Bluepad | Bluepad
Bluepad
सदा सर्वदा योग तुझा घडावा..
कु. जान्हवी विद्याधर दाबके
कु. जान्हवी विद्याधर दाबके
24th Jun, 2022

Share

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, कधीही चालणारी पण अत्यंत जीवनावश्यक गोष्ट म्हणजे चहा!
कोणी त्याला कषाय पेय म्हणतात, कोणी चाई , कोणी चहा, तर कोणी आणखी काही. पण चहाची मजा कॉफीला मात्र नक्कीच नाही.
काळोख झालेला असावा,मुसळधार पाऊस पडत असावा, एका हातात मस्त गूढ कादंबरी असावी आणि दुसऱ्या हातात असावा चहाचा कप ! अत्यंत उत्तम समीकरण!
परीक्षेची तयारी करताना, अवघड विषयाचा अभ्यास करताना, अवघड प्रश्न सोडवताना कायम साथ देणारा सच्चा साथी म्हणजे चहा !
चहाला माणसाचं आणि वेळेचं बंधन असं काहीच नाही.तो मित्र - मैत्रिणींबरोबर घ्यावा . झोपाळ्यावर बसून आजी आजोबांबरोबर घ्यावा. आई बाबांबरोबर बरोबर गप्पा मारताना घ्यावा. भावंडाबरोबर carrom खेळताना ,गप्पा मारताना घ्यावा. रात्री जागरण करून पत्ते खेळताना तर चहा must असतो. नाटक पाहून आल्यावर चहा घ्यावा. पुस्तक वाचताना घ्यावा. गाण्याच्या मस्त रंगलेल्या मैफिलीनंतर घ्यावाच. कारण शास्त्र असतं ते !
चहा पिण्याचं कप हे मुळात मोजमाप नव्हेच. चहा मुळात घेणार का असं विचारायचं नसतंच. चहा घेणार ना असं नुसतं विचारून कप भरून आणून समोर ठेवायचा. एखाद्याला कमी हवा असेल तर प्रमाण घोटभर!
सदा सर्वदा योग तुझा घडावा..
पावसात चिंब भिजून मग गरम गरम मक्याचं कणीस आणि चहा घ्यावा. थंडीने गारठून जात असताना मस्त मऊ दुलईत लपेटून हातात आल्याच्या चहाचा कप घेऊन गॅलरीत बसणं ह्या सुखाला तुलनाच नाही.
बरं चहा हे तसं सर्वांच्या खिशाला परवडेल असं पेय. कुठेही केव्हाही मिळेल असं. त्याला बाकी पेयांसारखी जास्त साधनसामुग्री लागत नाही. कमी वेळात जास्तीत जास्ती उत्साह प्रदान करणारा.
कितीही एनर्जी ड्रिंक्स आली, ग्रीन टी, लेमन टी, ऑरेंज टी आलं तरी चहाला तुलना नाही !
चहा हे एक असं पेय आहे की कितीही acidity चा त्रास असला तरी येणाऱ्या पाहुण्यांबरोबर प्रत्येक वेळेस घोटभर का होईना घेतलाच जातो आणि गंमत अशी की चहाला वेळ नसली तरी वेळेला चहा लागतोच !
असा हा चहा. सर्वांनी प्यावा. एकमेकांना पाजावा. करावा. द्यावा आणि एकत्र मिळून आनंद लुटावा. म्हणून मी चहाला रोज म्हणते - सदा सर्वदा योग तुझा घडावा ...
सर्व चहाप्रेमींना समर्पित !
बरं ,चला मंडळी , चहा घ्यायला चला ..चहाची वेळ झाली !
- कु. जान्हवी विद्याधर दाबके

177 

Share


कु. जान्हवी विद्याधर दाबके
Written by
कु. जान्हवी विद्याधर दाबके

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad