Bluepad | Bluepad
Bluepad
अपयश पचवायला हिंमत लागते!
धनाजी माळी
23rd Jun, 2022

Share

नुकताच दहावी-बारावी इयत्तेचा निकाल लागला आहे. बरेच विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेत, तर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण. दरवर्षी आपल्या देशात या दहावी-बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थी आत्महत्या करतात. हजारो विद्यार्थी अपयश आल्याने किंवा अपयश येण्याच्या भीतीने स्वतःला संपवून टाकतात. अपयश आले म्हणजे सर्वस्व संपले असे समजणे चुकीचे आहे. माणसाचा जन्म मौल्यवान आहे. तो असा सहजासहजी संपवणे, ही खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.
खरेतर, अपयश ह्या शब्दातच यश सामावलेले आहे. तुम्ही अपयशी झालात म्हणजे तुमचं ते पूर्णपणे अपयश हे नसतंच, त्या अपयशातूनही तुम्ही काही ना काही शिकलेला असता. कोणत्याही गोष्टीत अपयश हा अंतिम टप्पा नसतो, तो फक्त यशातला एक अडथळा असतो. तात्पुरता अडथळा असतो, ही गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे असते. म्हणूनच तर 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे', असं कुणीतरी म्हंटलेलं आहे.
कुठल्याही परीक्षेत नापास होणे म्हणजे आयुष्यातलं सगळं संपलं असं मुळीच नाही. आपल्याला जेव्हा वाटतं की आता आपलं सगळं संपलेलं आहे... खरंतर,तेव्हाच यशाची खरी सुरुवात झालेली असते.
कोविडच्या काळात शासनाने पहिली ते दहावी इयत्तेच्या परीक्षा रद्द केल्या. खरंच, हे चुकीचं केलं गेलं. परीक्षा रद्द करणे हा कोणत्याही समस्येवरचा तोडगा नाहीच. कोणत्याही गोष्टीचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा ह्या असायलाच हव्यात. पण ह्या परीक्षांचे दडपण विद्यार्थ्यांवर येऊ नये ह्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी काळजी घेतली पाहिजे. अपयश आलं म्हणजे सगळं काही संपलं असं समजू नये.
मान्य आहे की प्रयत्नांची पराकाष्टा करूनही दुर्दैवाने पदरी अपयश आले. यशाचा भरवसाच वाटेनासा झाला, म्हणून आत्महत्येचा विचार मनात आला; पण त्यावेळी याच अपयशी विद्यार्थ्यांसमोर जीवनभर अपयशातून मार्ग काढणारा, संघर्ष करणारा अन् वयाच्या बावन्नाव्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्रपती बनणारा अब्राहम लिंकन का उभा राहत नाही?का आठवत नाही? लिंकन म्हणतात,“अपयश म्हणजे तात्पुरती माघार असते, तो अंतिम टप्पा कधीच नसतो.”
मित्रहो,आत्महत्या केल्याने प्रश्न कधीच सुटत नसतात. पालकांनी आणि शिक्षणसंस्थांनी ही समस्या गंभीरपणे घेण्याची गरज आहे. पालक मंडळी अभ्यासात कमजोर असलेल्या आपल्या मुला-मुलीची, आपल्याच किंवा शेजारच्या हुशार मुला-मुलींशी तुलना करतात अन् आपल्या पाल्याला सतत हिणवत बसतात, त्याचे दोष काढत बसतात. पण त्यांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, प्रत्येकाची आवड-निवड नि प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व हे भिन्न असतं. त्यामुळे आपल्या मुलांची इतरांच्या मुलांशी कधीच तुलना करू नये. असं केल्याने मुलांच्या मनात विनाकारण न्यूनगंड निर्माण होतो आणि तो पुढे वाढतच जातो. ह्या न्यूनगंडातूनच त्यांचे खच्चीकरण होत असते. आत्मविश्वास डळमळीत होतो अन् त्यांचे विचार आत्महत्येकडे वळतात. म्हणून पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी दुसऱ्या कुणाशीही म्हणजे अगदी त्याच्या भावंडांशीदेखील तुलना करू नये.
मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त त्याला घरातील कामात सामील करून घ्यावे, मुलांचे छंद जोपासावेत, घरातील ताण-तणावाचे प्रसंग शक्यतो टाळावे अन् सकारात्मक वातावरण निर्माण करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी आपल्या मुलामुलींशी मनमोकळेपणाने बोलावे, हास्य-विनोद करावे, गप्पा माराव्या अन् त्यांचे जवळचे मित्र व्हावे. एखादं चांगलं काम केलं तर त्याचं मनभरून कौतुक करावं, त्याला मनापासून प्रोत्साहन द्यावं. आपल्या कौतुकाची थाप त्यांना जगायला आणि प्रगतीपथावर पुढे जायला नक्कीच बळ देत असते.
शेवटी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, माणसाजवळ मरायला जेवढी हिंमत लागते, त्यापेक्षा खूप कमी हिंमत जगायला लागत असते. म्हणून माणसाने अपयशाने खचून जाऊन आत्महत्येचा मार्ग निवडण्याची अघोरी हिंमत न दाखवता अपयश पचवून यशस्वी होऊन दाखवण्याची हिंमत जरूर दाखवावी. अन् असं करण्यातच खरा पुरुषार्थ आहे.
मंडळी, आपल्याला मनुष्य जन्म लाभला, हेच आपले परमभाग्य म्हणायचे अन् जीवन जगत राहायचे. नुसते जगायचे नाही, तर मस्त, मजेत, आनंदाने, अगदी मनसोक्त जगायचे!
कुठल्याही अपयशावर आत्महत्या हा काही तोडगा नाही. कित्येक मोठे लोक अपयशी होऊन पुढे जीवनात यशस्वी झाले आहेत. याची उदाहरणेच सांगायची झाली तर ती अनेक आहेत. तरीही सर्वांना माहित असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ती व्यक्तिमत्त्वे म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, संशोधक थॉमस अल्वा एडिसन अशी अजून अनेक नावे सांगण्यासारखी आहेत.
माणसाला शिक्षण घेताना, एखादा व्यवसाय करताना किंवा नव्याने थाटलेल्या संसारात जोडीदाराबरोबर प्रपंचाचा भार सांभाळताना अपयश येत असतं. तर अशा कोणत्याही प्रसंगी अपयश आलं म्हणून त्याने झुरत बसू नये किंवा आत्महत्येचा मार्ग पत्करू नये. कोणत्याही परिस्थितीत त्याने अपयश पचवायला शिकलं पाहिजे. जीवनाच्या लढाईत आपण हरलो आहोत, असा संकुचित विचार करत बसू नये. तर आपण उत्तमप्रकारे खेळलो आहोत, असा खिलाडूपणाने विचार केला पाहिजे. म्हणजेच मनात नेहमी सकारात्मक विचार आणला पाहिजे.
अपयश पचवायला हिंमत लागते!
मित्रहो, जीवन जगत असताना माणसाला यश किंवा अपयश हे येतच असतं. तेव्हा आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, यशाने कधी हुरळून जायचं नसतं अन् अपयशानं कधी खचून जायचं नसतं. तर जीवन हे खिलाडूवृत्तीने जगायचं असतं.
✍️©धनाजी माळी.(छायाचित्र-गुगलच्या सौजन्याने)

191 

Share


Written by
धनाजी माळी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad