Bluepad | Bluepad
Bluepad
महाराष्ट्र झुकणार नाही!
M
Mahadev Tukaram Mali
24th Jun, 2022

Share

*महाराष्ट्र झुकणार नाही!*
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्या घटना घडत आहेत त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत हे जरी खरे असले तरी हे घडणार नव्हते या मताचा मी नाही!कोरोना काळात केलेले काम, समाज उपयोगी घेतलेले निर्णय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे भक्कम पाठबळ, यातून मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची देशभरात वाढलेली लोकप्रियता याचे शल्य भाजपच्या नेत्यांना सतत बोचत राहिले!ईडी, सीबीआय, एन आय ए या संस्थांच्या दहशतीला सुध्दा महाविकास आघाडी भीक घालत नाही म्हंटल्यानंतर जिव्हारी लावणारे शस्त्र वापरले ते म्हणजे घरभेदी निर्माण करणे. आणि यात त्यांना यश येत असल्याचे दिसून येत आहे!
तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. *रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती श्रेष्ठ असतात,* याची प्रचिती मुख्यमंत्री ठाकरे आणि महाराष्ट्राला आली आहे. कुणाच्या पाठीमागे किती आमदार आहेत हे आता महत्त्वाचे राहिले नाही तर जनता कुणाच्या पाठिशी आहे?हे महत्त्वाचे आहे.
गेल्या चार दिवसातील घटना पहाता शरद पवार साहेब, नानासाहेब पटोले, यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिलेले मानसिक बळ वाखाणण्याजोगे आहे.
या बंडाने काय साध्य होईल?माझे असे मत आहे की ज्या आमदारांनी मराठी आणि महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे त्यांची ही शेवटची आमदारकी!जेव्हा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी पक्षनेते पद आणि मुख्यमंत्री पद सोडण्याची घोषणा केली आणि अट एकच घातली की मी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून मान्य नसेल तर तुम्ही कोणीही व्हा पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा!आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या टोळीमध्ये प्रामुख्याने ज्यांच्या मागे ईडी, सीबीआय चा ससेमिरा लागला आहे, अशांचा सहभाग आहे!आता फडणवीस, सोमय्या कोणती कार्यवाही करणार की नारायण राणे, विजयकुमार गावित, क्रुपाशंकर सिंह यांच्या प्रमाणे फाईल बंद करणार, हे औत्सुक्याचे असेल!या तपास यंत्रणांचा बेमालूमपणे वापर करून कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवायची या इर्षेने भाजपचे नेते कामाला लागले आहेत.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात ठेवायची?देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई कडे भाजपच्या नेत्यांची वक्रदृष्टी पडलेली आहे. फडणवीस यांच्या कारकिर्दीत याच मुंबई मधून अनेक सरकारी कार्यालये गुजरातला पळवून नेली. आता त्यांना मुंबई जिंकणे सोपे वाटत आहे. परंतु एक लक्षात घ्या मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे काल काळजाचा ठाव घेणारे जे भाषण झाले ते पहाता शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी राहिल यात शंका नाही!जोपर्यंत उध्दव ठाकरे, शरद पवार आणि आलीच तर काँग्रेस एकत्र आहे तोपर्यंत महाराष्ट्र आणि मुंबई हे अतुट नाते कोणीही तोडू शकत नाही.
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडत असताना लाखो शिवसैनिक भावनाविवश झालेले संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. इतका सरळमार्गी, प्रामाणिक मुख्यमंत्री महाराष्ट्राला का पचवू दिला नाही आणि ज्यांनी कुणी हे पाप केलेले आहे त्यांना महाराष्ट्र धडा निश्चितच शिकवणार! *भाजपचे नेते डाव मुख्यमंत्री पदाचा खेळत आहेत परंतु लक्ष्य फक्त मुंबई, ठाणे आहे!* हे लक्षात घ्या.
महाराष्ट्राचे हित कशात आहे हे शरद पवार, उध्दव ठाकरे यांना चांगले समजते. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर २०२४ च्या निवडणुकीत जनता भाजपाला हद्दपार करेल या भितीपोटी हे घडवून आणलेले षडयंत्र आहे. *भाजपा आणि इतर पक्षांमध्ये एकच फरक आहे तो म्हणजे ते डोक्याने लढतात आणि इतर पक्ष ताकदीने लढतात!* आता डोक्याने लढायची वेळ आली आहे हे वेळीच लक्षात आले तर बरीच संकटे आपोआप दूर होतील!आता बहुजनांचे राज्य आणायचे असेल तर ताकदीपेक्षा पेनचा म्हणजे बुध्दीचा वापर करायला हवा.
*महादेव माळी, हिंगणगांव, ता.कवठेमहांकाळ*
मो.नं.9923624545

0 

Share


M
Written by
Mahadev Tukaram Mali

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad