Bluepad | Bluepad
Bluepad
मदतीचा हात..
विनय नारायण
विनय नारायण
23rd Jun, 2022

Share

दिवसागणिक एका माणसाला तरी मदत करून त्याचा दिवस आनंददायी करण्याचा माझा प्रयत्न असतो.
असा विचार मी करतो तेव्हा बऱ्याचदा संधी समोरून चालून येते पण कधीतरी दिवस संपायला आला तरी एकही संधी मिळत नाही . अशावेळी मी एकतर ती शोधत फिरतो किंवा चक्क ती निर्माण करतो किंवा ती मला करावी लागते असं म्हणूया .नाहीतर रात्री शांत झोप लागत नाही ..
आज झालं असं की मी संध्याकाळी कट्ट्यावर बसलो होतो.  पावसाची चाहूल लागली की कावळे रस्त्यावर पडलेल्या काड्या जमवायला सुरुवात करतात . घरटं बांधायचं असतं त्यांना.
एक कावळा कुठूनतरी आला आणि माझ्या पायाजवळ पडलेली काडी त्याने चोचीत उचलली . ती धरून त्याने उडायचा प्रयत्न केला पण...ते त्याला जमलं नाही ..काडी जरा लांब होती. ती टाकून देऊन तो छोटी काडी शोधत होता. एकच डोळा असल्याप्रमाणे त्याने सर्वत्र नजर टाकली . माझंही लक्ष होतं. छोट्या काड्या कुठेच नव्हत्या .
त्याने माझ्याकडे पाहीलं.. मी कट्ट्यावरून उठलो..त्याने टाकलेली लांबलचक काडी उचलली . तीचे तीन तुकडे केले आणि पुन्हा कट्ट्यावर बसलो.
तो आला..त्यातली एक काडी उचलली ...आणि उडून गेला...
मी माझ्या घरट्याकडे परतलो.
विनय नारायण
२३ जून २०२२

223 

Share


विनय नारायण
Written by
विनय नारायण

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad