Bluepad | Bluepad
Bluepad
प्रभाते मनी चहा चिंतीत जावा!
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
24th Jun, 2022

Share

प्रभाते मनी चहा चिंतीत जावा
सृजनाच्या सरी
येता पहिला पाऊस!
गंध मातीला सुटतो!
तन मन भिजताना,
सुखानंद हा भेटतो!!
नवलाई पावसाची!
धोधो कधी थेंब थेंब!
मन मोहित करी हा,
अंग करी ओलेचिंब!!
भिजलेल्या पावसात!
खाया प्याया वाटे फार!
कांदा भजी संगे चहा,
मिळे आनंद अपार!!
सारे काही करविता!
तोच आहे भगवंत!
होते सुरेख कविता,
नुरे मनी खेद खंत!!
श्री.ह.भ.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील जामनेरकर
पहिला पाऊस चहा आणि भजे हे मराठी माणसाचे अतूट असे नाते आहे.चहा आणि भारतीय लोक एक समीकरण झाले आहे. चहा शिवाय सकाळ जात नाही असा भारतीय मनुष्य शोधून सापडणार नाही. चहाची तुला पृथ्वीवरील अमृताशी व्हायला लागली आहे. सकाळी-सकाळी आबालवृद्धांना स्वर्ग आनंद देणारा हा चहा आजकाल अमृततुल्य म्हणून प्रसिद्ध झाला आहे. सकाळी सकाळी राम प्रहरी चैतन्याचे वर्षाव करणारे चहापान दिवसभरासाठी उत्साहाची पेरणी असते. पाहुणेमंडळी घराला आली की पहिल्यांदा चहा-पाणी देऊन त्यांचे स्वागत केले जाते. त्यातून गप्पाटप्पा यांच्या आरंभाला वेगळी चव येते. सुखदुःखाचा सोबती म्हणून चहा भारत प्रिय झाला आहे.
उन्हाळा असो की पावसाळा, हिवाळ्यात हे या चहाची चव आनंददायी असते. आबालवृद्धांना मनापासून आवडणारा चहा आज-काल विविध मसाले युक्त चविष्ट खूप आवडतो. गवती चहा टाकून किंवा चहाचा मसाला टाकून किंवा अद्रक इलायची टाकून बनवलेला चहा खऱ्या अर्थाने आस्वादक होतो.
अशा या चहा ला वेळ नसतो पण प्रत्येकाला वेळेवर चहा हवाहवासा वाटतो. पत्नीने आईने किंवा सूनबाईने बनविलेला चहा मस्त झाल्याशिवाय राहत नाही. आमच्याकडे सकाळ, दुपार संध्याकाळ त्रिकाल संध्या चहाची असते म्हणजे असतेच. घराला पाहुणेमंडळी येतात किंवा मित्र परिवारातील मंडळी येतात त्यावेळेला चहा तर अति आवश्यक आहे. आम्ही खानदेशात राहणारी मंडळी चहाचे खूप लाडके आहोत आणि चहा सुद्धा आजकाल आमची खूप लाडाची झाली आहे. गप्पा-टप्पा मारतांना चहाचा एक घोट घेऊन टेन्शन दूर करण्याची क्षमता असलेला हा चहा काहींना कमी साखरेचे आवडतो ,काही बिना साखरेचे पितात, काहींना खूप गोड आवडतो. पिवर दुधाचा खडक चहा म्हणजे अमृततुल्य!
अशा विश्व प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या चहाचे महत्त्व ध्यानात घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्याचे जाहीर केले. भारतासह श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, मलेशिया अशा देशांमध्ये 15 डिसेंबर हा जागतिक चहा दिवस साजरा होत असे. मात्र युनोने दरवर्षी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्याचे घोषित केले.
नेमका हा चहा आला कुठून हे काही सांगता येणार नाही मात्र आफ्रिका ,टांझानिया, युगांडा, मलेशिया, केनिया, भारत, वियतनाम, नेपाळ ,बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका आदी देशांमध्ये चहाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. चहाची जगात सर्वात पहिली नोंद चीन मध्ये झाल्याचे सांगण्यात येते.
आपल्याकडेही चहा कडक मिठी म्हणजे गरमागरम म्हणून प्रसिद्ध असली तरी कोल्ड टी सुद्धा उपलब्ध आहे. ज्यात लेमन, ऑरेंज ,पायनापल ,स्ट्रॉबेरी, विड्याच्या पानांचे फ्लेवर असतात. या कोल्ड टी बरोबरच ग्रीन टी श्रद्धा लोकप्रिय होत चालले आहे. ग्रीन टी नैसर्गिक फीडबर्नर असून त्यात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. वेदुला तरतरी आणणारे आणि थकवा दूर दूर करणारी चहा एक प्रकारे शरीरात चैतन्य निर्माण करते.
असे विश्वप्रसिद्ध लोकप्रिय चहा नावाचे पेय प्रत्येकाला त्याच्या ठरलेल्या वेळेवर मिळालेच पाहिजे. चहा वेळेवर नाही मिळाला तर अनेकांची चिडचिड होते. म्हणून चहाला वेळ नसली तरी वेळेवर चहा मिळणे हा जणू सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क झाला आहे.
येताय ना मंडळी मग चहा घ्यायला....।

396 

Share


श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
Written by
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad