त्याला माझी भाषा कळायची. हे मला वाटायचं. किंवा मला त्याची भाषा. हे माञ मला मनापासून वाटायचं. मी खूप शुअर होतो. हे अगदी अचानक ही नाही.... हळू हळू .... कालांतराने आम्ही एकमेकांना समजत गेलो. Gradual process होती ही. माणसांमध्येही नाती घट्ट होण्याची हीच प्रोसेस असते. इथे ही सेम प्रोसेस. माणूस मी एकटा. त्ये शेळीचं पिलु.
त्याचे डोळे बोलायचे..... वेगवेगळे भाव, उदा. एकाकी वाटणे, राग येणे, relax वाटणे, वगैरे. माझ्या आहट ने त्याला समजायचं मी आलेलो. कधी कधी मी आलोय हे समजताच तो माझ्याकडे पाहत नसला तरी तोंडाची पोसिशन जशी होती तशीच ठेऊन तिरप्या नजरेने माझ्याकडे पहायचा. हा त्याचा attitude वाला भाव. मग मी समजा दारात असेल तर गपकन आत लपायचो. तो मग पूर्णपणे मान वळवून माझ्याकडे भिरभिरत्या नजरेने पहायचा, शोधायचा. त्याला मी गवसायचो नाही. मी त्याला खिडकीतून पाहायचो. लपून. तो मग nervous व्हायचा. मी गपकन दारातून बाहेर यायचो. तो मग मान थोडी खाली घेऊन रागाने माझ्याकडे पहायचा आणि परत झटक्यात समोर पहायचा.
जन्म झाला त्यावेळी नीटसं उभंही राहता येत नव्हतं. मी त्याला पकडायचो. त्याला पळायला येऊ लागलं. मग तो हाती लागेना. त्याच्या आईने, शेळीने, कदाचित त्याला सांगितलं असावं, “ही जी दिसताहेत ना तुला दोन पायांवर चालणारी, त्यांना माणसं म्हणतात. त्यांच्या हाती लागू नको. ते चाऱ्याचं आमिष दाखवून पकडतात, बांधून ठेवतात, निर्दयी असतात ते ”
कालावधीनंतर माझी-त्याची सलगी झाली. आधी घाबरत, नंतर confidentaly ते पिल्लू माझ्याजवळ येऊ लागलं. शेणाने भरलेल्या पायांसकट अंगावर उडी मारू लागलं. शरीर घाण होण्याची भीती आपल्याला, त्यांना नसते.
‘खंड्या पांड्या दुकानमांड्या
दुकानाची किल्ली हरवली
खंड्याने पोरगी पळवली’
वगैरे गाणी मी त्याच्यासोबत म्हणायचो. त्याचं नाव ‘खंड्या’ होतं.
त्याने horizontally कान फडकवला की आपण समजायचं, त्याला आता कोणीही जवळ नकोय. space पाहिजे असायची त्याला. vertically कान फडकवला कि समजायचं, तो आपल्याला बोलावतोय. त्याचे डोळे असायचे सोबतीला अशा संवादांमध्ये. आणि मानेची हालचाल वगैरे.
त्याला आवाज दिला की मान वाकडी करून तिरक्या-तिरक्या उड्या मारत जवळ यायचा. थोडा वेळ खेळायचा. परत जायचा. कधी कधी आवाज न देताही यायचा. त्याला त्याच्या आईचं म्हणणं खोटं वाटत असेल. निश्चिंत होता तो.
आता तो मोठा झाला होता. दोन माणसं आली. म्हणले आमची जत्रा हे. सौदा केला. त्याला पकडलं, त्ये भेदरलं, त्यांच्या हातातून निसटलं, मी हाक मारली, माझ्याकडे आलं, येताना डोळ्यातले भेदरलेले भाव जाऊन अभय मिळाल्याचे भाव आले, मी त्याला उचललं, ते दोघे गाडीवर बसले, मी त्याला दोघांच्या मध्ये ठेवलं, तिघे गेले. मी जाणाऱ्या त्याच्याकडे पाहिलं नाही. कदाचित त्याने पाहिलं असावं.
आता त्याला त्याच्या आईचं म्हणणं पटलं असेल----- “निर्दयी असतात ते”
-- मीच