचन, सहजीवन या सगळ्या शब्दांनी आपण बायका फार हळव्या होतो. याच शब्दांच्या भोवती अडकून पडतो. संसारात तडजोड करायची असते, करावी लागते हे बायकांच्या मनात इतकं ठसवलं जातं. समोर जे येईल त्या गोष्टीला जाऊदे, मरु दे असं म्हणत येईल तो प्रसंग निभाऊन नेत असतो. स्वत:च्या जखमेवर स्वत:च फुंकर घालतो. संसारात स्वत:चं अस्तित्वच विसरून जातो किंवा जोडीदाराकडूनच आपल्याला महत्त्व दिलं जात नाही हे देखील लक्षात घेत नाही. हे लग्न माझ्यासाठी बेडी कधी झालं होतं हे माझं मलाच कळत नव्हतं.

या सर्व गोष्टी मनात सलत होत्या. त्यामुळे सतत ते स्वप्न पडायचं. आता स्वप्नातल्या त्या दोरखंडाच्या बेड्या तोडणं माझ्या हातात होतं आणि तेच मी केलं. ज्या गोष्टी पटत नाहीत त्या बोलू लागले. काही गोष्टी नवऱ्याच्या विचारांच्या विरुद्ध आणि माझ्या मनाप्रमाणे केल्या, करत राहिले. स्वत:चं महत्त्व मी जाणल्यावर ते नवऱ्यालाही कळू लागलं. अशा फार छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे नात्याच्या सुंदर बंधनापेक्षा आपण गुलामासारखे बेडीत अडकत जातो. मी बाहेर पडलेच! जेव्हा जेव्हा आपल्या मनाला गोष्टी खटकत असतात तेव्हा ते मन आपल्याला साद घालत असतं. त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, मग वेडी अधिक घट्ट होत जाते. म्हणून आपण वेळीच या बेड्या तोडल्या पाहिजेत असं मला वाटतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.

439 

Share


M
Written by
Manjiri Pardeshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad