Bluepad | Bluepad
Bluepad
चहा
वेदांत बावनकर
24th Jun, 2022

Share

केवळ पानांच्या उत्पादनासाठी ज्यांची लागवड केली जाते अशा काही थोड्या वनस्पतींपैकी चहाच्या वनस्पतीला विशिष्ट स्थान आहे. भारतातील खाजगी उद्योगांत चहाच्या उद्योगाला पहिले स्थान आहे. तसेच भारतात रेल्वेच्या खालोखाल चहा उद्योगातील कामगारांची संख्या आहे. ताग उद्योगानंतर भारताला सर्वांत अधिक परदेशी चलन मिळवून देणारा हा उद्योग आहे. भारताला मिळणाऱ्या एकूण परदेशी चलनाच्या पंधरा टक्के चलन चहा उद्योगातून मिळते.
चहा
चहाची वनस्पती झुडूप या प्रकारातील असून त्याच्या प्रक्रिया केलेल्या पानांपासून (अगर पानांच्या चुऱ्यापासून) उत्तेजक पेय तयार करतात. त्या पेयालाही चहा हेच नाव आहे. हे जगातील सर्वांत लोकप्रिय पेय आहे. जगातील जवळजवळ निम्मे लोक हे पेय पितात. समाजाच्या सर्व थरांतील लोकांच्या घरांत दैनंदिन आहारात आणि आदरातिथ्यात चहाला महत्त्वाचे स्थान आहे.
वनस्पती वर्णन : चहाचे झुडूप मूळचे आसाम व चीनमधील आहे. दर वर्षी छाटणी केल्यामुळे झुडपाची उंची ०·७ ते १·७ मी. पेक्षा जास्त नसते परंतु छाटणी न केल्यास त्याची उंची १० ते१७ मी.पर्यंत वाढते. या झुडपाला पुष्कळ फांद्या असतात. पाने पुष्कळ, साधी, एकांतरित (एकाआड एक), कुंतसम (भाल्यासारखी) अगर आयतकुंतसम, दंतुर, केशहीन वा खालच्या बाजूला लव असलेली, आखूड देठाची आणि सदाहरित असतात. कोवळी पाने लवदार असतात. पक्व पाने जाड, चकचकीत, हिरवी, चिवट, गुळगुळीत आणि सु. पाच ते तीस सेंमी. लांब व अडीच ते चार सेंमी. रुंद असतात. पानांत तैलप्रपिंड (ग्रंथी) विपुल असतात. फुले पांढरी व सुवासिक असून पानांच्या बगलेत एकेकटी किंवा दोन ते चारांच्या झुपक्यांत येतात. पाकळ्या पाच से सात, पिवळ्या केसरदलांभोवती असतात. फळ (बोंड) कठीण असून त्यात एक ते तीन कठीण बिया असतात. इतिहास : चहा हा शब्द चिनी भाषेतील ‘चा’ या शब्दापासून रूढ झाला आहे. चिनी भाषेतून जपान, भारत, इराण आणि रशिया या देशांत हा अथवा तशा प्रकारचे शब्द रूढ झाले आहेत. इंग्रजी भाषेतील टी या शब्दाचा उगम चीनमधील ॲमॉय प्रांतातील बोली भाषेतील ‘टे ’ या शब्दात आहे. डच लोकांनी जावामार्गे हा शब्द यूरोपात नेला. इंग्रजी भाषेत सु. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत चहाला ‘टे’ हा शब्द रूढ होता. त्यानंतर त्याचा उच्चार ‘टी’ असा करण्यात येऊ लागला.
चहा
आ. १. चहा : (१) फुलासह फांदी, (२) फुलाचा छेद, (३) पाकळी व केसलमंडल, (४) तडकलेले फळ, (५) बीज.
चहाच्या मूलस्थानाविषयी पुष्कळ दंतकथा आहेत. एका जपानी पौराणिक कथेप्रमाणे चहाची उत्पत्ती चीनमध्ये बोधिधर्म नावाच्या (बौद्ध भिक्षूच्या) पापण्यांपासून झाली. चिनी दंतकथेप्रमाणे इ.स.पू. २७३७ च्या सुमारास शेन नुंग नावाच्या सम्राटाच्या कारकीर्दीत चहाचा उत्तेजक पेय म्हणून वापर सुरू झाला. परंतु चहाचा अधिकृत उल्लेख ‘एर या’ (Erh Ya) या चिनी शब्दकोशात (इ. स. पू. ३५०च्या सुमारास) आढळतो. उत्तेजक पेय म्हणून नव्हे, तर औषधी गुणधर्म असलेली वनस्पती म्हणून तत्कालीन लोकांना ती परिचित होती. पुढे हलके हलके चहाच्या पानांचा उत्तेजक पेयासाठी वापर करण्यात येऊ लागला आणि सातव्या व आठव्या शतकांत त्याला एवढी लोकप्रियता मिळाली की, चिनी सरकारने त्यावर कर बसविला. आठव्या शतकात लू यू (Lu Yu) या चिनी विद्वानांनी चा चिंग (Ch’a Ching = चहाचे पुस्तक) हा माहितीपूर्ण ग्रंथ लिहिला. त्यात चहाच्या झाडाचे निरनिराळे प्रकार, खुडण्यासाठी पानांची निवड, पाने खुडण्यासाठी योग्य समय, चांगल्या प्रतीचा चहा (पत्ती) तयार करण्याची पद्धत, चहा (पेय) करण्याची पद्धत आणि चहा पिण्यापासून फायदे यांसंबंधी विवेचन आहे. तहान भागविण्यासाठी उकळलेले पाणी, दु:ख विसरण्यासाठी मद्य व झोप घालविण्यासाठी चहा घ्यावा असे त्यांनी नमूद केले आहे. चहाच्या चीनमधील इतिहासावरून पुढील तीन गोष्टी स्पष्ट होतात. (१)चहाची वनस्पती मूळची त्या देशातील आहे, (२)या वनस्पतीचा शोध चिनी लोकांना फार वर्षांपूर्वी लागला आणितिचा वापरही फार वर्षांपासून होत होता, (३)पानांपासून चहा (पत्ती) तयार करण्याची कृती सोपी असल्यामुळे सर्वसाधारण लोकांचे पेय म्हणून चिनी लोकांमध्ये चहाचा वापर यूरोपातील लोकांपेक्षा कित्येक शतके अगोदर सुरू झाला. जपानमध्ये सहाव्या ते आठव्या शतकांत चीनमधून बौद्ध भिक्षूंमार्फत चहाचा प्रथम प्रसार झाला. प्रथम प्रथम याचा वापर एक औषधी वनस्पती म्हणून होत असे व तेराव्या शतकापर्यंत तो उत्तेजक पेय म्हणून लोकप्रिय झाला नव्हता. आता त्या देशात प्रत्येक घरात चहापानविधी फार महत्त्वाचा समजला जातो. जपानी चहात दूध नसते.
चहा पिण्याची सवय चीनमधून मध्य आशियातील देशांत पसरली आणि अठराव्या शतकापर्यंत ती त्या देशांत चांगलीच रूढ झाली होती.
तिबेटमध्ये चहाचा प्रसार चीनमधून सातव्या अगर आठव्या शतकात राजघराण्यामार्फत झाला आणि थोड्याच कालावधीत तेथे राष्ट्रीय पेय म्हणून चहाला मान्यता मिळाली. धार्मिक मठांत त्याचा सर्रास उपयोग होऊ लागला. सुखवस्तू तिबेटी लोक दिवसाकाठी ३०ते ७० कप चहा पितात असे म्हणतात.
इराणमध्ये सतराव्या शतकात चहा पिण्याची पद्धत रूढ झाली.
चीन व अतिपूर्वेकडील देशांशी भारताचे इसवी सनाच्या पहिल्या दहा शतकांत भूमार्गाने आणि जलमार्गाने दळणवळण होते. यावरून भारतात चहाचा वापर फार पूर्वीपासून प्रचलित असावा असे अनुमान काढल्यास ते चुकीचे होणार नाही. परंतु भारतात मोगलकालामध्ये आलेल्या जगप्रसिद्ध प्रवाशांच्या वर्णनामध्ये चहा पिण्याच्या प्रथेचा उल्लेख नाही. तसेच भारताविषयीच्या सतराव्या व अठराव्या शतकांतील इतर लिखाणांमध्येही याचा उल्लेख नाही. ईस्ट इंडिया कंपनीच्या मोगल दरबारी असलेल्या इंग्रजांच्या लिखाणात कोठे कोठे चहापानाचा उल्लेख आहे. यावरून चहा पिण्याचा प्रघात भारतात त्या काळात थोडाफार होता, परंतु त्याचा सर्रास वापर होत नव्हता असे अनुमान निघते. कर्नल लॅटर यांना १८१५ मध्ये आसामी टोळ्यांत चहा पिण्याचा प्रघात असल्याचे आढळून आले.
जावामध्ये जपानी चहाची लागवड १६८४ मध्ये सुरू झाली.
चहाचा यूरोपात प्रसार : सतराव्या शतकाच्या सुरुवातीला डच लोकांनी जावामार्गे यूरोपात प्रथम चहा नेला. त्यानंतर यूरोपात चहाचा खप वाढू लागला. इंग्लंडमध्ये १६५७ मध्ये प्रथम चहा विकला गेला. त्यावेळी हा देश सर्व जगात प्रथम क्रमांकाचा कॉफी पिणारा देश होता. चहानिर्यातीच्या व्यापारात प्रथम फक्त डच लोक होते. पुढे फ्रेंच, पोर्तुगीज आणि इंग्रज या व्यापारात पडले. १६६९ पासून १८३३ पर्यंत चहाची इंग्लंडमध्ये आयात करण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीकडे होती. चीन आणि भारत या देशांतून चहा निर्यात करून तो इंग्लंड आणि अमेरिकेतील वसाहतींमध्ये लोकप्रिय करण्यात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा फार मोठा वाटा आहे.
चहाचा इंग्लंड आणि अमेरिकेच्या वसाहतीमधील संबंधांवर परिणाम : अमेरिकेत वसाहत करून राहिलेल्या लोकांवर इंग्लंडने आपल्या गरजेसाठी इतर वस्तूंबरोबर चहावर कर बसविला. तेव्हा तेथील लोकांत असंतोष निर्माण झाला. परिणामी इतर वस्तूंवरील कर रद्द झाले. परंतु चहावरील कर कायम राहिला. याचा निषेध म्हणून बॉस्टन येथील लोकांनी बंदरातील चहाच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या. ही घटना ‘बॉस्टन टी पार्टी’ या नावाने प्रसिद्ध आहे. अमेरिकेतील क्रांतीच्या अनेक तत्कालीन कारणांपैकी हे एक कारण आहे. इंग्लंडची अमेरिकेतील हुकुमत संपुष्टात आली व त्याचबरोबर अमेरिकेच्या लोकांनी चहावर बहिष्कार घातला. चहाऐवजी कॉफीचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला व अद्यापही अमेरिकेत कॉफीचा खप चहाच्या सु. पंचवीसपट आहे. याउलट इंग्लंडमध्ये चहाचा खप कॉफीच्या पाचपट आहे. भारतातील चहाच्या लागवडीचा इतिहास : भारतात चहाच्या लागवडीसंबंधीच्या दिशेने पहिले पाऊल १७७८ मध्ये उचलण्यात आले. त्यावर्षी सर जोसेफ बॅंक्स यांना भारतात चहाची लागवड सुरू करावी अशी ईस्ट इंडिया कंपनीला शिफारस केली. १७९३ मध्ये बॅंक्स यांना चहाच्या लागवडीसंबंधी आणि पानांपासून चहा तयार करण्यासंबंधी तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी चीनला पाठविण्यात आले. त्यांनी चिनी चहाची झाडे व बिया कलकत्त्याला पाठविली. १८२३ मध्ये रॉबर्ट ब्रूस नावाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांना आसाममधील सादियानजीकच्या जंगलात चहाची झाडे नैसर्गिक अवस्थेत वाढत असल्याचे आढळून आले. ही झाडे ईस्ट इंडिया कंपनीच्या वनस्पतिशास्त्रज्ञाकडे पाठविण्यात आली. परंतु ती खरी चहाची झाडे नसल्याबद्दलचे मत त्यांनी दिले. सैन्यातील चार्ल्‌टन नावाच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्यांना १८३१ साली आसाममध्ये चहाची झाडे आढळून आली ती त्यांनी कलकत्त्याला पाठविली, परंतु तज्ञांनी ती खरी चहाची झाडे नसल्याचा निर्वाळा दिला. दरम्यान १८२८ मध्ये लॉर्ड बेंटिंक यांची भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांना वॉकर नावाच्या एका सद्‌गृहस्थांनी लंडन मुक्कामी एक निवेदन सादर केले. त्यात त्यांनी नेपाळच्या टेकड्यांत चहाची लागवड करण्यासंबंधी शिफारस केली आणि त्याची कारणेही त्यात नमूद केली. व्यापारी संबंध बिघडल्यामुळे चीनमधून चहाची आयात बंद होण्याची शक्यता आणि इंग्लिश लोकांच्या जीवनातील चहाला वाढते महत्त्व या गोष्टी लक्षात घेता चहाच्या बाबतीत केवळ चीनवर अवलंबून न राहता ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखालील प्रदेशातच चहाची लागवड करणे कसे फायद्याचे आहे, हे त्यांनी विशद केले. भारतात कमी रोजावर मजूर मिळण्याची शक्यता आणि मॅंचेस्टर येथील गिरण्यांत यंत्रमागांवर तयार होणाऱ्या कापडाच्या आणि मलमलीच्या आयातीमुळे भारतातील हजारो बेकार विणकरांना कामधंदा मिळवून देण्याचा चहा उद्योग हा एक पर्याय याही गोष्टी भारतात चहाची लागवड सुरू करण्यासाठी अनुकूल असल्याचे त्यांनी नमूद केले. बेंटिंक यांनी यावर पूर्ण विचार करून एक समिती नियुक्त केली. आसामच्या जंगलात आढळून आलेली चहाची झाडे ही चिनी चहाच्या जातीची नसल्याचा समितीतील तज्ञांचा अभिप्राय पडला आणि चीनमधून चहाची झाडे व त्याचबरोबर चहाची लागवड करणे आणि पानांपासून चहा तयार करणे या बाबींतील वाकबगार लोक आणून हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, उत्तर आसाम आणि दक्षिण भारत या ठिकाणी चहाची लागवड करावी, असे ठरविण्यात आले. १८३५ च्या सुमारास चिनी चहाच्या बियांपासून भारतात वरील भागांत चहाच्या लागवडीला सुरुवात झाली. नंतर आसाममध्ये पूर्वीपासून जंगलात वाढत आलेली चहाच्या जातीची झाडे ही खरी चहाचीच झाडे असल्याचा निर्णय तज्ञांच्या समितीने दिला. १८३९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मळ्यांत तयार झालेला चहा लंडन येथील बाजारात प्रथमच लिलावाने विकला गेला. यावेळेपर्यंत चीनमधून आणविलेल्या बियांपासून पुष्कळ ठिकाणी लागवड करण्यात आली होती व उत्तर आसाममध्ये कित्येक भागांत देशी जातीची झाडे मोठ्या संख्येने उपलब्ध असल्याचेही आढळून आले. १८४० मध्ये आसाम टी कंपनीची स्थापना झाली आणि यावर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या बहुतेक सर्व चहाच्या मळ्यांचे या कंपनीकडे दहा वर्षांच्या कराराने हस्तांतर झाले. १८५५ मध्ये काचार (दक्षिण आसाम) भागात पुष्कळ ठिकाणी देशी चहाची झाडे आढळून आली. देशी चहाच्या झाडांपासून चांगल्या प्रकारचा चहा तयार होतो असे आढळून आल्यावर चिनी आणि देशी अशा दोन्ही प्रकारांची लागवड करण्यात येऊ लागली.
थोड्याच काळात आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे व काचार, हिमालयाच्या पायथ्याचा दुआर व तराई हा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, उत्तर प्रदेशातील डेहराडून खोरे आणि पंजाबमधील कांग्रा खोरे या ठिकाणी चहाची लागवड होऊ लागली. १८५३ नंतर दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ व कमी प्रमाणात कर्नाटकात लागवडीस सुरुवात झाली. १८५९ मध्ये जोरहाट कंपनी ही चहाची दुसरी कंपनी स्थापन झाली व त्यानंतर अनेक ब्रिटिश भांडवलदारांनी मुख्यत्वे त्यांच्या देशातील ग्राहकांना चहा पुरविण्याकरिता या व्यवसायात पाऊल टाकले. भारतातील चहाचा उद्योग १८७० च्या सुमारास चांगल्या प्रकारे विकासाच्या मार्गास लागला. १८८१ मध्ये इंडियन टी असोसिएशन आणि १९१८ मध्ये इंडियन टी प्लॅंटर्स असोसिएशन या संस्था स्थापन झाल्या. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी अनेक नवीन मळे स्थापन करण्यात आले. १८९० च्या सुमारास चहाच्या लागवडीखाली १,५२,००० हे. क्षेत्र होते व त्यापासून ५·७ कोटी किग्रॅ. चहा (दर हेक्टरी सरासरी ३७३ किग्रॅ.) तयार होत होता. यानंतर ४० वर्षे चहाच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढले. तथापि १९३२ मध्ये चहाच्या किंमती अतिशय घसरल्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढण्याचा वेग कमी झाला. १९४० ते १९६० च्या दरम्यान भारतातील लागवडीखालील क्षेत्र ३,३७,०३५ हेक्टरांपासून ३,३०,७५८ हे. इतके कमी झाले कारण चहाचे काही मळे पूर्व पाकिस्तानात गेले. तथापि त्याच काळात उत्पादन २,१०,४१५ टनांवरून ३,२१,००७ टनांपर्यंत वाढले आणि हेक्टरी सरासरी उत्पन्न ६२४ किग्रॅ.वरून ९७१ किग्रॅ.वर गेले. १९७१ मध्ये हेक्टरी सरासरी उत्पन्न १,२१५ किग्रॅ.पर्यंत वाढले.
लागवड करणारे देश : जगातील एकूण सव्वीस देशांत चहाची लागवड करण्यात येते. त्यांतील महत्त्वाचे देश पुढीलप्रमाणे आहेत : चीन, जपान, भारत, बांगला देश, श्रीलंका, तैवान, इंडोनेशिया, मलेशिया, पूर्व आफ्रिका (केनिया, मालावी, युगांडा आणि मोझॅंबिक), तुर्कस्तान, ब्राझील, अर्जेंटिना आणि रशिया.
चीन आणि जपानमध्ये मुख्यत: छोटे शेतकरी चहाची लागवड करतात. याउलट भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, श्रीलंका, रशिया आणि पू. आफ्रिकेतील देश या देशांत ती मोठ्या मळ्यांत करण्यात येते. अर्थात यांतील काही देशांत चहाची लागवड करणाऱ्या लहान जमीनधारकांचे क्षेत्रही मोठे आहे.
भारतातील लागवडीचे प्रदेश : भारतातील चहाची लागवड मुख्यत्वेकरून उ. व द. भारतातील डोंगराळ भागांत आहे. आसाम हा चहाच्या लागवडीमध्ये प्रथमपासून अग्रेसर प्रदेश आहे. त्या राज्यातील ब्रह्मपुत्रा आणि सुरमा या नद्यांच्या खोऱ्यांतील प्रदेश आणि प. बंगालमधील दार्जिलिंग, जलपैगुरी, कुचबिहार आणि तराई हे उ. भारतातील चहाच्या लागवडीचे प्रमुख प्रदेश आहेत. कांग्रा, कुमाऊँ आणि डेहराडून जिल्ह्यांतही चहाची लागवड लहान प्रमाणात होते. आसाममधील चहाचे क्षेत्र सर्वांत जास्त असले, तरी त्याची विभागणी फक्त ७५० मळ्यांत आहे. याउलट तमिळनाडूमध्ये फक्त ३४,६४६ हे. क्षेत्रात ६,४५० मळे आहेत. केरळमधील मळ्यांची संख्या ३,०३२ आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात (याला ‘आसाम व्हॅली’ असेही नाव आहे) चहाच्या लागवडीसाठी सर्वांत अनुकूल परिस्थिती असल्यामुळे जगातील सर्वांत मोठे सलग चहाचे क्षेत्र या भागात आहे. चहाच्या लागवडीसाठी सुरमा खोऱ्यांतील हवामान ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्याइतके चांगले नाही. भारताच्या ईशान्य भागात तयार होणाऱ्या चहामध्ये दार्जिलिंग चहा विशेष स्वादयुक्त असतो.

172 

Share


Written by
वेदांत बावनकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad