*#त्या_तिघी....*
( सावरकर घराण्यातील वीर स्त्रिया )
*#भाग_१७*
माई , लक्ष्मी ला काही अलवार सुखाचे प्रसंग कथन करत होत्या. तात्या पुण्याहून सुट्टीत नाशिक ला येण्याचे पक्के झाले आणि त्याचवेळी माई बाहेर बसल्या. लग्नानंतर पहिल्यांदाच आता फलशोभनाचा कार्यक्रम करायची मोठ्या बाईंची धावपळ चालू झाली. तात्या आले आणि घर एकदम चैतन्याने बहरून आल्यासारखे वाटले. माई कोणाच्या नकळत त्यांचे निरीक्षण करत होत्या. नजरानजर झाली की, लाजून आत पळायच्या. तिघे भाऊ मंडळी जेवायला बसली. आणि चेष्टा मस्करी ला उत आला. यमुना माईंची त्रेधातिरपीट उडत होती. सगळ्यांच्या समोर बोलायला पण मिळत नव्हते...पण तात्या हळूच जाताजाता म्हणाले, " कशी आहेस? आठवण येत होती का माझी?" त्यांचा हळुवार स्वर ऐकून माई मोहरून गेल्या...!
उत्तराला लाजून शब्दच फुटले नाही.
फलशोभनाचा कार्यक्रम करण्यासाठी पैशाची जमवाजमव ! मोठ्या बाईंचे व भावोजींचे बोलणे माईच्या कानावर पडत होते. लग्नघर असल्यासारखे येसूवहिनींनी मोठ्या हौसेने सगळं घर सजवलं. फराळाचे पदार्थ केले. नवीन लुगडं चोळी..! पाच सवाष्णींनी फळांनी ओटी भरली. सगळं घर आनंदात होतं. सासू- सासऱ्यांची उणीव माईंना कधी भासलीच नाही.
लग्नानंतर प्रत्येक विवाहित स्त्री ज्या समपर्णाच्या क्षणाची वाट पाहते तो क्षण माईंनी अनुभवला. तात्यांचं बोलणं अतिशय हळुवार शृंगारिक ! जणू पौर्णिमेच्या चंद्राचं स्वच्छ प्रतिबिंब , प्रेमभाव ! तात्या म्हणाले , " परमेश्वराने स्त्री ला सृजनाची अनोखी शक्ती बहाल केली आहे ! प्रत्येक स्त्रीने जर शूरवीर , धाडसी अन् राष्ट्रासाठी लढणारी संतती जन्माला घातली तर आपण पारतंत्र्याचं जोखड झुगारून देऊ ! " कोणताही प्रसंग असो राष्ट्राचा विचार तात्यांचा तनामनात घोकत असे.
सुट्टी संपून तात्या पुण्याला निघाले. वियोगाचा क्षण येऊच नये कधीही स्त्रीच्या जीवनात! माईंना डोळ्यातून अश्रूंना थोपवणं कठीण जात होतं पण...तात्यांनी बजावलं वीरमाता व्हायचं ना , तर मग आधी वीरपत्नी हो ! हसऱ्या डोळ्यांनी निरोप दे ! तात्या पुण्याला गेल्यावर रोजचे रहाटगाडगं पुन्हा पहिल्यासारखं चालू झाले. एकदा माई हट्टाने कपड्यांचं गाठोडं घेऊन गंगेवर धुणं धुवायला गेल्या. येसूवहिनी त्यांना , तुला कामाची सवय नाही जाऊ नकोस म्हणत होत्या , तरी ऐकल्या नाहीत....कपडे धुवून घराकडे निघताना अचानक माईंना घेरी आली. राधाकाकू व गोदक्कांनी त्यांना सावरलं नाहीतर पाण्यात पडल्या असत्या ! घरी आल्यावर वैद्यांना बोलावणं धाडलं.
नाडी परीक्षणात माई... आई होणार कळल्यावर साऱ्यांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं !
तिन्ही जगाचं स्वामित्व जिच्यापुढे फिकं ठरावं त्या मातेच्या पदावर विराजमान व्हायला माई सज्ज झाल्या. घरात आनंदीआनंद झाला. सगळे माईंची काळजी घेत होते. त्याचबरोबर लडिवाळपणे चिडवत ही होती. घर आता चिमण्या पावलांनी गजबजून जाणार म्हणून सगळे खुशीत होते.
येसूवहिनींनी माईला देवघरात नेऊन पाटावर बसवलं. सासूबाईंच्या अक्षय सौभाग्य करंड्यातील कुंकू कपाळी लावून , त्र्यंबकेश्वराचा अंगारा लावला. देवापुढे साखर ठेवून सारं काही सुरळीत पार पडू दे , म्हणून देवाला साकडं ही घातलं. इतक्यात वहिनींच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली. माईंनी हट्टाने विचारल्यावर येसूवहिनी तिला म्हणाल्या , " माई , मला वाटतं तू माहेरी जावंस." त्यावर माई म्हणाल्या मी इथं सुखात आहे ना! बाईंनी ह्यावर स्पष्ट शब्दात सांगितलं, " पोरी तू आता दोन जीवांची आहेस. तुला चांगलं पौष्टिक खायला प्यायला हवं ! बाळ कसं छान गुटगुटीत, बाळसेदार निरोगी असायला हवं ना ! तुला इथे कसं राहा म्हणू गं ! ...इथे आज एकादशी तर उद्या महाशिवरात्र...!
अशाने बाळाचे पोषण कसे होणारं ? तुला माहेरी जा सांगताना मला आनंद होत नाही म्हणत बाईंनी डोळ्याला पदर लावला.
माईंच्या माहेरी ही गोड बातमी कळली. सगळ्यांना आनंद झाला. भाऊ न्यायला आले. पण निघताना माईंची पावले जड झाली. त्या आपल्या जावेला जुन्या आठवणी सांगत होत्या. लक्ष्मी , ज्या वास्तूत मी सर्वस्वानं इकडची झाली , ती वास्तू सोडून जायची माझी इच्छाच नव्हती." बाईंनी, मोठ्या भावोजींनी आशीर्वाद दिला. बाईंची भावना , काळजी सारं काही समजत होतं. दिसामासानं माईंच्या पोटातील अंकुर वाढत होता. माहेरी माईंच्या आईने डोहाळजेवणाचा घाट घातला. साऱ्यांना आमंत्रणे धाडली. मोठ्या बाईंना व भावोजींना पण आमंत्रण दिलं. सगळा व्याप सांभाळून त्यांना यायला जमलंच नाही. बाई कार्यक्रमाला आल्या नाहीत म्हणून माई नाराज झाल्या. अचानक तात्यांनी जव्हार ला भेट दिली. त्यांचं सासुरवाडी ला खूप स्वागत झालं.
तात्यांनी बी.ए. नंतर कायद्याचा अभ्यास करायचा निश्चित केले. माई पोटातल्या बाळाची संवाद साधत सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होत्या. आणि अखेर एका क्षणी छोटासा निष्पाप बाळ जीवाचं आगमन झालं.... बारशाचा थाट झोकात होता , जव्हार संस्थानच्या दिवाणांच्या नातवाचं बारसं होतं ना ते ! मोठ्या बाई , भावोजी कार्यक्रमाला आले पण तात्यांनी पत्ररूपात आशीर्वाद धाडले व बाळाचे नाव प्रभाकर ठेवायला सांगितलं ! सगळे विधी यथासांग पार पडले आणि माई...बाई व भावोजीं समवेत नाशिकला यायला निघाल्या.....!!
क्रमशः
( संदर्भ -
त्या तिघी : डॉ. सौ. शुभा साठी लिखित कादंबरीमधून साभार )
✒️ सौ राजश्री भावार्थी
पुणे