वारी, एक शब्द ऐकला तरी मन प्रसन्न होते. पंढरीची वारी !
मी लहान असल्यापासून मला नेहमी असं वाटायचं, स्वतःच्या जीवाला त्रास करून, पायी जाऊन देव शोधायला हवा आहे का?आजी सांगायची, देव विचारात असतो, माणसात असतो, माणुसकी मध्ये असतो, आपल्या कृतीत असतो; परंतु हे असं असून देखील पायी वारी करायची असा हट्ट का असेल लोकांचा?
आज पहिल्यांदा प्रत्यक्ष वारी बघण्याचा योग आला, पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरून अनेक वारकरी हातात टाळ, डोक्यावर तुळशीच रोप आणि मुखी विठूचा गजर करत आनंदाने गात, नाचत जात होते. माझ्याही नकळत माझे पाऊल तिथे स्थिरावले, आणि मी ते सगळं आनंदाने बघायला लागले. अचानक माझं लक्ष एका आजोबांकडे गेले. ते निवांत बसले होते. उस्तुकता म्हणून मी त्यांच्या कडे जाऊन गप्पा मारू लागले. कुठून आले, किती दिवस झाले, जेवणाचे काय, वगैरे असे अनेक मला पडलेले प्रश्न त्यांनी अगदी आनंदाने सोडवले.
त्यांच्य सोबत गप्पा मारत असताना शेवटी मी न राहवून त्यांना विचारलेच," देवाला भेटायला पायी जायलाच हवे का? शरीराला त्रास देवून येवढे लांब कशासाठी जातात?"