Bluepad | Bluepad
Bluepad
'हे' कोट्स तुमच्या भिंतीवर जरूर लावा
T
Tejaswini Godbole
24th Jun, 2022

Share

भिंतीवर चित्रे, फोटे या सगळ्या गोष्टी किती छान दिसतात. मी सुद्धा शाळेत असताना गणिताची सूत्रं, विज्ञानाचे तत्त्व असे भिंतीवर लावून ठेवायचे. यामुळे सतत भिंतीकडे लक्ष गेले की ते वाचले जायचे. ही सवय अजूनही कायम आहे पण आता फक्त मी भिंतीवर काही कोट्स लावले आहेत. तर मग पाहुया हे कोट्स आहेत तरी कोणते!

१. इतर लोक कसे वागतात हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. पण तुम्ही या सगळ्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे नियंत्रित करू शकता. तुमचा प्रतिसाद हीच तुमची शक्ती आहे.
आपल्या आयुष्यात असणारी सगळीच लोकं ही आपल्याशी चांगलच वागतील अशी आशा करणं मुळात चुकीचं आहे. दुसऱ्यांनी कसं वागावं हे आपण कंट्रोल करू शकत नसलो तरी आपण त्यांचं वागणं बघून त्यांच्याशी कसं वागायला हवं हे ठरवू शकतो. एखाद्याचा स्वभाव चिडका असेल तर त्याच्याशी शांततेने बोलण्याचा, त्याच्या कलाने घ्यायचा आपण प्रयत्न करायला हवा. जी लोकं कामापुरता तुमचा वापर करून घेतात त्यांच्यापासून लांब राहणे हे योग्य आहे.

 'हे' कोट्स तुमच्या भिंतीवर जरूर लावा

२. आतून इतके मजबूत व्हा की बाहेरील कोणतीही गोष्ट तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या आंतरिक शक्तीवर परिणाम करू शकणार नाही.
रोजच्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्याचा परिणाम थेट आपल्या मनावर होतो. कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बोलतं, चहाड्या करतं ज्याचं आपल्याला दुःख होतं. कोणतीही नवीन गोष्ट करायच्या आधी लोक काय म्हणतील हा विचार आपण करतो. म्हणजेच बाहेरच्या लोकांचा, गोष्टींचा परिणाम आपण आपल्या जगण्यावर करून घ्यायला सुरुवात करतो. त्यामुळे आपण एवढे मजबूत व्हायला हवे की आपल्या आंतरिक शक्तीला बाहेरील कोणतीही गोष्ट धक्का लावणार नाही.

३. सकारात्मकता ही निवड असून तुमचा आनंद व शांती तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. त्यामुळे काय योग्य आहे ते पाहून तुमच्या मनाचे स्वास्थ्य जपा.
नकारात्मकतेवर मात करणारी आणि आयुष्य सर्वार्थाने जगायला लावणारी एकमेव गोष्ट म्हणजे सकारात्मकता. दैनंदिन जीवन जगताना कोणत्याही क्षणी सकारात्मकतेचा खूप जास्त परिणाम होत असतो. सकारात्मक राहिल्याने विचारांना योग्य दिशा मिळते. त्यायोगे तुमचा आनंद आणि शांती हे दोन्ही उत्तमरित्या टिकून राहतात. यामुळे मनाचे आरोग्य जपले जाते. तेव्हा नकारात्मकतेला अधिक महत्व द्यायचे की सकारात्मकतेला हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे.

४. काहीही न करून कंटाळा येण्यापेक्षा खूप प्रयत्न करून, शिकून, थकून जाणे खूप चांगले आहे.
संघर्ष हा आयुष्यात कोणालाही चुकत नाही. जर आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर त्यात अडचणी, समस्या येतातच. एखाद्या गोष्टीची इच्छा मनात धरावी आणि ती तात्काळ पूर्ण व्हावी असे क्वचितच होते. तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न, कष्ट घ्यावे लागतात. हा अनुभव खूप काही शिकवून जातो आणि तो आपल्याला घडवायचे काम करत असतो. तेव्हा संघर्ष करावा लागतोय यामुळे कंटाळून जाऊ नका तर सातत्याने प्रयत्न करून काहीतरी चांगले काम करून दाखवा.

५. आज एखाद्याला आनंदी ठेवण्याची ताकद तुमच्यात असेल तर आजच आनंद द्या. जगाला सध्या त्याची नितांत गरज आहे.
प्रत्येकाला काही ना काही दुःख असते. काहीतरी घटना घडतात आणि दुःखी राहण्याला कारण मिळतं. अशावेळी जर तुमच्यामध्ये समोरच्याला आनंदी ठेवण्याची ताकद असेल तर अशी काही कृती करा जेणेकरून त्याच्या चेहऱ्यावर आनंद येईल. आनंदी राहणं हे प्रत्येकाचे ध्येय असते. मग समजा तुम्ही त्याच्या ध्येयाला उभारी दिलीत तर त्याचे जगणे सुंदर होईल. आजकाल आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहून मन विषण्ण होते. त्यामुळे तुम्हाला एखाद्याला आनंदी ठेवता येत असेल तर जरूर ठेवा.

हे असे इतके सकारात्मकता वाढवणारे आणि रोजचा दिवस सुंदर करणारे विचार तुम्ही तुमच्या भिंतीवर लावणार ना ? केवळ भिंतीवर नाही तर हे विचार तुमच्या मनात देखील रुजवा आणि त्याला कृतीत उतरवा. तुम्ही हे नक्की कराल याची खात्री तर आहेच पण हे विचार कसे वाटले ते देखील तुम्ही सांगा. तुमचा दिवस शुभ जावो!

450 

Share


T
Written by
Tejaswini Godbole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad