Bluepad | Bluepad
Bluepad
रानडुकरं
m
mich
23rd Jun, 2022

Share

नेमकं काय वाटतं या पुणेकरांना ? तिकडं शहरात 1 RK मध्ये गुपचूप एकमेकांच्या बोकांडी पडत्यात. इकडं आल्यावरच लई पंख फुटत्यात यांना.
दोन पोरं, ८-१० वर्षांच्या आसपासचे, त्यांची मम्मी आणि त्यांचे पप्पा. नुकतेच कोरोना ने पुण्याहून गावाकडं हाकलून लावलेले. पप्पा म्हणला, “ चलो बेटा आज तुम्हाला शेत फिरवून आणतो.” पोरांनी जल्लोष केला, “ हे sss..... farm ला जाणार........मज्जा करणार वगैरे. मग पुण्यात maxi वर राहणारी त्यांची मम्मी इकडे कशीबशी साडी आवरत मुलाचं आवरते. मुलांना थ्री- फोर्थ, रंगीबेरंगी टी-शर्ट्स घातली जातात. गुडघ्यापर्यंत socks , shoes, डोक्यात cap, सोबत school bag, तिच्यामध्ये दोघांच्या वेग-वेगळ्या water bottles, दोन वेग-वेगळे डबे, त्यामध्ये बिस्कीटं आणि तत्सम खाद्यपदार्थ. मग पप्पाच्या हाताला पकडून दोघे निघतात.
शेतापर्यंतचा प्रवास -- दरम्यान पोरांचे बालिश प्रश्न आणि पप्पाची सोज्वळ उत्तरे. वगैरे. त्यातल्या त्यात--- groundnuts चं ही farm असतं हे ऐकून पोरांना आश्चर्य वाटतं.
खेळत- बागडत चालता चालता रस्त्यात त्यांना विश्वनाथ तात्याचं शेत लागतं. तात्या त्यांच्या हरभऱ्याच्या शेतात गवत वगैरे उपटत असतात. पोरांचा पप्पा मुद्दाम खेड्यातला tone काढत त्यांना आवाज देतो, “ राम-राम इशीनाथ तात्या....”
“ राम-राम साहेब.....या.
खरं तर हा साहेब तिकडं शहरात गळ्यात पट्टा बांधून बॉस च्या शिव्या खात असतो.
“ हे काय आलोच, काय चाललय बाकी तात्या?” हा प्रश्न काही देणं-घेणं नसताना उगाच विचारला जातो.
“काय नाय, ... हेच आपलं ... काहीतरी करीत राहायचं, या की हरभरा खायला पोराहो.”------
खेड्यात आपुलकीने असली आमंत्रणे दिली जातात.
“ घ्या रे मुलांनो हरभरा”, --पप्पाची परमिशन.
“नको पप्पा,” --सोज्वळ मुले.
“आरं घ्या रे,” --तात्यांचा दरडावणीच्या सुरातला आग्रह.
“अरे घ्या, लाजू नका, आपलाच हे”,-- पप्पा.
एखादी गोष्ट आपली नसताना तीवर आपली म्हणून मालकी हक्क बजावण्याचा confidence या पप्पा type लोकांमध्ये खेड्यातच येतो. शहरात असलं काही चालत नाही. पप्पांची परमिशन मिळताच पोरं हरभरा खाण्याचे basic fundamentals शिकून घेतात आणि हरभऱ्यावर तुटून पडतात.
दरम्यान पोरांच्या पप्पाच्या इशीनाथ तात्या बरोबर गप्पा सुरु होतात. मुद्दे---कोरोना , सुट्ट्या, नोकरी, खेड्यातलं वातावरण भारी, वगैरे, वगैरे.
पोरांना शेतकऱ्याने गाळलेल्या घामाची कल्पना नसते. ते रानडुकरासारखे हरभऱ्याच्या शेतात वावरत असतात. कितीतरी हरभऱ्याची झाडं पायाखाली तुडवली जातात. उपटलेली झाडे बचा बचा खाऊन अर्ध्या अधिक घाट्यांसहित फेकून दिली जातात. पप्पालाही त्याचं काही वाटत नाही, कारण त्याच्या मनात पक्क बिंबलेलं असतं की खेड्यातली माणसं खाण्या-पिण्याला कधी नाही म्हणत नाही.
इशीनाथ तात्यांना आता थोडं-थोडं वाईट वाटू लागतं. कोरोना मुळे अशी बरीच कुटुंब शहरातून खेड्याकडे आली होती. तात्याचं शेत रस्त्यातच असल्याने त्यांना बऱ्याचदा हा त्रास व्हायचा. त्यांना प्रांजळपणे वाटत असतं की – खायचं तितकं खाऊ देत पण वाया घालवायला नाही पाहिजे. कारण त्यांनी वावरत ओल असताना चार दिवस सलग पहाटे पहाटे बायको-मुलांसोबत येऊन हरभऱ्याचा एक-एक दाणा ओलसर मातीत हाताने टोभलेला असतो. लोड शेडींग च्या अत्याचारापायी रात्र-रात्र जागून शेताला पाणी दिलेलं असतं. हरभऱ्याला फुलायला scope मिळावा म्हणून उन तहान विसरून गवताचं एक-एक शीत खुरपून काढलेलं असतं. रानडुकरांपासून संरक्षण आणि असं बरंच काही.......
शहरातल्यांना जास्तीत जास्त घाम गाळलेलं माहित असतं. रक्त जाळलेलं माहित नसतं. खायचं तितकं खाऊ देत- हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असतो. ह्या त्यांच्या चांगुलपणाचा फायदा उचलणं शहरातल्यांना चांगलं माहित असतं.
इशीनाथ तात्यांना वाईट वाटत होतं पण ते बोलले काहीच नाहीत. त्यांनी विचार केला—जाऊ दे....कुठं रोज-रोज येत्यात.
“घरी घ्या पोराहो थोडा उपटून, हुरडा करून खाऊ”, -- पप्पा.
जी पोरं आधी सोज्वळपणे हरभरा घ्यायला नकार देत होती तीच आता ऑर्डर मिळताच सैनिक जसा शत्रूंवर तुटून पडतो तसं हरभऱ्यावर तुटून पडली. कित्येक कोवळी कोवळी झाडं त्यांनी उपटली. त्या हरभऱ्याच्या कोवळ्या घाट्यांना अजून झाडांच्या अंगा-खांद्यावर खेळायचं होतं. फुलायचं होतं..... फुगायचं होतं. पण काही बिनडोक, अक्कल गहाण टाकलेल्या डोक्यांमुळे त्यांना अकाली मरावं लागलं. आपल्या बापाच्या—शेतकऱ्याच्या कामी आलो नाही म्हणून त्यांना दुखःही होत असावं. परंतु ह्या स्वार्थाने बरबटलेल्या शहरी धेंडांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. अनभिज्ञ होते ते.
पोरांचा भारा उपटून झाला होता. त्यांच्या पप्पाने कोवळी झाडे बाजूला काढली. “ हे कोवळं असतं, उपटायचं नसतं” वगैरे त्यांना सांगितलं आणि उपटलच आहे तर जाऊ दे, शेळ्यांना होईल असं म्हणून ते ही घेतलं. इशीनाथ तात्यांना राम-राम केला. पोरांना बाय-बाय आणि thank you म्हणायला सांगितलं. पोरं हरभरा चावत तसं बोलली. शहरी त्रिकुट निघालं. शेताच्या वरच्या भागात हरभरा फारच कमी होता. कुरतडलेला वगैरे होता. पप्पाने जाता-जाता तात्यांना विचारलं—“ इकडं हरभरा लईच कमीए ओ तात्या ?”
तात्या बोलले, “हा ना, रानडुकरं लई झाल्यात ...... त्ये खात्यात कमी आन तुडावत्यातच जास्त.”
-- मीच

112 

Share


m
Written by
mich

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad