Bluepad | Bluepad
Bluepad
काव्यांजली
m
manasi mohite
23rd Jun, 2022

Share

कविता हा विषय माझ्या अगदी जिव्हाळ्याचा. लहापणापासूनच कविता वाचनाची , बोलण्याची आणि ऐकण्याची आवड. कविता काही बोलक्या तर काही अबोलपणे मूक संवाद साधणाऱ्या असतात. निरागसपणे वाचकाला मंत्रमुग्ध करतात. काही वेळेस तर एखादी कविता वाचताना अगदी आपल्या मनातील भावना कोणीतरी कागदावर उतरवलेल्या आहेत असं वाटतं. कवितांचे जगही असं निराळंच आहे. कवितांच्या भावविश्वात एक वेगळाच आनंद मिळत राहतो. खरेतर प्रत्येकाच्या स्वतःच्या आवडीच्या अशा काही कविता असतातच ज्या कितीही वेळा वाचल्या तरी मन काही भरत नाही. पुन्हा पुन्हा त्या वाचण्याचा मोह काही आवरत नाही. यांतून एक असीम आनंद मिळत राहतो. मनाला समाधान मिळते. माझं फार काही कविता वाचन अजून झालेलं नाही पण ज्या काही कविता वाचल्या आहेत व ज्या नेहमी वाचत असते किवा you tube वर ऐकत असते त्यामध्ये प्रामुख्याने बहिणाबाईंच्या कवितांचा समावेश आहे. साध्या सोप्या अहिराणी बोली भाषेतील या कविता जीवनाचा अर्थ उलगडतात. माणूस आणि निसर्ग यावर ज्या कविता बहिणाबाईंनी रचलेल्या आहेत त्या निव्वळ अप्रतिम आहेत. खूप काही शिकवून जातात या कवितांच्या जाणिवा. तसेच गुरूदेव रविंद्रनाथांची ओढ असल्यामुळे गीतांजली चे मराठी भाषांतर ही वाचनात आले. गीतांजली माझ्यासाठी एक मौल्यवान ठेवा आहे. इतकी अमूल्य सुंदर साहित्यनिर्मिती गुरुदेवांनसारख्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाकडूनच होऊ शकते यात काहीच शंका नाही. याचप्रमाणे कुसुमाग्रज, गोविंदाग्रज बा.भ बोरकर, इंदिरा संत,शांता शेळके, विंदा करंदीकर, हरिवंशराय बच्चन, पद्मा गोळे, यांसारख्या कित्येक थोर दिग्गज कवी आणि कवयित्री यांच्या जीवन समृद्ध करणाऱ्या कविता मला तितक्याच प्रिय आहेत आणि कायमस्वरूपी असतीलच .ज्या वाचून मनाला समाधान आणि शांतता दोन्ही ही लाभते. अशा वैविध्यपूर्ण कविता जीवनामध्ये किती आनंदाचे रंग भरतात हे त्या वाचणाऱ्यालाच ठाऊक. अशा या कवितांवर कितीही भरभरून लिहले, बोलले तरी ते शेवटी अपूर्णच.

222 

Share


m
Written by
manasi mohite

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad