Bluepad | Bluepad
Bluepad
ही आहे विक्रम आणि वेताळची शेवटची कथा…
R
Rajesh Patil
24th Jun, 2022

Share

विक्रम आणि वेताळच्या गोष्टी आजही आपण आवडीने वाचतो. प्रत्येक कथेत राजा विक्रमाच्या डोक्यावर ताण असतो बोलू की नको बोलू. विक्रमाच्या पाठीवरचा हा वेताळ त्याला फक्त गोष्टी सांगत नाही तर राजाच्या न्यायदानाची परीक्षा घेत असतो. राजा विक्रमाला नगराचे आणि नागरिकांचे खरे रूप आणि भाव-भावना दाखवतो. पण वेताळाचे हे भूत विक्रमाच्या पाठीवरून नेमके उतरले कसे जाणून घेणार आहोत या लेखात…

ही आहे विक्रम आणि वेताळची शेवटची कथा…

वेताळ जेव्हा मांडलिक राजाची कथा विक्रमाला सांगत असतो त्यावेळी तो विक्रमाला एक प्रश्न विचारला पण त्याचे उत्तर विक्रमाला देता आले नाही. खूप वेळ झाला तरी राजा विक्रम मौन धरुन बसला होता. पराक्रमी राजा विक्रमाचे हे रुप वेताळाला पहावले नाही म्हणून तो राजाला म्हणाला, ‘राजन, तुला उत्तर देता आले नाही. काळजी करु नको मी तुझ्या पराक्रमावर खुष झालो आहे. तुझी सहनशीलता अफाट आहे. मी आता काय करतो, या मृत शरीरातून बाहेर पडतो. मग तू हे मृत शरीर घेऊन त्या योगीमहात्म्याकडे जा. जेव्हा तो योगी तुला या मृत शरीरापुढे नतमस्तक व्हायला सांगेल तेव्हा तू त्याला सांग तुम्ही या मृत शरीरापुढे नतमस्तक होऊन दाखवा. तो योगी जेव्हा डोकं खाली करेल तेव्हा तलवारीने त्याचे मस्तक छाटून टाक. त्याच्या बलिदानामुळे तुला पृथ्वीवरील सर्वोत्तम राजाचा सन्मान मिळेल. पण जर तू त्याचे मस्तर छाटले नाहीस तर मात्र तो तुझा बळी देऊन सिद्धी प्राप्त करेल.’ एवढे बोलून वेताळ त्या मृत शरीरामधून निघून गेला.

राजा विक्रम त्या मृत शरीराला घेऊन योगीमहात्म्याकडे गेला. योगी ते मृत शरीर पाहून खुश झाला आणि राजाला म्हणाला, ‘राजन तू माझे खूप मोठे काम केले आहेस. हे मृत शरीर येथे आणून ठेव. मी सदैव तुझा ऋणी राहीन. तू खरोखरच एक श्रेष्ठ राजा आहेस.’ असे बोलून योग्याने मृत शरीर राजाच्या खांद्यावरून काढून बाजूला ठेवले. त्या मृत शरीराला स्नान घातले आणि फुलांच्या माळांनी त्याला सजवले. मग जोरजोरता मंत्राचे उच्चारण सुरु केले. योग्याने वेताळाला आवाहन करुन आपली पुजा सुरु केली.

थोड्या वेळाने योगी राजा विक्रमाला म्हणाला, ‘राजन माझी पुजा संपन्न झाली. तुझे मस्तक खाली झकवून तू या मृत शरीराला प्रणाम कर.’ तेव्हा अचानक राजा विक्रमाला वेताळाचे शब्द आठवले. राजा विक्रम म्हणाला, ‘मी राजा आहे, मी कधी कुणा पुढेही डोके टेकलेले नाही, तुम्ही प्रथम मला सांगा या मृत शरीराला कसे नमन करावे.’ योगी नमस्कारासाठी खाली झुकतो आणि त्याचवेळी राजा विक्रम तलवारीने त्याचे मस्तक छाटून टाकले. हे पाहून वेताळ खुष झाला आणि म्हणाला, ‘राजन हा योगी सर्व जगावर राज्य करु पाहत होता पण आता सर्व जगावर तुझे राज्य असेल. मी तुला खूप त्रास दिला आहे म्हणून तुला जे काही हवे आहे ते मागं, तुझी मागणी मी नक्की पूर्ण करेन.’

राजा म्हणाला, ‘जर तू माझ्यावर प्रसन्न झाला असशील तर मी तुला प्रार्थना करतो की, तू मला रस्त्यात ज्या २४ कथा सांगितल्या तसेच ही शेवटची योगीची कथा या सर्व कथा लोकांनी आदरांनी वाचाव्यात आणि त्यातून बोध घ्यावा अशी माझी इच्छा आहे.’

वेताळ म्हणाला, ‘राजा तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. मी तुला सांगितलेल्या सर्व कथा वेताळ पंचवीशी म्हणून ओळखल्या जातील. या कथा वाचून लोकांना ज्ञान मिळेल आणि पाप करण्यापासून परावृत्त होतील.’ असे बोलून वेताळ तिथून निघून गेला आणि साक्षात शिवशंकर राजा विक्रमासमोर प्रकट झाले. शिवशंकर राजाला म्हणाले, ‘राजन तू या योग्याचा संहार केलास हे उत्तम केलेस. योग्याच्या रुपात हा एक राक्षस होता. आता तू सात द्विप, पाताळलोक तसेच पृथ्वीवर राज्य करशील.’ एवढे बोलून शिवशंकर अंतर्धान पावले. राजा विक्रमाने आपले काम पूर्ण केले आणि तो राज्यात परतला. काही दिवसांनी राजा विक्रम पृथ्वी, पाताललोकसह त्रिलोकावर राज्य करु लागला. जेव्हा राजा विक्रमाचा अंतिम काळ समोर आला तेव्हा तो पंचत्वात विलीन झाला.

विक्रम आणि वेताळ या कथा मालिकेतील ही शेवटची कथा. यावरुन आपल्याला लक्षात आले असेल की वेताळ पंचविशी कशाप्रकारे प्रसिद्ध झाली. राजा विक्रमाने अनंत यातना सोसल्या पण त्याने आपले कार्य सफल केले. राजा विक्रमाला त्याच्या पराक्रमाचे फळ मिळाले म्हणून मेहनत करणे सोडू नका. मेहनत करताना, परोपकार करताना, सत्य धर्माचे पालन करताना त्रास होईल पण अंतिम विजय आपलाच आहे. तुम्हाला जर राजा मांडलिकची २४ वी कथा वाचायची असेल तर कमेंट करुन सांगा.

235 

Share


R
Written by
Rajesh Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad