मुसळधार पाऊस पडताना कांदा भजी खायला काही वेगळी मजा येते. पाऊस ओसरल्यावर खिडकीतून,बाल्कनीतून झाडावरून पडणारे,कुठल्याश्या खिडकीच्या सळईवरील किंवा इलेक्ट्रीक वायर ज्या एका खांबापासून दुसऱ्या खांबापर्यत जोडलेल्या असतात त्यावर पावसाचे थेंब अगदी ओळीने लटकलेले असतात ,ते न्याहाळत गरम गरम चहाचा भुरका मारणे त्याचा आवाज आवडत नसेल तर सावकाशपणे घोट घेणे,हा विलक्षण अनुभव आहे.ते पावसाचे थेंब जणू एका पंगतीत बसले आहेत किंवा लहान मुले एखाद्या बांबूला वगैरे लटकून झोके घेतात तसा भास होतो.
मी चहाला अमृत समजते. चहाची मजा तेव्हा मला जास्त येते जेव्हा माझी नणंद येते.कारण आमच्या घरी मी एकटीच चहा घेते,अलिकडे माझा मुलगा चहा घ्यायला लागला. सासूबाईंनी चहाची चवच कधी घेतली नाही. मला वाटते त्या खूप मोठ्या सुखापासून वंचित राहील्या. यजमान काॅफी घेतात ते तिचे गुणगान करतात. मी चहाचे गुणगान करते आणि आमच्या चहापार्टीत बरेच सभासद असतात. मुख्य सभासद मी आणि वैशू ताई म्हणजे माझी नणंद आहोत. आम्हाला चहाबाज म्हणून संबोधले जाते.कारण आम्ही केव्हाही, कितीही वेळा चहा पिवू शकतो. आम्हाला कटींग ही संकल्पना मान्य नाही.चहा घ्यायचा तर पूर्ण कपभरुनच .अश्या छोट्या मोठ्या अटींमुळे आम्ही चर्चेत असतो. आम्ही अगदी अभिमानाने सांगतो की आम्ही बाबांचा(माझे सासरे आणि त्यांचे बाबा) वारसा च पुढे चालवितो. असे आमचे कौटुंबिक चहापुराण आम्ही सांगत असतो.
तब्येतीची काळजी आम्हीही घेतो,चहाचे फायदेतोटे जाणतो पण इतर बाबीत आम्ही तडजोड करु शकतो चहाच्या बाबतीत नाही.